Educational calendar for Z. P. School teachers : आंबेगाव तालुक्यातील झेडपी शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप!
शिक्षकांसाठी मार्गदर्शक गुरुवर्य शैक्षणिक दिनदर्शिका प्रकाशित : भिमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ७ जानेवारी २०२५ :- आंबेगाव तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती अतिशय अडचणीची, प्रतिकूल असूनही या तालुक्यात कार्यरत असलेले जिल्हा परिषद शाळांचे सर्व शिक्षक हे अनेक आव्हानांचा सामना करत चांगले काम करत आहेत. या शिक्षकांचा मला अभिमान आहे, अशा शब्दांत आंबेगाव पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी रुपाली धोका यांनी आंबेगाव तालुक्यातील झेडपी शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
भिमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानच्या शैक्षणिक दिनदर्शिकेतील माहितीचा उपयोग शिक्षकांना निश्चितच होईल,अशी अपेक्षाही धोका यांनी यावेळी व्यक्त केली. भिमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानच्या गुरुवर्य या शैक्षणिक दिनदर्शिकेचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शारदा प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग येवले महाराज हे होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय शिक्षक महासंघाचे नेते बाळासाहेब झावरे, राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब जगताप, घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार,उद्योगपती सुनिल गावडे, ॲड. संजय आर्विकर, पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे माजी सदस्य दत्तात्रेय वाळुंज आदी उपस्थित होते.
झेडपी शिक्षकांच्या अनोखा उपक्रम
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील दत्तात्रय वाळुंज, नारायण काळे, सुनिल पाटील, नंदकुमार येवले, मच्छिंद्र झांजरे, सुरेंद्र डोके,सुनील बुरसे, किसन शिंगाडे, ईश्वर फदाले, किसन कोंढवळे, आनंद संत, प्रदीप चासकर या शिक्षकांनी भिमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून गुरुवर्य ही शैक्षणिक दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. आंबेगाव तालुक्यातील सर्व शाळांना आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रातिनिधिक स्वरूपात या दिनदर्शिकेचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.
शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमासाठी १ लाख रुपयांची देणगी
भिमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानने गेली आठ वर्षे तालुक्यातील अनाथ, निराधार, दिव्यांग, गरजू मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमासाठी उद्योगपती सुनिल गावडे यांनी शैक्षणिक साहित्य वाटपासाठी रोख १ लाख रुपयांची देणगी यावेळी जाहीर केली.
या दिनदर्शिकेत काय असणार?
या दिनदर्शिकेत शिक्षकांना विविध प्रस्तावांसाठी लागणारी कागदपत्रे, विद्यार्थी लाभाच्या योजना,शिष्यवृत्ती योजना, शैक्षणिक शासन निर्णय, परिपत्रके, राष्ट्रपुरुषांची माहिती, तसेच विविध शैक्षणिक माहितीचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांना ही दिनदर्शिका उपयुक्त ठरणार आहे.
या कार्यक्रमासाठी राज्य संघाचे उपाध्यक्ष महेश बढे, राज्य शिक्षक पुरस्कारप्राप्त बाळासाहेब कानडे, एम.एड.कृती समितीचे अध्यक्ष राजू जाधव, तालुका अध्यक्षा वैशाली गाढवे, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष विनोद ढोबळे, शिक्षक समितीचे नेते सुरेश लोहकरे, शिक्षक पतसंस्थेचे खजिनदार बाळासाहेब साबळे, संचालक बाळासाहेब सैद,दत्ता मेचकर, विकास बाणखेले, पतसंस्थेचे माजी सभापती राजाराम काथेर, उदयकुमार लोंढे, मारुती शिंगाडे, संजीव ढोंगे, निलेश मिडगे, शिक्षक समितीचे पदाधिकारी ठकसेन गवारी,संतोष गवारी, माजी विस्तार अधिकारी प्रभाकर कठाळे, काळूराम भवारी, केंद्रप्रमुख विजय सुरकुले, सुरेश रोंगटे,विजय जंगले,सखाराम गेंगजे, समग्र शिक्षा कर्मचारी ज्योत्स्ना माशेरे, योगेश देशमुख, नारायण चित्ते, राजेश मंदावार, सय्यद सैफ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार येवले यांनी केले. सूत्रसंचालन सुनील पाटील व मचिंद्र झांजरे यांनी केले. सुरेंद्र डोके यांनी आभार मानले.
