Former governor Dr. D. Y. Patil Passess Away : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन!
महाराष्ट्रातील शैक्षणिक व राजकीय बदलाचा शिल्पकार हरपला : वयाच्या ९२ व्या वर्षी कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ४ ऑगस्ट २०२६ :- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि त्रिपुरा, बिहार व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील ऊर्फ डॉ. डी. वाय. पाटील यांचे मंगळवारी (दि.४) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी कोल्हापूरमध्ये अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पश्चात त्यांचा राजकीय व शैक्षणिक संस्थांचा वारसा त्यांची मुले आणि नातू पुढे चालवत आहेत. त्यांचे पुत्र डॉ. संजय पाटील, माजी राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, विजय डी. पाटील, डॉ. अजिंक्य पाटील तसेच कन्या प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. नंदिता पालशेतकर हे सर्वजण शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. तर त्यांचे नातू व माजी आमदार ऋतुराज पाटील हेदेखील सार्वजनिक आणि राजकीय जीवनात कार्यरत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. डॉ. डी. वाय. पाटील यांनी महाराष्ट्रात व इतरत्र विविध शैक्षणिक संस्थांची स्थापना करत शिक्षणाची ज्ञानगंगा अनेक विद्यार्थ्यांसाठी खुली केली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.
डॉ. डी.वाय. पाटील हे सन १९५७ ते १९६२ या कालावधीत कोल्हापूर शहराचे महापौर होते. त्यानंतर सन १९६७ व १९७२ मध्ये ते कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा विधानसभा मतदार संघामधून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांनी शैक्षणिक संस्थांच्या उभारणीतून नागरीक घडतात व समाजाची उभारणी होते, या धोरणातून राज्यात विविध शैक्षणिक संस्थांचा विस्तार केला.
साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी महापौर ते राज्यपाल असा राजकीय प्रवास केला. दि. २२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील 'अंबाप' या छोट्याशा शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. आपल्या प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर त्यांनी त्रिपुरा आणि बिहारचे राज्यपाल म्हणून यशस्वी कार्यभार सांभाळला. तसेच पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारीही सांभाळली.
शिक्षणाचा प्रसार सर्वसामान्यांपर्यंत व्हावा, या उद्देशाने त्यांनी डॉ. 'डी. वाय. पाटील ग्रुप'ची स्थापना केली. या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी सन १९८३ मध्ये नवी मुंबई येथे रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (RAIT) या पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली. सद्यस्थितीत या ग्रुपअंतर्गत कोल्हापूर, मुंबई आणि पुणे यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये ३ हून अधिक अभिमत विद्यापीठे,६ खाजगी विद्यापीठे आणि १८० हून अधिक शिक्षण संस्थांचे जाळे पसरलेले आहे. वैद्यकीय (medical), अभियांत्रिकी (Engineering), फार्मसी, व्यवस्थापन, आर्किटेक्चर आणि कृषी अशा विविध क्षेत्रांत या संस्थांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
वयाच्या ४५ व्या वर्षी सक्रीय राजकारणातून घेतली निवृत्ती
सन १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. डी. वाय. पाटील यांचा पराभव झाला. या पराभवानंतर त्यांचा राजकारणातील रस कमी झाला. त्यामुळे राजकीयदृष्ट्या ऐन उमेदीच्या काळात वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी त्यांनी सक्रीय राजकारणाचा त्याग केला. मात्र, त्यांनी राजकारणाच्या परिघाबाहेर आपली नवी इनिंग सुरू केली. डॉ. डी. वाय. पाटील यांनी शैक्षणिक संस्था स्थापन करून मध्यमवर्गीय, बहुजन विद्यार्थ्यांसाठीची ज्ञानगंगा खुली केली.
