Pune ZP's school in Jalindarnagar has become number one in the world : पुणे झेडपीची जालिंदरनगर शाळा ठरली जगात नंबर वन!
इंग्लंडमधील टी फोर संस्थेचा दहा हजार अमेरिकन डॉलरचा पुरस्कार जाहीर : कम्युनिटी चॉईस श्रेणीतील पुरस्काराची झेडपी शाळा ठरली मानकरी
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ३० सप्टेंबर २०२५ :- इंग्लंडमधील टी-फोर या जागतिक पातळीवरील शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सन २०२५ च्या स्पर्धेत महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जालिंदरनगर (ता.खेड) येथील जिल्हा परिषद शाळा समुदाय सहकार्य (कम्युनिटी चॉईस) या श्रेणीत जगात नंबर वन ठरली आहे. टी-फोर या शिक्षण संस्थेचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी विकास पोता यांनी मंगळवारी (दि.३० सप्टेंबर) या पुरस्कारांची ऑनलाइन घोषणा केली.
रोख दहा हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनात रोख ८ लाख ८८ हजार ७०० रुपये असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. यंदा हा पुरस्कार पटकावणारी जालिंदरनगर झेडपी शाळा ही भारतातील एकमेव शाळा ठरली आहे. येत्या १५ नोव्हेंबर रोजी अबू-धाबी येथे एका खास समारंभात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
या पुरस्कारांसाठीच्या पहिल्या फेरीत जगभरात टॉप टेन ठरलेल्या शाळांपैकी अंतिम पुरस्कारांसाठी विविध पाच श्रेणीत प्रत्येकी एक, याप्रमाणे जगातील पाच शाळांची जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कारासाठी निवड केली जाते. या विविध पाच श्रेणींमध्ये समुदाय सहकार्य (Community Choice), पर्यावरणीय कृती (Environmental Action), नावीन्य (Innovation), प्रतिकूलतेवर मात (Overcoming Adversity) आणि निरोगी जीवनाला पाठिंबा (Supporting Healthy Lives) आदींचा समावेश आहे.यंदाच्या या पुरस्कारासाठीच्या पहिल्या फेरीत भारतातील चार शाळांनी पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. यात महाराष्ट्रातील जालिंदरनगर (जि. पुणे) येथील जिल्हा परिषद शाळेसह हरियाणा, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील शाळांचा समावेश होता.
यानुसार समुदायामध्ये एकत्र येऊन शिक्षणप्रक्रियेला चालना देणाऱ्या शाळेची समुदाय सहकार्य या श्रेणीतील पुरस्कारासाठी निवड केली जाते यावर आधारित ही श्रेणी आहे. जालिंदरनगगर झेडपी शाळेला या श्रेणीतील हा पुरस्कार जाहीर झाला आहे. जालिंदरनगर शाळेने नवकल्पना, सामाजिक प्रभाव आणि विद्यार्थी विकासासाठी मोठे योगदान दिले आहे.
जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेला मिळालेला पुरस्कार ही केवळ कागदोपत्री बाब नसून शिक्षणपद्धती, प्रेरणादायक मार्गदर्शन, सोयी-सुविधा आणि नैतिक मूल्यांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याचे खास उदाहरण आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास,नेतृत्व क्षमता आणि जवळची भावनात्मक नाती निर्माण होतात आणि विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करतात. तेव्हा शाळेची प्रतिष्ठा आपोआप वाढते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेले पुरस्कार, स्पर्धेमधील विषय आणि समाजसेवेतील योगदान यामुळे शाळेचे नाव जगभरात गाजते. एकतेचाच प्रत्यय जिल्हा परिषदच्या जालिंद्रनगर प्राथमिक शाळेने केला आहे. यामध्ये विविध वयोगटातील विद्यार्थी एकमेकांना शिकवतात व शिकतात, अशा सहअध्ययन अध्यापन प्रारुप पद्धतीमुळे शैक्षणिक क्रांतिकारी बदल झाला आहे. आता ही शाळा जगभरातील विद्यार्थ्यां व पालकांसाठी प्रेरणास्थान ठरेल. यामुळे शाळेचा नावलौकिक दीर्घकाळ टिकून राहील आणि तो एक आदर्श शैक्षणिक संस्था म्हणून मान्यता पावेल.याचे सातत्य टिकवण्यासाठी व अशाच पद्धतीने अन्यसंस्था निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले.
पुणे झेडपी शाळा जगात सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून निवडली जाणे, ही जिल्हा परिषदेसाठी अत्यंत अभिमानास्पद व कौतुकास्पद बाब आहे. जगातील सर्वोत्कृष्ट प्रतिष्ठित पुरस्कार मिळविणे म्हणजेच शिक्षक आणि विद्यार्थी हे यशाचे दोन प्रमुख आधारस्तंभ असलेले आहेत. त्यांच्या गुणवत्तेमुळे शाळेचा व पुणे जिल्ह्याचा नावलौकिक केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतीय उपखंडातही विस्तारला आहे, हे एक उत्तम उदाहरण आहे. विद्यार्थ्यांचा ज्ञान, गुणवत्ता आणि सामाजिक योगदान यातून विद्यार्थ्यांचा दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल आणि त्याची फळं विद्यार्थ्यांना मिळतील.
- गजानन पाटील,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.
