Announcement of establish farmers producer company : पुरंदर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणार!
पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांची घोषणा : 'पुरंदर मिल्क'ची रौप्यमहोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
ग्रामराज्य वृत्तसेवा
सासवड, दि. ३० सप्टेंबर २०२५ :- पुरंदर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरच शेतकरी उत्पादक कंपनीची (फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी) स्थापना करण्यात येणार आहे, अशी घोषणा पुरंदरचे माजी आमदार व खळद येथील पुरंदर मिल्क अॅंड अॅग्रो प्रो. लिमिटेड या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संजय जगताप यांनी केली.
खळद येथील पुरंदर मिल्क अँड ऍग्रो प्रो. लिमिटेड या संस्थेची रौप्यमहोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना जगताप यांनी ही घोषणा केली. पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या २५ वर्षांपासून दुधाला योग्य भाव देणारी आणि सातत्याने दूध संकलन करणारी एकमेव संस्था असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जगताप यांनी यावेळी संस्थेच्या भविष्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजनाही जाहीर केल्या.
ते पुढे म्हणाले, “पुरंदर मिल्क'ने आजपर्यंत एकही दिवस दूध संकलन बंद ठेवले नाही, ही अभिमानाची गोष्ट आहे. चंदुकाकांनी घालून दिलेल्या आर्थिक शिस्तीमुळेच हे शक्य झाले आहे. सध्या ५ हजार ८०० मेट्रिक टन कोल्ड स्टोअरेजची क्षमता आणखी ३ हजार मेट्रिक टनने वाढविण्यात येणार आहे. तसेच, दूध प्रक्रिया केंद्राचेही विस्तारीकरण केले जाणार आहे."
यंदा सभासदांना लाभांश म्हणून २० लाख रुपये त,र दूध उत्पादकांना १८ लाखांचा बोनस वाटप करण्यात आला आहे. या उपक्रमांचा शुभारंभ संजय जगताप यांच्यासह संचालिका राजवर्धिनी जगताप, संत सोपानकाका सहकारी बँकेचे अध्यक्ष रमणिकलाल कोठडिया आणि इतर संचालक मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आला.
या वर्षी संस्थेने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीतून व पेट्रोल पंप आणि कोल्ड स्टोअरेजच्या माध्यमातून एकूण ५० कोटी ६४ लाख ८१ हजार रुपयांचा व्यवसाय केला आहे. सध्या संस्थेचे भागभांडवल ५ कोटी १० लाख रुपये असून, राखीव निधी १८ कोटी ६६ लाखांचा आहे. यंदा संस्थेला ६ लाख ५२ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र मांढरे यांनी सांगितले की, इग्लू कोल्ड स्टोअरेजमध्ये विविध फळे, फुले, धान्य आणि पल्प नियंत्रित तापमानात साठवता येतात, ज्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो.
संचालक विठ्ठल मोकाशी यांनी प्रास्ताविक केले. या सभेला संचालक प्रदीप पोमण, मोहन जगताप, पांडुरंग कामथे, अविनाश वाघोले, संजय ताकवले, संजय म. जगताप, शंकर कड, चंद्रशेखर जगताप, विलास जगताप, बाळासाहेब बहिरट, साजिद बागवान यांच्यासह कात्रज डेअरीचे उपाध्यक्ष तानाजी जगताप, सुनिता कोलते, संभाजी काळाणे, देविदास कामथे, निरा मार्केट कमिटीचे सभापती संदीप फडतरे, संचालक देविदास कामथे, मनिषा नाझीरकर, हरीभाऊ फुले आदींसह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
प्राचार्य नंदकुमार सागर आणि पुरंदर नागरी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे यांनी सूत्रसंचालन केले. कंपनी सेक्रेटरी संतोष जगताप यांनी अहवालाचे वाचन केले. संचालक प्रदीप पोमण यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन रणजित जगताप, यशु जाधव, शरद कामथे, वर्षा तावरे, तुषार खळदकर, प्रतिमा सुर्यवंशी आदी कर्मचाऱ्यांनी केले.
