Municipal Council President Election in Pune district :  नगराध्यक्षपदांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुणे जिल्ह्यातून 'हद्दपार'!

जिल्ह्यातील १७ पैकी १० जागांवर 'घड्याळा'चाच बोलबाला : शिवसेनेकडे चार तर, भाजपकडे तीन नगराध्यक्ष पदे 

Municipal Council President Election in Pune district :   नगराध्यक्षपदांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुणे जिल्ह्यातून 'हद्दपार'!
पुणे:- जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २१ डिसेंबर २०२५ :-  पुणे जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत 'महायुती'ला आतापर्यंतच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच १०० टक्के यश आले आहे.  महायुतीने नगराध्यक्ष पदाच्या सर्वच्या सर्व १७ जागांवर विजय मिळविला आहे. यापैकी तब्बल १० जागा पटकावत जिल्ह्यात 'घड्याळा'चाच बोलबाला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निकालातून दाखवून दिले आहे.

याऊलट कॉंग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीचा मात्र सुपडासाफ झाला आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला भोपळाही फोडता आला नाही. परिणामी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातून कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुर्णपणे 'हद्दपार' झाला आहे. या निकालाने एकेकाळी शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे. 

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील एकूण १७ नगराध्यक्ष पदांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला १०, शिवसेनेला चार आणि भारतीय जनता पक्षाला (भाजप) तीन नगराध्यक्ष पदे मिळाली आहेत. जिल्ह्यातील १४ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतीसाठी अनुक्रमे दि. २ डिसेंबर आणि दि.२० डिसेंबर रोजी मतदान झाले होते. या सर्व नगरपालिका व पंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी (दि.२१ डिसेंबर) सकाळी दहा वाजत सुरू करण्यात आली आणि मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठीच्या नगराध्यक्ष पदासाठी एकूण ११९ उमेदवार रिंगणात होते. पालकमंत्रीअजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात दबदबा कायम राखत जिल्ह्यात आपणच 'दादा' असल्याचे दाखवून दिले आहे. 

सासवड नगरपालिका पहिल्यांदाच भाजपच्या ताब्यात 

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदी आतापर्यंत कॉंग्रेसचा नगराध्यक्ष निवडून येत असे. मात्र यंदा पहिल्यांदाच सासवड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे नवनियुक्त नगराध्यक्षा आनंदी जगताप या सासवड नगरपालिकेच्या भाजपच्या पहिल्या नगराध्यक्ष ठरल्या आहेत. पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने हा बदल झाला आहे. 

माळेगांव बुद्रुक राष्ट्रवादी काँग्रेस तर, मंचर शिवसेनेकडे 

दरम्यान, जिल्ह्यातील माळेगांव बुद्रुक (ता. बारामती) आणि मंचर (ता. आंबेगाव) या दोन नगरपंचायतींसाठी यंदा पहिल्यांदाच निवडणूक झाली. या निवडणुकीत माळेगांव बुद्रुक नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस तर, मंचर नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला आहे.

फुरसुंगी-ऊरळी देवाची नगरपालिकेचा पहिला नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा

पुणे शहरातील असलेल्या आणि नव्यानेच स्थापन झालेल्या फुरसुंगी-ऊरळी देवाची या नगरपालिकेची ही पहिली सार्वत्रिक निवडणूक होती. या निवडणुकीत नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष सरोदे निवडून आले आहेत. त्यामुळे या नगरपालिकेचा पहिला नगराध्यक्ष होण्याच मान संतोष सरोदे यांना मिळाला आहे. 

पुणे जिल्ह्यातील नगरपालिकांचे निवडून आलेले नगराध्यक्ष (कंसात पक्ष) 

१) नगरपालिका 

- बारामती ---  सचिन सातव  (राष्ट्रवादी काँग्रेस).

- लोणावळा ---  राजेंद्र सोनवणे ( राष्ट्रवादी काँग्रेस).

- तळेगाव दाभाडे --- संतोष दाभाडे ( भाजप).

- दौंड --- दुर्गादेवी जगदाळे  (राष्ट्रवादी काँग्रेस). 

- चाकण --- मनीषा सुरेश गोरे (शिवसेना)

- शिरूर ---  ऐश्वर्या पाचरणे (राष्ट्रवादी काँग्रेस). 

- इंदापूर ---  भरत शाह  (राष्ट्रवादी काँग्रेस). 

- सासवड --- आनंदीकाकी जगताप (भाजप).

- जेजुरी ---  जयदीप बारभाई (राष्ट्रवादी काँग्रेस). 

- भोर --- रामचंद्र आवारे (राष्ट्रवादी काँग्रेस). 

- आळंदी ---  प्रशांत कुऱ्हाडे (भाजप)

- जुन्नर - सुजाता काजळे (शिवसेना)

- राजगुरुनगर - मंगेश गुंडाळ (शिवसेना)

- उरुळी-फुरसुंगी --- संतोष सरोदे (राष्ट्रवादी काँग्रेस). 

२) नगरपंचायतींचे नवे नगराध्यक्ष 

- वडगाव मावळ --- अबोली ढोरे (राष्ट्रवादी काँग्रेस). 

- मंचर ---  राजश्री गांजाळे (शिवसेना). 

- माळेगाव बुद्रुक --- सुयोग सातपुते (राष्ट्रवादी काँग्रेस).