Ncp Pune district president declared : पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी संभाजी होळकर!
होळकर यांच्याकडे चार तालुक्यांची जबाबदारी : शिवसेना, भाजपच्या धर्तीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचेही एकापेक्षा अधिक जिल्हाध्यक्ष होणार
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ७ जानेवारी २०२६ :- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (पीडीसीसी) संभाजी होळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या नियुक्तीचे पत्र संभाजी होळकर यांना दिले आहे.
दरम्यान, होळकर यांच्याकडे बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या चार तालुक्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. होळकर यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या चार तालुक्यांमुळे शिवसेना, भाजपच्या धर्तीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचेही एकापेक्षा अधिक जिल्हाध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर हे मूळचे बारामती तालुक्यातील होळ या गावचे. होळ गावच्या ग्रामपंचायत सदस्य पदापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. पुढे त्यांनी होळ गावचे सरपंच, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य, पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती, राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तालुकाध्यक्ष आदी विविध पदांवर काम केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून प्रदीप गारटकर यांनी राजीनामा देईपर्यंतच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच जिल्हाध्यक्ष नियुक्त केला जात असे.
शिवसेना, भाजपच्या पावलावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पाऊल
पुणे जिल्ह्यात सध्या शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) दोन किंवा दोनपेक्षा अधिक जिल्हाध्यक्ष आहेत. एकाच जिल्ह्यात दोन किंवा त्याहून जास्त जिल्हाप्रमुख नियुक्त करण्याची परंपरा शिवसेनेने सुरू केली. शिवसेनेच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपने ही प्रथा सुरू केली आहे.
