पुणे शहरातील महंमदवाडी-उंड्री प्रभागाचा सर्वांगिण विकास करु, पायाभूत सुविधांची प्रलंबित कामे मार्गी लावू!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जालिंदर कामठे यांचे नागरिकांना आश्वासन : होळकरवाडी गावातील रस्त्याच्या कामाचे उद्घाटन
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १६ ऑक्टोबर २०२५ :- पुणे महापालिकेच्या महंमदवाडी उंड्री या प्रभागातील प्रलंबित विकासकामे त्वरीत मार्गी लावण्यात येतील आणि येथील नागरिकांना सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या प्रभागाचा सर्वांगिण विकास हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्येय असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी येथील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सांगितले.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या होळकरवाडी गावातील कानिफनाथ रस्त्याशेजारील अंतर्ग रस्त्याचे उद्घाटन पुणे उद्घाटन कामठे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले, माजी नगरसेवक फारुख इनामदार, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत भाडळे, दीपक बांदल, सुरेश झांबरे, संतोष हिंगे, गणेश झांबरे, योगेश हिंगे,विजय होळकर, भरत खोटे, राजेंद्र खोटे, शिवम झांबरे, तुषार खोटे, अमित खोटे, अनिल खोटे, सोमनाथ होळकर, नवनाथ खोटे, बाळासाहेब झांबरे, ज्ञानेश्वर खोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कामठे पुढे म्हणाले, " महंमदवाडी- उंड्री या प्रभागातील प्रलंबित असलेली अनेक कामे ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे. या प्रभागातील नागरिकांना सध्या अनेक मूलभूत नागरी समस्यांना न तोंड द्यावे लागत आहे. या परिसरात अनेक नामांकित शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. मात्र अरुंद रस्त्यांमुळे नागरिकांना, विद्यार्थ्यांना, कामगार वर्गाला वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. सांडपाणी व्यवस्थापन, पाणी, वीज यासारख्या समस्यांचा अभाव आहे. या सर्व समस्या सोडवण्यासाठी तसेच या भागात नवीन उद्याने, क्रीडांगणे, अद्ययावत हॉस्पिटल,मेट्रो यासारख्या सुविधा निर्माण करण्यासाठी अजित पवार यांच्या माध्यमातून अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल.या निधीच्या माध्यमातून या प्रभागाचा सर्वांगिण विकास करु आणि त्यातूनच हा प्रभाग सर्वोत्कृष्ट केला जाईल."
