Students from Pune Zilla Parishad school will represent India at the World Robotics Festival : 'ईस्त्रो', 'नासा'नंतर आता पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेचे विद्यार्थी करणार एस्टोनियातील रोबोटिक्स महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व! 

जगातील सर्वात मोठ्या रोबोटिक्स व तंत्रज्ञान महोत्सवासाठी पुणे झेडपी महापालिकेच्या शाळेतील ११ विद्यार्थ्यांची निवड 

Students from Pune Zilla Parishad school will represent India at the World Robotics Festival : 'ईस्त्रो', 'नासा'नंतर आता पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेचे विद्यार्थी करणार एस्टोनियातील रोबोटिक्स महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व! 
पुणे:- आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झालेल्या जिल्हा परिषद व महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व रोबोटिक्स इंडियाच्या संचालक पायल राजपाल.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २० नोव्हेंबर २०२५ :- भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ईस्त्रो) व अमेरिकेमधील नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेनंतर आता पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी जगातील सर्वात मोठ्या रोबोटिक्स आणि तंत्रज्ञान महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यासाठी पुणे जिल्हा परिषद (Pune Zilla Parishad) आणि पुणे महापालिकेच्या ( Pune municipal corporation) शाळेतील अकरा विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होण्यासाठी एस्टोनियाकडे रवाना होणार आहेत.

एस्टोनियात यंदा भरत असलेल्या जगातील जगातील सर्वात मोठ्या  ‘रोबोटेक्स इंटरनॅशनल २०२५’ या  रोबोटिक्स आणि तंत्रज्ञान विषयावरील महोत्सवात हे विद्यार्थी सहभागी होऊन तेथे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. हा महोत्सव येत्या दि. ५ ते ६ डिसेंबर रोजी एस्टोनियातील टालिन (Tallinn) येथे आयोजित करण्यात आला असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी गुरुवारी (दि. २० नोव्हेंबर) सांगितले. 

दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी यंदा सलग चौथ्या वर्षी एमआयटी एटीडी  (MIT ADT) विद्यापीठात झालेल्या ‘रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप २०२५’ मध्ये उत्कृष्ट यश संपादन केले आहे. या स्पर्धेत देशभरातील सुमारे पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी 'एंटरप्रुनरशिप', 'वॉटर रॅली', 'फोक रेस', 'गर्ल्स फायर फायटिंग' आणि 'लाईन फॉलोअर' अशा अत्याधुनिक रोबोटिक्स श्रेणींमध्ये सहभाग घेतला होता, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. 

देशभरातील सरकारी शाळांमधून आलेल्या १ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपैकी या अकरा विद्यार्थ्यांनी डिझाईन, कोडिंग आणि धोरणात्मक विचार व संघभावना या क्षेत्रांतील अपवादात्मक कौशल्यांमुळे स्थान मिळवले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा हिंजवडी (ता. मुळशी),  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीकंद (ता. हवेली), महापालिकेच्या बी.टी. शहाणी नवी हिंद हायस्कूल (भवानी पेठ), राजाराम भीकू पाथरे शाळा (खराडी), डॉ. सायरस एस. पूनावाला इंग्रजी माध्यम हायस्कूल आणि गुरु नानक शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

विद्यार्थ्यांचे हे यश पुण्यातील ग्रामीण व सरकारी शाळेतील शिक्षणव्यवस्थेची ताकद अधोरेखित करते.जी विद्यार्थ्यांना मर्यादित साधनसंपत्ती असूनही नवकल्पना, कौशल्यविकास आणि जागतिक स्वप्ने पाहण्याचे सामर्थ्य देते.पुणे जिल्हा परिषदेच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन कार्यक्रमांमुळे, डिजिटल वर्गांमुळे आणि भविष्याभिमुख कौशल्यांच्या समावेशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा भक्कम पाया तयार झाला आहे. शिवाय सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या भागीदारीमुळे पायाभूत सुविधा उभारल्या गेल्या असून रोबोटिक्स प्रयोगशाळा, शिष्यवृत्ती आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत आहे. त्यामुळे वंचित समुदायांतील प्रतिभावान विद्यार्थी जागतिक दर्जाचे यश मिळवण्यास सक्षम झाले आहेत, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना व्यक्त केले.

प्रखर प्रतिभा भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाते. यांपैकी अनेक विद्यार्थी प्रथमच परदेश प्रवास करीत असून, भारताचे प्रतिनिधित्व एका प्रतिष्ठित जागतिक नवोन्मेष मंचावर करणार असून रोबोटेक्स’ ही केवळ स्पर्धा नसून, नव्या शक्यतांचे दरवाजे उघडणारा आणि जीवनाला कलाटणी देणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुणे जिल्हा परिषद, रोबोटेक्स इंडिया आणि कॉर्पोरेट सीएसआर संस्थांच्या या भागीदारीमुळे एसटीईएम (STEM) शिक्षणात समता प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट साध्य होत आहे. सरकारी व महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग ५० टक्क्यांपेक्षा अधिक ठेवत, विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात ग्रामीण महाराष्ट्राच्या भावी प्रगतीसाठी ही उपक्रममालिका नवा मार्ग खुला करत असल्याचे रोबोटिक्स इंडियाच्या संचालक पायल राजपाल यांनी सांगितले. 

रोबोटिक्स महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी 

१) झेडपी शाळेचे विद्यार्थी 
 
- उदय गावई (झेडपी स्कूल हिंजवडी) 
- स्वरा बाथेवारा ( झेडपी स्कूल हिंजवडी) 
- आरोही रामचंद्र उजगरे (झेडपी स्कूल लोणीकंद)
- सौरभ शरद पडाडुने (लोणीकंद) 

पुणे महापालिका शाळेतील विद्यार्थी 

- देवेश नितेश कदम
- साक्षी जमुना सोनार
- शाहीद मोहम्मद इस्माईल खान
- आरती चव्हाण (सर्व बी.टी‌ शहानी, नव हिंद हायस्कूल, भवानी पेठ)
- शरणमा होसाक्रुब (राजाराम भिकू पठारे शाळा, खराडी)
- अनुष्का वाघमुळे (डॉ. सायरस एस. पूनावाला इंग्रजी माध्यम हायस्कूल) 
- रुद्र गरसे (गुरु नानक स्कूल)


पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील रोबोटेक्स इंटरनॅशनल २०२५ या रोबोटिक्स महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हे ग्रामीण भागातील प्रत्येक बालकात दडलेल्या अफाट क्षमतेचे प्रतीक आहे. प्रतिभा, तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनातील केंद्रित गुंतवणुकीद्वारे पुणे जिल्हा परिषद आपल्या तरुणाईला सीमांच्या पलीकडे स्वप्ने पाहण्यास आणि जागतिक उत्कृष्टतेकडे वाटचाल करण्यास प्रेरित करत आहे. हे आमच्या शैक्षणिक रूपांतरणाच्या सामायिक दृष्टिकोनाचे फलित असून दृढ निश्चय आणि योग्य पाठबळासह प्रत्येक मुलासाठी जगाचा मंच खुला आहे, हे सिद्ध करत आहे. 

- गजानन पाटील, 
मुख्य कार्यकारी अधिकारी, 
जिल्हा परिषद, पुणे.