जिल्हास्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत झेडपीच्या शिक्षिकेने पटकावला पुणे जिल्ह्यात दुसरा क्रमांक
इयत्ता पहिली, दुसरीच्या वर्गासाठी इंग्रजी विषयाच्या व्हिडिओची निर्मिती : धानोरे शाळेतील शिक्षिकेची कामगिरी

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ४ एप्रिल २०२५ :- जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने इंग्रजी भाषा समजावून सांगता यावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या इंग्रजी विषयाच्या शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत पुणे जिल्हा परिषदेच्या धानोरे शाळेतील शिक्षिका रंजना सोनवणे यांनी जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने विषय निहाय या शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा 2023 मध्ये घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. धानोरे ही राजगुरूनगर (खेड) तालुक्यातील आदर्श जिल्हा परिषद शाळा आहे. दरम्यान शुक्रवारी दि. ४ एप्रिल रोजी रंजना सोनवणे यांचा संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नामदेव शेंडकर, डॉ.प्रभाकर क्षिरसागर, वरीष्ठ अधिव्याख्याता बाळकृष्ण वाटेकर, वरिष्ठ अधिव्याख्यात्या राजश्री तिटकारे, अधिव्याख्यात्या वैशाली बच्छाव आदी उपस्थित होते.