... आता मध्यमवर्गीयांचे महानगरांतील हक्काच्या घराचे स्वप्न हे स्वप्नच राहणार, राज्यात रेडीरेकनेरच्या दरात वाढ!

राज्यात सरासरी ४.३९, पुण्यात ४.१६ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ६.६९ टक्क्यांची वाढ : पुणे शहरापेक्षा आता पिंपरीत घरे महाग होणार 

... आता मध्यमवर्गीयांचे महानगरांतील हक्काच्या घराचे स्वप्न हे स्वप्नच राहणार, राज्यात रेडीरेकनेरच्या दरात वाढ!
पुणे:- रेडीरेकनरनुसार खरेदी केलेल्या जागेवरील बांधकाम

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १ एप्रिल २०२५ :-  महाराष्ट्रातील रेडिरेकनरच्या दरात राज्य सरकारने दोन वर्षांच्या खंडानंतर यंदाच्या आर्थिक वर्षात मात्र रेडीरेकनरच्या दरात वाढ केली आहे. यानुसार राज्यात सरासरी ४.३९ पुणे  शहरात ४.१६ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ६.६९ टक्क्यांनी रेडीरेकनरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे आता मध्यमवर्गीयांचे राज्यातील विविध महानगरांमधील मालकी हक्काच्या घराचे स्वप्न हे स्वप्नच राहणार, असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पुणे शहरापेक्षा आता पिंपरीत घरे महाग होणार आहेत.
 
राज्य सरकार दरवर्षी नवीन आर्थिक वर्षात टक्केवारीच्या प्रमाणात क्षेत्रनिहाय रेडीरेकनरच्या दरात वाढ करत असते. ही नवी दरवाढ दरवर्षी  १ एप्रिलपासून लागू होत असते. यानुसार ही नवी दरवाढ मंगळवारपासून (दि. १ एप्रिल) लागू करण्यात आली आहे. मुंबई वगळता अन्य महापालिका क्षेत्रांत सरासरी सहा टक्के वाढ करण्यात आली आहे. मुंबईत ३.३९, पुण्यात ४.१६, तर ठाण्यात ७.७२ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. याआधीच्या दोन वर्षांत रेडीरेकनरच्या दरात कसलीही वाढ करण्यात आली नव्हती. याआधी तीन वर्षांपूर्वी म्हणजेच सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात ५ टक्के वाढ करण्यात आली होती. 

दरम्यान, रेडिरेकनरच्या दरात वाढ झाल्याने आता महानगरांमधील मालमत्तांचे दर वाढणार आहेत. शिवाय मालमता खरेदीदारांवर त्याचा अधिकचा बोजा पडणार आहे. परिणामी महानगरांमध्ये स्वतःच्या मालकीचे घर खरेदी करणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे. 

रेडीरेकनर दर म्हणजे काय? 

एखाद्या भागातील जमीनीची किमान आधारभूत किंमत निश्चित करणे म्हणजेच रेडीरेकनर दर होय. हा दर संबंधित भागातील प्रती चौरस फूटनिहाय निश्चित केला जातो. रेडीरेकनर दरामुळे संबंधित भागातील जमीनीची किमान किंमत कळण्यासाठी मदत होत असते. पण रेडीरेकनरचे दर वाढले म्हणजेच त्या भागातील जमीनीचे दर वाढणे असा सरळ अर्थ आहे. रेडीरेकनर दराला सर्कल रेट किंवा  मार्गदर्शन मूल्य असेही म्हणतात.

रेडिरेकनरमधील क्षेत्रनिहाय वाढ (टक्केवारीत) 

- ग्रामीण क्षेत्र ---- ३.३६ 

- प्रभाव क्षेत्र ---- ३.२९

- नगर परिषद/ नगरपंचायत ---- ४.९७

- महापालिका (मुंबई महापालिका वगळून) ---- ५.९५

- मुंबई महापालिका --- ३.३९ 

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील रेडीरेकनरची  दरवाढ (टक्केवारीत) 

पुणे --- ४.१६ 
पिंपरी -चिंचवड --- ६.६९
ठाणे --- ७.७२
मीरा भाईंदर --- ६.२६
कल्याण- डोंबिवली --- ५.८४
नवी मुंबई ---- ६.७५
उल्हासनगर --- ९.००
भिवंडी- निजामपूर --- २.५०
मालेगाव --- ४.८८
धुळे --- ५.०७
जळगाव --- ५.८१
अहिल्यानगर--- ५.४१
छत्रपती संभाजीनगर --- ३.५३
नांदेड वाघाळा --- ३.१८ लातूर --- ४.०१
परभणी --- ३.७१
जालना --- ४.०१ 
नागपूर --- ४.२३ 
नागपूर एनएमआरडीए --- ६.६०
कोल्हापूर ---- ५.०१
चंद्रपूर ---- २.२०
इचलकरंजी --- ४.४६ 
चंद्रपूर म्हाडा ---- ७.३०
सोलापूर --- १०.१७
अमरावती --- ८०३
नाशिक --- ७.३१.  अकोला --- ७.३९
वसई विरार --- ४.५०
पनवेल --- ४.९७
सांगली-मिरज-कुपवाड --- ५.७०

राज्यातील  रेडिरेकनरचे मागील दोन वर्षे स्थिर होते. त्यामुळे त्यात यंदा वाढ करण्यासाठी २०२२ ते २०२४ पर्यंतच्या दस्त नोंदणीची माहिती घेण्यात आली. त्याची सरासरी लक्षात घेऊन ही वाढ प्रस्तावित करण्यात आली होती‌. तरीही ही वाढ मागील वेळच्या वाढीच्या तुलनेत कमीच आहे. 

रवींद्र बिनवडे, 
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य.