Government contractor agitation : महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटदार थकीत देयकांच्या मागणीसाठी मंगळवारी राज्यभर निदर्शने करणार!
विविध विभागांतील संपूर्ण शासकीय कंत्राटदार सहभागी होणार : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १८ ऑगस्ट २०२५ :- शासकीय विकासकामाचे कंत्राट मिळाल्याने आज ना उद्या या कामाचे देयक (बिल) मिळेल, या आशेने खिशातून पदरमोड करून सरकारी विकासकामे पूर्ण केली. पण कामे पूर्ण करुनही सरकारकडून या कामांचे हक्काचे पैसे मिळेना झाले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटदारांची हजारो कोटींची देयके सरकारकडे थकली असून, ही देयके न मिळाल्याने कंत्राटदार हतबल झाले आहेत. हे हक्काचे पैसे मिळण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटदार आता आक्रमक पवित्र्यात आले असून त्यांनी आता येत्या मंगळवारी (दि.१९ ऑगस्ट) राज्यभर धरणे आंदोलन आणि निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे.
यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करून जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत.या आंदोलनात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे काँट्रॅक्टर्स असोसिएशन, हॉटमिक्स कॉन्ट्रॅक्टर संघटना, पाणी पुरवठा कंत्राटदार संघटना, मजूर सहकारी संस्था असोसिएशन आणि राज्य अभियंता संघटना आदींसह सर्व शासकीय कंत्राटदार सहभागी होणार असल्याचे पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे रवींद्र भोसले, राज्य कंत्राटदार महासंघाचे सुरेश कडू, बिल्डर्स असोसिएशनचे अजय गुजर, हॉटमिक्स असोसिएशनचे संजीव पंजाबी आदींनी संयुक्तपणे सांगितले.
या थकीत देयकांच्या मागणीसाठी सरकारकडे अनेक वेळा पाठपुरावा केला. धरणे, मोर्चे, निदर्शने आंदोलन केले. एवढेच नव्हे तर केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाही साकडे घातले. तरीही सरकारकडून थकीत देयके दिली जात नाहीत. त्यामुळे शासकीय कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यातूनच आर्थिक विवंचनेतून सांगली जिल्ह्यातील एका सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याने आत्महत्या केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय कंत्राटदार थकीत देयकांच्या मागणीसाठी आक्रमक झाले असल्याचे रवींद्र भोसले यांनी स्पष्ट केले.
