वृद्ध माता-पित्यांना स्वतःची मुलेच करताहेत निराधार, मुलगा म्हणून आधार देण्याऐवजी काढताहेत घराबाहेर!
पुणे जिल्ह्यातील अशा घटनांमध्ये मोठी वाढ : निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यामुळे ४२ वृद्धांना पुन्हा मिळाला घराचा आधार

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १२ एप्रिल २०२५ :- वंशाला दिवा असावा म्हणून मुलगा हवाच, ही मानसिकता अगदी एकविसाव्या शतकातही पुर्वीप्रमाणे पाहायला मिळत आहे. या मानसिकतेतून मुलांच्या हव्यासापोटी मुलींना गर्भात असतानाच मारण्याच्या कित्येक घटनाही घडल्या आहेत. पण ज्या वंशाच्या दिव्यासाठी खस्ता खाल्ल्या. तेच वंशाचे दिवे म्हणजे मुले ही सांभाळण्याची झंजट नको, या मानसिकतेतून वृध्द माता-पित्यांना घराबाहेर काढत असल्याच्या घटनांमध्ये पुणे जिल्ह्यात मोठी वाढ होऊ लागली आहे.
गेल्या अवघ्या साडेतीन महिन्यांत पुणे जिल्ह्यातील तब्बल ४२ वृद्ध आई-वडिलांना मुलांनीच घराबाहेर काढून त्यांना निराधार केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दरम्यान, पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी आई-वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलांच्या विरोधात कायद्याचा बडगा उगारत या ४२ वृद्धांना पुन्हा घराचा आधार मिळवून दिला आहे.
मुळशी धरण परीसरातील वांद्रे, भोरकस येथील भैरवनाथ करंजाई मंदिर परिसरात जेष्ठ नागरिकाच्या सत्कार समारंभाचे सोहळा आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे उपस्थित होते. चांदेरे यांनी यावेळी बोलताना ही वस्तुस्थिती समाजासमोर आणली आहे. माजी सरपंच व उद्योजक विजय ढमाले यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमात वांद्रे, भोरकस आणि परीसरातील सर्व जेष्ठ नागरीकांचा कपडे,साडी,शाल, श्रीफळ व पेढे देऊन सत्कार करण्यात आला. चांदेरे पुढे म्हणाले, " गेल्या जानेवारी ते एप्रिल या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांचेकडे ४२ वृध्दांनी मुलांनीच घराबाहेर काढल्याबाबतच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. यानुसार कदम यांनी वृध्द नागरीक निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ या कायद्यातील तरतुदीनुसार या ४२ वृध्द जोडप्यांना मुलांकडून त्यांची घरं परत मिळवून दिली. आहेत. प्रत्येक महिन्याला अशा प्रकारच्या किमान २५ तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत आहेत. हे भिषण वास्तव आहे. त्यामुळे विजय ढमाले यांनी आयोजित केलेला हा जेष्ठ नागरीक सत्कार सोहळा हा कौतुकास्पद आहे."
या कार्यक्रमाला माजी सभापती कोमल वाशिवले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष अंकुश मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन खैरे, मार्केट कमिटीचे संचालक राम गायकवाड, दिपाली कोकरे, अनंता वाशिवले, खेचरे गावच्या सरपंच सुरेखा तोंडे, सरपंच रमेश पडवळ, पोलीस पाटील प्रकाश ढमाले, चेअरमन अनंता ढमाले, धुळाभाऊ कोकरे, माजी सरपंच व्यंकटराव आल्हाट, अभिजित ढमाले, मुकेश लोयरे,नितीन लोयरे आदी उपस्थित होते.
...अशा मुलांवर कडक कारवाई करा - सुनील चांदेरे
ज्यांनी आपल्याला जन्म देऊन, हे जग दाखवलं, एवढेच नव्हे तर आपल्या माघारी आपल्या मुलाला सुखी आयुष्य जगता यावे, या उद्देशाने आयुष्यभर खस्ता खाल्ल्या. त्याच जन्मदात्यांना वृद्धत्वात मुलांनी आधार देण्याची खरी गरज आहे. पण त्यांना आधार न देता घराबाहेर काढून निराधार करत असतील तर, अशा मुलांवर कायदेशीर कडक कारवाई करावी, अशी मागणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी यावेळी बोलताना केली.