Urban Cooperative Credit Union Federation Annual General Meeting : सहकारी बँका,पतसंस्थांच्या वित्त वितरण व्यवस्थेमुळे  सर्वसामान्यांची सावकारांच्या शोषणातून मुक्तता! 

पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे  : जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांच्या फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Urban Cooperative Credit Union Federation Annual General Meeting : सहकारी बँका,पतसंस्थांच्या वित्त वितरण व्यवस्थेमुळे  सर्वसामान्यांची सावकारांच्या शोषणातून मुक्तता! 
पुणे:- पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थां फेडरेशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उत्कृष्ट पतसंस्थांना पुरस्कार प्रदान करताना फेडरेशनच्या अध्यक्षा रेश्मा भोसले व अन्य.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ३० सप्टेंबर २०२५ :- महाराष्ट्रातील ग्रामीण व नागरी सहकारी'पतसंस्था व सहकारी बँकांनी सर्वसामान्य नागरिकांना अल्प दराने कर्जपुरवठा करण्यासाठी उत्कृष्ट व्यवस्था निर्माण केली आहे.या कल्याणकारी वित्त वितरण व्यवस्थेमुळे सर्वसामान्य नागरिकांची बेकायदा सावकारी शोषणातून मुक्तता होण्यास मदत झाली आहे, असे मत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी येथे बोलताना व्यक्त केले. सहकार हा लोकशाहीचा आत्मा असून, सहकार चळवळीने सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत स्वतःच्या पायावर उभे केले असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांच्या सहकारी फेडरेशनच्या ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्ह्यातील आदर्श पतसंस्थांना स्वर्गीय माजी आमदार शिवाजीराव भोसले आदर्श पतसंस्था पुरस्काराने गौरविण्यात आले. या फेडरेशनच्या अध्यक्षा रेश्मा भोसले सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी सहकार तज्ज्ञ काशिनाथ दंडवते, उपाध्यक्ष शामराव हुलावळे, सचिव संतोष भेगडे, माणिकराव झेंडे,जयवर्धन भोसले, विनायक तांबे आदी सर्व संचालक व्यासपीठावर उपस्थित होते. 

प्रा. डॉ. दुर्गाडे पुढे म्हणाले, "समान उद्दिष्टाने पतसंस्थांना एकजूट करून त्यांच्या सर्वांगीण विकासाचा साकल्याने विचार हे फेडरेशन करत आहे. सहकारी पतसंस्थांनी गोरगरीब सभासदांना मालक करून आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकशाहीचा पाया रचला आहे. आता सहकारी पतसंस्थांनी आर्थिक शिस्त, कॉर्पोरेट कार्य संस्कृती, नियमांच्या बंधनात काम करून, स्वतःच्या क्षमतांचा विस्तार केला पाहिजे."

पतसंस्था या सहकार चळवळीचा अविभाज्य घटक असून, सहकार संस्कृती जोपासण्याचे काम करणारे हे फेडरेशन राज्यात आदर्श म्हणून ओळखले जात असल्याचा अभिमान आहे. सहकार हे 'मी नव्हे आपण' हे मूल्य रुजविणारी संस्कृती आहे. फेडरेशनचे संस्थापक दिवंगत माजी आमदार शिवाजीराव भोसले यांनी हे मूल्य पेरले असून, ते जोपासण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे. सहकार क्षेत्राला प्रभावी दिशादृष्टी देणाऱ्या माजी आमदार शिवाजीराव भोसले यांच्या प्रयत्नांमुळेच सहकार कायद्यात कलम १०१ (थकबाकी वसुलीची कायदेशीर प्रक्रिया), कलम १५६ (थकबाकी वसुलीचे अधिकार) आणि नियम १०७ चा प्रभावी वापर सुरू झाला. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ फेडरेशनने पतसंस्थांना प्रोत्साहनासाठी माजी आमदार शिवाजीराव भोसले आदर्श पतसंस्था पुरस्कार सुरू केला आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात नवे मापदंड निर्माण झाले असल्याचे फेडरेशनच्या अध्यक्षा रेश्मा भोसले यांनी यावेळी सांगितले. 

प्रबोधन व प्रशिक्षण हा सहकाराचा आत्मा असून, फेडरेशनचे संस्थापक माजी आमदार शिवाजीराव भोसले प्रशिक्षण केंद्रात कायदे, आर्थिक व्यवस्था, डिजिटल कौशल्य, सदस्य सेवा आणि नेतृत्व विकास या विषयावर दर्जेदार प्रशिक्षण दिले जाते. या उपक्रमामुळे फेडरेशनला राज्य शिखर संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे. संस्थापकांचे स्वप्न पुढे नेण्याचे कार्य माजी आमदार अनिल भोसले यांनी केले असून, फेडरेशनचा प्रभाव संपूर्ण राज्यात पोहोचला असल्याचेही रेश्मा भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले. 

फेडरेशनचे उपाध्यक्ष  शामराव हुलावळे यांनी प्रास्ताविक केले. 'पतसंस्थांविषयक कामांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करणाऱ्या फेडरेशनसोबत सर्व पंतसंस्थांचे ऋणानुबंध निर्माण झाले आहे, असे  त्यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलताना सांगितले. यतीनकुमार फुले यांनी आभार मानले.

फेडरेशनचे स्व:मालकीच्या 'वास्तूचे 'स्वप्न पूर्ण होणार 

पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांच्या सहकारी फेडरेशनने शिवाजीनगर परिसरात स्वत:च्या  मालकीची जागा खरेदी केली आहे. या जागेवर लवकरच अत्याधुनिक सोयी-सुविधायुक्त प्रशस्त वास्तू उभारण्यात येणार असल्याचे  फेडरेशनचे संचालक विनायक तांबे यांनी यावेळी सांगितले. शिवाय पतसंस्थांच्या मागणीनुसार फेडरेशनतर्फे थकीत कर्जवसुलीसाठी आकारण्यात येणारे सेवा शुल्क दोन टक्क्यांवरून दीड टक्के करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

स्वर्गीय माजी आमदार शिवाजीराव भोसले आदर्श पतसंस्था पुरस्कारांच्या मानकरी पतसंस्था 

- गट १  :-  ५ ते १५ कोटी रुपयांच्या ठेवी

- प्रथम पुरस्कार :- तुळजाभवानी नागरी सहकारी पतसंस्था, थेरगाव, ता. हवेली.

- द्वितीय पुरस्कार :-  भागीरथी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, हडपसर, पुणे.

- गट २  :-  ५ ते १५ कोटी रुपयांच्या ठेवींच्या ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था

- प्रथम पुरस्कार :- श्री. शिवशक्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पेठ, ता. आंबेगाव.

- द्वितीय पुरस्कार :-  साईप्रेरणा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, डिंगोरे, ता. जुन्नर. 

- तृतीय पुरस्कार :-  अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, बोरी खुर्द, जुन्नर.

- गट ३  :-  १५ ते ५० कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या नागरी सहकारी पतसंस्था

- प्रथम पुरस्कार विभागून :-  पंडित दीनदयाळ उपाध्याय नागरी सहकारी पंतसंस्था मर्यादित, शिवाजीनगर पुणे
आणि नगर नागरी सहकारी पतसंस्था मर्या, हडपसर, पुणे.

- द्वितीय पुरस्कार विभागून :-  महादेवनगर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मांजरी बुद्रुक, हवेली आणि संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मंचर, ता. आंबेगाव.

- तृतीय पुरस्कार :-  रामचंद्रदादा कवडे पुण्यनगरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, घोरपडी, पुणे.

- गट ४  :- १५ ते ५० कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था

- प्रथम पुरस्कार :- श्रीनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, थेऊरफाटा ता. हवेली.

- द्वितीय पुरस्कार :- कल्पवृक्ष ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे.

- गट ५ :- ५० कोटी ते १०० कोटी ठेवी असलेल्या नागरी सहकारी पतसंस्था

- प्रथम पुरस्कार :-  चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चाकण, ता. खेड.

- द्वितीय पुरस्कार :- श्रमजीवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, काळेवाडी, पुणे.

- तृतीय पुरस्कार :-  मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, तळेगाव दाभाडे.

- गट ६ :-  ५० कोटी ते १०० कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था

- प्रथम पुरस्कार :-  श्रीकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, वडगांव काशिंबेग, ता. आंबेगाव.

- गट ७  :-  १०० कोटी व त्यापुढील ठेवी

- प्रथम पुरस्कार :- श्री. अंबिका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, खोडद, ता. जुन्नर.

- द्वितीय पुरस्कार विभागून :-  श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नारायणगाव, ता. जुन्नर
आणि वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्था, आळेफाटा, ता. जुन्नर.

- तृतीय पुरस्कार :- भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, लांडेवाडी-चिंचोडी, ता. आंबेगाव. 

- गट ८ :- पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्था

- प्रथम पुरस्कार : पुणे जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे.

- द्वितीय पुरस्कार :-  सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड, पुणे.

- तृतीय पुरस्कार : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे.

- गट ९  :-  सहभाग पुरस्कार

- ग्रामसेवा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, धनगरवाडी, ता. जुन्नर.

- हवेली तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित, नारायण पेठ, पुणे.

- आधार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कर्वे रोड, पुणे.

- जय हनुमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,पिंपळी लिमटेक, ता. बारामती.

- सेवागिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, हिंजवडी, पुणे.

- श्री. डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था,तळेगाव दाभाडे.

- संभाजी भुजबळ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, तळेगाव ढमढेरे, या. शिरूर.