पुण्यातील इक्रम खान कुटुंबीय सलग तीन पिढ्यांपासून कृतीतून देतेय हिंदू-मुस्लिम भाई-भाईंचा संदेश!

खान कुटुंबाची सलग तिसरी पिढी साजरी करतेय रामनवमीचा उत्सव : मुस्लिम कुटुंबाने समाजासमोर निर्माण केला नवा आदर्श

पुण्यातील इक्रम खान कुटुंबीय सलग तीन पिढ्यांपासून कृतीतून देतेय हिंदू-मुस्लिम भाई-भाईंचा संदेश!
पुणे :- पुण्यातील रामवाडी येथील रामनवमी उत्सवात सहभागी झालेले इक्रम खान.

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ७ एप्रिल २०२५ :-  भारतात गेल्या काही वर्षांपासून राजकीय स्वार्थापोटी हिंदू-मुस्लिम हे एकमेकांचे कट्टर शत्रू असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. पण हे चित्र वास्तवात अनेकदा सपशेल खोटे ठरले आहे. हिंदू - मुस्लिम हे एकमेकांचे शत्रू नसून ते मित्र असल्याचे या दोन्ही धर्मियांनी विविध उदाहरणांतून दाखवून दिले आहे. याचाच प्रत्यय पुणे शहरातील रामवाडी येथील खान कुटुंबियामुळे पुन्हा एकदा आला आहे. 

रामवाडी येथील इक्रम खान हे मुस्लिम कुटुंबिय  सलग तीन पिढ्यांपासून  हिंदू धर्मियांचा रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. देशभरात यंदाचा रामनवमी उत्सव रविवारी (दि.६ एप्रिल) विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र पुण्यातील रामवाडी येथील रामनवमी उत्सव हा इक्रम खान यांच्यामुळे चर्चेत आला आहे. इक्रम खान हे दरवर्षी रामनवमी उत्सवात सहभागी होऊन वर्षानुवर्ष हा उत्सव साजरा करत आहेत. 

या कुटुंबातील मुसा खान यांनी पहिल्यांदा रामनवमी उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. मुसा खान हे इक्रम खान यांचे नात्याने आजोबा आहेत. आजोबांनी सुरू केलेली ही अनोखी परंपरा आजोबानंतर त्यांचे वडील इसा खान यांनीही कायम ठेवली. इसा खान हे दरवर्षी रामवाडी येथील राम मंदिराच्या रामनवमी उत्सवात सहभागी होऊन, या उत्सवाचा एक प्रमुख भाग बनत आहेत. वडिलांची हीच परंपरा पूना गोल्फ क्लबचे कप्तान आणि उद्योजक इक्रम खान यांनी पुढे चालू ठेवली आहे.

देशाला सध्या सर्वधर्म समभावाच्या विचाराची गरज असताना खान कुटुंबाने मात्र ही परंपरा १९३२ सालीच सुरू केली असून आजही ही परंपरा ते कायम जपत आहेत. रामनवमी उत्सव साजरा करून त्यांनी समाजापुढे मोठा आदर्श निर्माण केला आहे. खान कुटुंबाच्या या कार्याचे समाजातील सर्व स्तरातून स्वागत केले जाऊ लागले असून अशीच अपेक्षा सर्व धर्मातील बांधवाकडून व्यक्त केली जात आहे. खान यांच्या रामनवमी उत्सव प्रसंगी विजय गलांडे, तोलेस्वर देवकर,  प्रमोद देवकर, संतोष देवकर आदींसह राम मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.