A family representing ZP for 60 years : जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सलग ६० वर्षे प्रतिनिधित्व करणारे 'गावडे' कुटुंब! 

देशातील एकमेव कुटुंब  : जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून आजतागायत सलग प्रतिनिधित्व करण्याचा नवा विक्रम

A family representing ZP for 60 years : जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सलग ६० वर्षे प्रतिनिधित्व करणारे 'गावडे' कुटुंब! 
पुणे:- माजी आमदार पोपटराव गावडे कुटुंबातील माजी जिल्हा परिषद सदस्य अनुक्रमे पोपटराव गावडे, स्व‌. सोनभाऊ गावडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे आणि माजी सदस्या सुनीता गावडे.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १५ फेब्रुवारी २०२६ :- जिल्हा परिषद निवडणूक म्हटलं की, दर पाच वर्षांनी बदलणारा गट ( जिल्हा परिषद मतदारसंघ) आणि प्रत्येक गटाचं बदलणारं आरक्षण हे ठरलेलं. त्यामुळे लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघाप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकाच कुटुंबाला सलग प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे तसे दुर्मिळच.पण याला पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील गावडे कुटुंब अपवाद ठरले आहे. जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून आजतागायत (सन २०२६) म्हणजेच सलग ६० वर्षे या कुटुंबातील कोणी ना कोणी सदस्य सलगपणे जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचे प्रतिनिधित्व करत आहे. पंचायतराज संस्थांवर एवढे प्रदीर्घ काळ प्रतिनिधित्व करणारे 'गावडे' हे देशातील एकमेव ठरले आहे. यामुळे देशातील पंचायतराज संस्थांवर प्रदीर्घ काळ प्रतिनिधित्व करणारे कुटुंब म्हणून या कुटुंबांच्या नावावर नवा विक्रम नोंदला गेला आहे. 

नुकत्याच झालेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा विजयी होत, या कुटुंबातील सदस्य राजेंद्र गावडे यांनी यापुढेही कुटुंबाची परंपरा कायम ठेवली आहे. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे हे शिरूर तालुक्यातील कवठे यमाई या जिल्हा परिषद गटातून निवडून आले आहेत. शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे हे कुटुंब आहे. 

आतापर्यंत या कुटुंबातील कुटुंबप्रमुख पोपटराव गावडे, त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव स्व. सोनुभाऊ गावडे, ज्येष्ठ स्नुषा सुनिता गावडे यांनी अनुक्रमे पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे. माजी आमदार पोपटराव गावडे यांनी तर, टाकळी हाजी गावचे सरपंच, पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य आदी पदांवर काम केले आहे. ते सन १९६२ मध्ये सरपंच झाले व लगेचच सहा महिन्यांनी पंचायत समिती सदस्य झाले. त्यानंतर त्यांनी ११ वर्षे उपसभापती, 
९ वर्षे सभापतीपदी काम केले. सन १९६७ ला ते पहिल्यांदा प्रथम जिल्हा परिषद सदस्य झाले. पुढे सन १९९५ पर्यंत जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यानंतर सन १९९७ मध्ये ज्येष्ठ चिरंजीव स्व. सोनभाऊ गावडे हे जिल्हा परिषद सदस्य झाले. 
तसेच स्नुषा सुनीता गावडे यांनी  पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीचे सभापती आदी विविध पदांवर काम केले आहे. दरम्यान, पोपटराव गावडे यांचे दुसरे चिरंजीव राजेंद्र गावडे हे नुकत्याच झालेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कवठे यमाई या सर्वसाधारण गटातून निवडून आले आहेत. 

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य व्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा परिषदेची स्थापना सन १९६२ मध्ये झाली. यामुळे महाराष्ट्रात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ही त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था  अस्तित्वात आली. दरम्यान, ही पंचायतराज व्यवस्था अस्तित्वात येण्याच्या आधीपासूनच माजी आमदार पोपटराव गावडे हे टाकळी हाजी गावचे सरपंच म्हणून कार्यरत होते. पंचायत समितीच्या पहिल्या निवडणुकीत ही निवडणूक लढविण्यास केवळ सरपंच हेच पात्र असत. यानुसार पोपटराव गावडे हे शिरूर पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि त्यात ते निवडून आले. पंचायत समितीवर निवडून आल्यानंतर पंचायत समितीच्या सभापतीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. पुढे पोपटराव गावडे हे जिल्हा परिषद सदस्य आणि त्यानंतर शिरूरचे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले.

सन १९६२ पासून ते सन २०२६ पर्यंतच्या कार्यकाळात सलगपणे गावडे कुटुंबाने सातत्याने जनतेचा विश्वास जिंकत प्रतिनिधित्व कायम टिकवून ठेवले आहे. त्यामुळे या कुटुंबाची ही केवळ राजकीय कामगिरी नाही तर, लोकसेवेच्या परंपरेची निर्माण केलेली प्रेरणादायी कहाणी ठरली आहे. या कुटुंबातील चार सदस्यांनी वेगवेगळ्या काळात जिल्हा परिषद सदस्य, सभापती तसेच पंचायत समिती सदस्य व सभापती अशी विविध पदे भूषविली आहेत. परंतु त्यांची ही ओळख केवळ पदांपुरती मर्यादित राहिली नसून ती गावागावांत केलेल्या विविध विकासकामांमुळे आणि जनतेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यांमुळे दृढ झाली आहे. 

शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी अगदी सरपंच पदावर कार्यरत असल्यापासून म्हणजेच सन १९६० च्या दशकात ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उभ्या करण्याचा पाया घातला. त्या काळात रस्ते,पाणीपुरवठा, प्राथमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य सुविधा या मूलभूत गरजा होत्या. त्यांनी प्रशासनाशी समन्वय साधत अनेक विकासकामांना गती दिली. त्यांच्या कार्यपद्धतीत प्रामाणिकपणा, साधेपणा आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन होता. त्यामुळेच जनतेने त्यांच्यावर पुन्हा पुन्हा विश्वास दाखवला आणि त्यांना कायम मतरुपी पाठिंबा दिला. पोपटराव  गावडे यांनी सन १९६२ पर्यंत टाकळी हाजी गावचे सरपंच, सन १९६२ ते १९६७ या कालावधीत शिरूर पंचायत समितीचे सदस्य व सभापती म्हणून काम केले. त्यानंतर सन १९६७ मध्ये झालेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या निवडणुकीत पोपटराव गावडे हे कॉंग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी सलग ३० वर्षे टाकळी हाजी या जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर ते शिरूरमधून आमदार झाले.

पोपटराव गावडे आमदार झाल्यानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव सोनभाऊ गावडे हे सन १९९७ मध्ये टाकळी हाजी- कवठे येमाई गटातून पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य झाले. सोनभाऊ गावडे यांनी सन २००७ पर्यंत सलग १० वर्षे या जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व केले. सोनभाऊ गावडे यांच्यानंतर सोनभाऊंच्या पत्नी आणि पोपटराव गावडे यांच्या ज्येष्ठ स्नुषा सुनिता गावडे या सन २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत टाकळी हाजी जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेच्या सदस्या झाल्या. याच कार्यकाळात पहिल्या अडीच वर्षांच्या कालखंडात सुनीता गावडे यांनी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी काम केले. पाच वर्षे जिल्हा परिषदेत काम केल्यानंतर सन २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत सुनीता गावडे या शिरूर पंचायत समितीच्या सदस्यपदी निवडून आल्या आणि त्यांनी या पंचायत समित्याच्या सभापती पदीही काम केले. त्यानंतर सन २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सुनीता गावडे या दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून आल्या. त्या सन २०२२ पर्यंत जिल्हा परिषद सदस्य होत्या. 

दरम्यान, ज्येष्ठ चिरंजीव सोनभाऊ गावडे यांनी शिक्षण आणि शेती विकासावर भर देत जिल्हा परिषद शाळांसाठी नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम, इमारतींचे नूतनीकरण, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा निर्माण केल्या तर, सुनिता गावडे यांनी गावपातळीवरील योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. ग्रामीण रस्ते, जलसंधारण, महिला बचतगटांना प्रोत्साहन व युवकांसाठी कौशल्यविकास कार्यक्रम राबवून त्यांनी विकासाला लोकाभिमुख दिशा दिली. याशिवाय आधुनिक काळाशी सुसंगत दृष्टिकोन ठेवत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शक कारभार, शासकीय योजनांची ऑनलाइन माहिती आणि लाभार्थ्यांपर्यंत थेट लाभ पोहोचविणे या बाबींवर भर दिला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम, युवकांना उद्योग-व्यवसायासाठी मार्गदर्शन आणि पर्यावरण संवर्धनासाठी मोहिमा राबवून त्यांनी ग्रामीण विकासाला नवी उंची मिळवून दिली.

या कुटुंबाच्या आजपर्यंतचया प्रवासात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी कधीही सत्तेला ध्येय मानले नाही. सेवा हेच त्यांचे ध्येय राहिले. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याने आपापल्या काळातील आव्हाने स्वीकारली व त्यावर उपाययोजना केल्या. बदलत्या राजकीय परिस्थितीतही त्यांनी आपली विश्वासार्हता कायम टिकवून ठेवली.कारण  त्यांचे राजकारण हे व्यक्तीपुजेपेक्षा कार्यकेंद्रित राहिले. सुमारे सहा दशकांचा हा प्रवास लोकशाहीतील सातत्य, परंपरा आणि नवोन्मेष यांचा संगम दर्शवत आहे. 

गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत विकासाचा ध्यास घेणाऱ्या गावडे कुटुंबाने  जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी केवळ आश्वासने पुरेशी नसतात. त्यासाठी सातत्यपूर्ण काम, उपलब्धता आणि पारदर्शकता आवश्यक असते, हे दाखवून दिले आहे. आज २०२६ मध्ये उभे राहून मागे वळून पाहिले असता, सन  १९६२ पासून सुरू झालेली ही लोकसेवेची परंपरा ही केवळ गावडे या एका कुटुंबाची कहाणी नसून खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाची गाथा आहे. अशा सातत्यपूर्ण आणि सकारात्मक कार्यामुळेच हे कुटुंब स्थानिक स्वराज्य व्यवस्थेत आदर्श मानले जात आहे. या कुटुंबाचा आजपर्यंतचा हा प्रवास पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचे कमळ फुलविले 

पुर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे आणि त्यातही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेले हे गावडे कुटुंब आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर हे कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची एकनिष्ठ राहूनही नुकत्याच झालेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पोपटराव गावडे यांचे चिरंजीव राजेंद्र गावडे यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे गावडे कुटुंबाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. तसं पाहिलं तर कवठे यमाई हा जिल्हा परिषद गट म्हणजे कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा. एका अर्थाने हा गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्लाच‌. पण या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात  पोपटराव गावडे यांनी जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या तिकिटावर सुद्धा चिरंजीव राजेंद्र गावडे व पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणले आहे. या विजयातून पोपटराव गावडे यांनी कवठे यमाई गट म्हणजे पोपटराव गावडे आणि पोपटराव गावडे म्हणजेच कवठे यमाई हे एकसंध सूत्र असल्याचे दाखवून दिले आहे. 

दरम्यान, या निवडणुकीत वयाच्या ८५ व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धोका दिल्याची सल पोपटराव गावडे यांच्या मनात होती. त्यातूनच त्यांनी, पक्षाने मला धोका दिलाय, तुम्ही मला साथ द्या, असे आवाहन मतदारांना करत कवठे यमाई गटात भाजपचे कमळ फुलविले आहे. आमच्या कुटुंबाने आयुष्यभर ज्या पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले. त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद निवडणुकीत ऐनवेळेस डावलले. त्यामुळे विरोधकाला जवळ केले. जनतेच्या आग्रहाखातर भाजप पक्षात जाऊन निवडणूक लढविली. येथील जनतेने ६४ वर्षे आमच्यावर ठेवलेला विश्वास पुन्हा नव्याने सिद्ध करून दाखविला असल्याचे मत माजी आमदार पोपटराव गावडे यांनी या विजयानंतर व्यक्त केले आहे.

सरपंच ते आमदार पदापर्यंत प्रवास

दरम्यान, पोपटराव गावडे यांनी त्यांचा राजकीय प्रवास हा टाकळी हाजी गावचे ग्रामपंचायत सदस्य या पंचायतराज व्यवस्थेतील गाव पातळीपासून सुरू केला होता. पुढे ते सरपंच झाले. पंचायतराज व्यवस्थेतील तीनही पातळ्यांवर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद काम केल्यानंतर आमदार झालेले गावडे हे एकमेव व्यक्ती ठरले आहेत.