टपरीचालक ते विधानसभा उपाध्यक्ष, असा झाला अण्णा बनसोडे यांचा राजकीय प्रवास!

पुणे झेडपीचे माजी अध्यक्ष जालींदर कामठे मित्रपरिवार व हॉटेल सुभद्रा कट्टातर्फे बनसोडे यांचा सत्कार 

टपरीचालक ते विधानसभा उपाध्यक्ष, असा झाला अण्णा बनसोडे यांचा राजकीय प्रवास!
पुणे:- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा जाहीर सत्कार करताना माजी आमदार उल्हास पवार व पुणे झेडपी चे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे आणि त्यांचे मित्रमंडळ

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १३ एप्रिल २०२५ :-  "मीसुद्धा अन्य सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच पिंपरी- चिंचवडचा नागरिक होतो. त्यामुळे सुरुवातीला जगण्याचे साधन म्हणून मी टपरी टाकली आणि पिंपरी-चिंचवडमधील  टपरीचालक झालो. एक टपरीधारक अशी या शहरातील माझी ओळख होती. पण आज मी राज्याच्या विधानसभेचा उपाध्यक्ष झालो आहे. त्यामुळे माझा आतापर्यंतचा जीवनप्रवास हा एक टपरीचालक ते विधानसभा उपाध्यक्ष असा झाला आहे. हे सर्व शक्य झाले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे, अशा शब्दांत भावनिक होत खुद्द विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी त्यांच्याच शब्दांत रविवारी त्यांचा आजपर्यंतचा राजकीय जीवनप्रवास उलगडून दाखविला. यासाठी निमित्त होते ते पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे मित्रपरिवार आणि डेक्कन येथील हॉटेल सुभद्रा कट्टातर्फे आयोजित सत्कार समारंभाचे. 

श्री. बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जालिंदर कामठे मित्रमंडळ आणि हॉटेल सुभद्रा कट्टातर्फे बनसोडे यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मुरलीधर निंबाळकर, देहू देवस्थानचे अध्यक्ष ह.भ. प. जालिंदर मोरे, शेखर महाराज कुटे, रमेश खांदवे, मारुती किंडरे  , विजय कदम, सतीश मोहोळ, संजय उभे, दिलीप मेदगे, महेश ढमढेरे, बापू घाडगे  विश्वस्त विक्रम मोरे,भाऊ महाराज फुरसुंगीकर,राजू थोरात, संजय जावळकर, गणेश गावंडे, संजय शिरोळे, संजय वाल्हेकर, केदार बराटे आणि मित्रपरिवार उपस्थित होता.

बनसोडे पुढे म्हणाले, "मी कसा मोठा झालो, मी कसा घडलो, हे सांगताना जुन्या आठवणी दाटून येत आहेत. कारण मी एक पानटपरी चालक होतो. परंतू उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे नेतृत्व मान्य करत मी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर पहिल्यांदा प्रथम मी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक झालो. त्यानंतर पिंपरी विधानसभेचा आमदार  झालो आणि आता विधानसभेचा उपाध्यक्ष झालो आहे. त्यामुळे अजित पवार यांचे ऋण मी आयुष्यभर विसरू शकत नाही. ही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. आपल्या सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असणार आहे. मला मिळालेल्या या पदाचा नक्कीच मी महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचे,सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडविण्यासाठी  प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे."

यावेळी प्रमुख पाहुणे बोलताना डेक्क उर्वरित उल्हास पवार म्हणाले, "अण्णा बनसोडे हा एक सामान्य कार्यकर्ता आहे. आज त्यांचा केलेला सन्मान हा कार्यकर्त्यांनी एका कार्यकर्त्याचा केलेला सन्मान आहे."