Contributor to the history of wrestling around the world : जगभरातील कुस्तीचा तब्बल १९० वर्षांचा इतिहास जतन करणारा  'अवलिया'!

देश-विदेशातील कुस्त्यांच्या  दुर्मिळ क्षणांचा अनमोल ठेवा जपला : विविध कुस्त्यांची आठ हजारांहून अधिक दुर्मिळ छायाचित्रे संग्रही

Contributor to the history of wrestling around the world : जगभरातील कुस्तीचा तब्बल १९० वर्षांचा इतिहास जतन करणारा  'अवलिया'!
पुणे:- आंतरराष्ट्रीय किर्तीचे कुस्ती समीक्षक व लेखक बलबीरसिंह कंवल यांना लंडन येथे निवडक संग्रह दाखवताना अशोक जाधव.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि‌. ५ ऑक्टोबर २०२५ :- समाजातील अनेकांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा छंद असतो‌. आपला छंद जोपासण्यासाठी काही जण अगदी जीवाचे रान करत असतात‌.याचाच प्रत्यक्ष प्रत्यय पुणे जिल्ह्यातील एका माजी कुस्तीपटूने आणून दिला आहे. यासाठी या माजी कुस्तीपटूने आपल्या कुस्ती या खेळाच्या आवडीपायी चक्क जगभरातील कुस्तीचा तब्बल १९० वर्षांचा इतिहास जतन केला आहे. यासाठी त्यांनी चक्क आपले आयुष्य समर्पित केले आहे.

या माजी कुस्तीपटूने गेल्या चार दशकांपासून देश-विदेशातील तब्बल १९० वर्षांच्या कुस्तीच्या इतिहासाचे साक्षीदार ठरलेल्या दुर्मिळ क्षणांचा अनमोल ठेवा जपला आहे. यामध्ये सन १८३५ पासूनची जगभरातील प्रख्यात मल्लांची आणि गाजलेल्या कुस्त्यांची आठ हजारांहून अधिक दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह केला आहे. 

जगभरातील कुस्तीचा १९० वर्षांचा इतिहास छायाचित्रांच्या माध्यमातून जतन करणारा हा 'अवलिया' पुणे जिल्ह्यातील  तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथील माजी कुस्तीपटू आहे.अशोक जाधव असे या 'अवलिया'चे नाव आहे. जाधव यांनी जणू त्यांचे आयुष्यच या छंदासाठी समर्पित केले आहे. जाधव यांनी रविवारी (दि.५ ऑक्टोबर) ६८ व्या वर्षात पदार्पण केले आहे‌. तरीसुद्धा आजही ते युनायटेड किंगडममध्ये कुस्तीतील नामवंत दिग्गजांच्या संपर्कात आहेत. 

लंडनमध्ये कुस्तीच्या खेळाचा बोलबाला नसला तरी तेथे स्थायिक झालेल्या अनिवासी भारतीय आणि आशियाई देशातील लोकांच्या जिव्हाळ्याचा कुस्ती हा विषय असल्याचे जाधव यांनी ग्रामराज्य न्यूज पोर्टलच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. तीन महिन्याच्या या दौऱ्यात त्यांनी युरोपियन राष्ट्रांच्या कुस्ती क्षेत्रातील नामवंतांच्या भेटी घेतल्या आहेत. हा छंद जोपासण्यास सुरुवात करताना त्यांनी सन १९७८ मध्ये  पहिल्या कुस्तीचे छायाचित्र विकत घेतले. तेव्हापासून त्यांच्या या छंद जोपासण्यासच्या अनोख्या प्रवासाची सुरुवात झाली. पुढे हा छंद आपल्या आयुष्याचा ध्यास झाल्याचेही त्यांनी सांगितले. 

पहिल्या तीन दशकांत त्यांच्या संग्रहात तब्बल अडीच हजार छायाचित्रांचा समावेश झाला. आता तो आठ हजारावर गेला आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील कुस्तीच्या आखाड्यांपासून ते ऑलिंपिक विजेते आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंपर्यंतचा इतिहास जतन केला आहे. या क्षेत्रातील अनेक नामवंतांनी त्यांच्या या संग्रहाला 'कुस्तीचा अद्वितीय ज्ञानकोश' असे म्हटले आहे. 

मात्र या छायाचित्रांच्य मागे जाधव यांची स्वतःची कहाणी आहे. सन १९७१ ते १९८५ या कालावधीत त्यांनी वस्ताद विश्वनाथराव भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगावात सराव केला. त्यानंतर त्यांनी कोल्हापूरच्या आखाड्यांमध्ये कुस्तीच्या कसदार डावांचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी सन १९७९ मध्ये ‘तळेगाव केसरी’  हा किताब  जिंकला. शालेय गटात (५१ किलो वजन गट) जिल्हास्तरीय सुवर्णपदक आणि विभागीय रौप्यपदक मिळवले. मात्र, तत्कालीन परिस्थितीत  करिअर म्हणून अपेक्षित यश मिळविण्याचे त्यांचे मोठे स्वप्न अपूर्ण राहिले. तरीही  खचून न जाता त्यांनी इतर कुस्तीवीरांचा गौरव करण्याचा मार्ग निवडला. त्यांच्या यशकथांचे त्यांनी छंद म्हणून छायाचित्रांद्वारे संग्रहीकरण करायला सुरुवात केल्याचे जाधव यांनी यावेळी सांगितले.

काही क्रीडा समीक्षक आणि कुस्तीच्या अभ्यासकांनी या संग्रहासोबतच याबाबतचा लेखी इतिहास लिहिण्याचे सुचविले आहे. यानुसार सध्या या छायाचित्र संग्रहाच्या संदर्भांनुसार कुस्तीचा लिखित इतिहास तयार करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी त्यांनी लंडनमधील नामांकित प्रकाशन संस्थेकडे तसा प्रस्ताव दिला आहे. कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेबद्दल लंडनमध्ये मोठी आस्था आहे. त्यामुळे ते गेल्या जुलैपासून इंग्लंडच्या दौऱ्यावर आहेत.

या दौऱ्यात आतापर्यंत त्यांनी तेथील सर्व राष्ट्रीय कुस्तीप्रेमींशी संवाद साधला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कुस्ती समीक्षक आणि लेखक बलबीरसिंह कंवल(लंडन) यांचीही त्यांनी भेट घेतली.यावेळी त्यांनी आपल्या संग्रहातील निवडक छायाचित्रे आणि त्याचा संदर्भ इतिहासही बलबीरसिंह यांना सांगितला. वयाच्या नव्वदीतही बलबीरसिंह यांना कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेबद्दल खूप आस्था आणि उत्सुकता असल्याचे जाधव यांनी सांगितले. कुस्तीच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या संग्रहाला ग्रंथरूपात प्रकाशित करण्याची सूचना बलबीरसिंह यांनी केली आहे.  

जगातील कुस्ती क्षेत्रातील दुर्मिळ घटनांच्या छायाचित्रांचा हा संग्रह सर्वांसाठी कायम रहावा, यासाठी राज्य सरकारने कोल्हापूर किंवा तळेगाव दाभाडे येथे संग्रहालय उभारले पाहिजे. त्यासाठी कोणतीही आर्थिक अपेक्षा न ठेवता सर्वोत्तपरी सहकार्य करायला मी तयार आहे. खेळाची आस्था असलेल्या शैक्षणिक,  क्रीडाविषयक संस्थांनाही यासाठी मी आवाहन करत आहे.

-  अशोक जाधव,
माजी कुस्तीपटू व संग्राहक, 
तळेगाव दाभाडे, जिल्हा पुणे.