Gram Ratna Award announced for Sarpanch Sandeep Pol :- महाराष्ट्रात ग्रामविकासाचे 'तळंदगे मॉडेल' विकसित करणारे सरपंच संदीप पोळ यांना 'ग्रामरत्न' पुरस्कार! 

कोल्हापूर जिल्ह्यातील उच्चविद्याविभूषित अन् तरुण सरपंच :  गावपातळीवरील यशस्वी नेतृत्वाचा गौरव 

Gram Ratna Award announced for Sarpanch Sandeep Pol :- महाराष्ट्रात ग्रामविकासाचे 'तळंदगे मॉडेल' विकसित करणारे सरपंच संदीप पोळ यांना 'ग्रामरत्न' पुरस्कार! 
पुणे:- सरपंच संदीप पोळ, तळंदगे, ता. हातकणंगले.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २३ जुलै २०२५ :-  महाराष्ट्रात गावपातळीवरील विकासकामांचे अनोखे 'तळंदगे मॉडेल' विकसित करणारे तरुण व उच्चविद्याविभूषित सरपंच संदीप गीता अर्जुनराव पोळ यांना यंदाचा राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराने गावपातळीवरील नेतृत्वाच्या यशोगाथेला पुन्हा एकदा मान्यता मिळाली आहे. पोळ हे कोल्हापूर जिल्ह्यातील तळंदगे (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच आहेत. येत्या २९ जुलै २०२५ रोजी पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील एका खास कार्यक्रमात पोळ यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. 

पंचायत राज विकास मंच अंतर्गत असणाऱ्या अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने  पोळ यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे संदीप पोळ यांचा ‘राज्यशास्त्राचा अभ्यासक सरपंच',शिक्षण ते नेतृत्वाची झेप' असा प्रवास झाला आहे.पोळ हे राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यांनी अधिव्याख्याता पदासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) आणि राज्य पात्रता चाचणी (सेट) या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. तत्पूर्वी त्यांनी गणित विषयात विज्ञान शाखेची पदवी आणि पत्रकारितेचा पदविका अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. संदीप पोळ हे  पीएच.डी.च्या संशोधनात कार्यरत असतानाच गावचे सरपंच बनले आहेत. एका अभ्यासकाने प्रत्यक्ष प्रशासनात येऊन दिलेले योगदान हे त्यांच्या तळमळीचे प्रतीक आहे. शिक्षणाच्या बळावर विकास साधता येतो याचा एक ‘तळंदगे मॉडेल’ हा आदर्श आहे. सरपंच होण्यापूर्वी संदीप पोळ हे पुणे येथे एका आयटी कंपनीत कार्यरत होते‌. त्यासोबतच पोळ हे पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात राज्यशास्त्र या विषयाचे अध्यापन करत होते.

स्वतःच्या नावापुढे आईच्या नावाचा आग्रह धरणारा पहिला सरपंच 

राज्य सरकारच्या परिपत्रकाच्या आधीपासून स्वतःच्या नावात आईच्या नावाचा उल्लेख करून संपूर्ण गावाने हे करावे, असा आग्रह धरणारे संदीप पोळ राज्यातील पहिले सरपंच आहेत.राज्य सरकारने सन २०२४ मध्ये महिलांच्या सन्मानार्थ प्रत्येक नावात आईचे आणि मग वडिलांचे नाव लावण्याबाबतचे परिपत्रक जाहीर केलेले आहे. पण त्याआधीच सन २०२२ मध्ये निवडणुकीच्या प्रचारात सुद्धा संदीप पोळ यांनी आपल्या आईचं नाव आपल्या नावासह लावून गावाला एक महिला उत्थानाची नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राज्य सरकारने  अशा प्रकारचे परिपत्रक काढणे, ही विशेष कौतुकाची बाब ठरली आहे. 

दरम्यान, पोळ यांनी क्यु. आर.(QR) कोडपासून न्यायालयीन लढ्यापर्यंत ‘डिजिटल ग्रामराज्याची’ पायाभरणी केली आहे. यानुसार तळंदगे ही क्यु. आर‌‌. कोडचा अवलंब करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. याशिवाय रेमंड लक्झरी कॉटन कंपनीकडून ६ कोटी रुपयांच्या कराची मागणी  करत या  कंपनीकडून १८ वर्षांपासून थकलेला ६४ लाख रुपयांचा कर वसूल केला आहे. एमआयडीसीमधील अन्य औद्योगिक कंपन्यांकडून दरवर्षी साधारण ८० लाखांहून अधिक महसूल वाढवून देऊन त्यांनी ग्रामपंचायतीची आर्थिक संपन्नता वाढवली आहे. यामुळेच आज तळंदगे ही स्वावलंबी ग्रामपंचायत म्हणून नावारूपाला आली आहे. याशिवाय गावातील मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण, ‘पाण्याचे शास्त्र’ जल टाकी, ट्रीटमेंट प्लांट आणि १०० टक्के पाणीपुरवठा, ‘शिष्यवृत्तीच्या शिदोरी’च्या माध्यमातून खेळाडू आणि स्पर्धा परीक्षार्थींना थेट प्रोत्साहन देणे, महिलांना नेतृत्व  करण्याची संधी देण्यासाठी  "एक दिवसाची सरपंच" उपक्रम, उद्योग व पर्यावरण यांचा समन्वय, सीसीटीव्ही आणि ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून स्मार्ट व पारदर्शक ग्रामप्रशासन आदी प्रमुख उपक्रमांसह त्यांनी गावात विविध उपक्रम राबविले आहेत.

सरपंच या नात्याने मला जाहीर झालेला हा पुरस्कार म्हणजे हे फक्त एका व्यक्तीचे यश नसून, संपूर्ण गावाच्या स्वाभिमानाचे आणि सरपंचांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक गावकऱ्यांचे यश आहे.

- संदीप गीता अर्जुनराव पोळ, सरपंच, तळंदगे, ता. हातकणंगले.