'MLA's & 'MP's in Maharashtra will become 'Guruji' : ... आता महाराष्ट्रातील आमदार,खासदार होणार 'गुरूजी' अन् सरकारी कर्मचारी, अधिकारी होणार शालेय विद्यार्थी!
सरकारी कार्यालयात येणाऱ्या आमदार, खासदारांना उभे राहून अभिवादन करण्याचा कर्मचाऱ्यांना आदेश
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २१ नोव्हेंबर २०२५ :- महाराष्ट्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना वर्गात शिकविण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला संबंधित वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी एकाच वेळी उभे राहून एकाच सुरात 'एक साथ नमस्ते सर' किंवा गुड मॉर्निंग सर म्हणून अभिवादन करण्याची प्रथा आहे. या प्रथेमागचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांनी गुरजनांचा आदर करावा, हा असतो. जेणेकरून शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांवर आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींचा कायम आदर केला पाहिजे, ही भावना रूजावी, हा असतो, असो. परंतू, आतापर्यंत फक्त शालेय विद्यार्थ्यांवर केले जाणारे हे संस्कार आता सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे सरकारी कार्यालयात येणाऱ्या आमदार व खासदारांना सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी उभे राहून एकसाथ अभिवादन करण्याचा आहे. या निर्णयामुळे यापुढे सरकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक आमदार आणि खासदारांना संबंधित कार्यालयातील सर्व कर्मचारी व अधिकाराऱ्यांना एकाचवेळी उभे राहून अभिवादन करणे अनिवार्य आहे. याचा भंग करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाराऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उगारण्याचा इशाराही सरकारने दिला आहे. यामुळे यापुढे महाराष्ट्रातील आमदार व खासदार हे सरकारी कार्यालयात 'गुरुजीं'च्या तर, सरकारी कर्मचारी व अधिकारी हे शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत, हे वास्तव नाकारता येणार नाही.
राज्यातील आमदार आणि खासदार यांना सरकारी कार्यालयांमध्ये सन्मानाची आणि सौजन्याची वागणूक मिळावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे राज्य सरकारने गुरुवारी (दि. २१ नोव्हेंबर) प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयात (जी.आर.) नमूद केले आहे. या शासन निर्णयात सर्व सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये लोकप्रतिनिधींच्या सन्मानाचे पालन न केल्यास कारवाईचे संकेत आहेत.
उभे राहून अभिवादन करणे अनिवार्य
या नवीन नियमावलीनुसार, जेव्हा एखादे विधानमंडळ किंवा संसद सदस्य सरकारी कार्यालयात भेटीसाठी येतील, तेव्हा त्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना आदराची वागणूक देणे अपेक्षित आहे. इतकेच नव्हे तर, ते कार्यालयात आल्यावर आणिकार्यालयातून परत जाताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या जागेवर उभे राहून त्यांना अभिवादन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय आमदार किंवा खासदारांशी मोबाईलवर बोलतानाही आदरयुक्त भाषा आणि शिष्टाचाराचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आमदार, खासदारांसाठी प्रत्येक महिन्यातील दोन गुरुवार राखीव
आमदार आणि खासदारांच्या भेटीसाठी आणि त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दर महिन्यातील दोन गुरुवार राखीव ठेवले जाणार आहेत. यानुसार दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी दोन तासांची वेळ ही आमदार व खासदारांसाठी राखीव ठेवून त्याची पूर्वप्रसिद्धी करण्याच्या सूचना सर्व विभागप्रमुखांना देण्यात आल्या आहेत.
सरकारी कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेवर प्रोटोकॉलनुसार नावांचे बंधन
दरम्यान, कोणत्याही सरकारी कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत लोकप्रतिनिधींची नावे प्रोटोकॉलनुसार आणि अचूक छापणे आवश्यक आहे. यानुसार स्थानिक आणि राज्यस्तरीय सर्व कार्यक्रमांसाठी त्या त्या जिल्ह्यातील सर्व मंत्री, पालकमंत्री, स्थानिक आमदार, खासदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सरपंच यांना सन्मानाने आमंत्रित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी याची खात्री केल्यानंतरच पत्रिका छापण्याचा आदेश देण्यात आला आहे.
