Announcement on releasing reservation for mayors in Maharashtra : महाराष्ट्रातील सव्वाशे नगरपालिका अन् ७४ नगर पंचायतींवर येणार 'महिलाराज'!
राज्यातील नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर : पुणे जिल्ह्यातील १४ नगरपालिका आणि ४ नगर पंचायतींच्या नगराध्यक्षांच्या आरक्षणाचा समावेश
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ६ ऑक्टोबर २०२५ :- महाराष्ट्रातील सव्वाशे (१२५) नगरपालिका आणि सुमारे पाऊणशे म्हणजेच ७४ नगर पंचायतींंवर 'महिलाराज' येणार आहे. नगरपालिकांच्या एकूण नगराध्यक्षांपैकी सर्व प्रवर्गातील महिलांसाठी १२५ जागा आरक्षित झाल्या आहेत. याशिवाय नगर पंचायतींच्या नगराध्यक्षांच्या ७४ जागा या सर्व प्रवर्गातील मिळून महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील १४ पैकी चार नगरपालिका आणि चारपैकी तीन नगर पंचायतींवर महिलाराज अवतरणार आहे.
राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत सोमवारी राज्याच्या नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यामध्ये 33 नगरपालिकांचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती (एस.सी.), 11 नगरपालिकांचे नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती (एस.टी.), ६७ नगरपालिकांचे नगराध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) व उर्वरित १३६ नगरपालिकांचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आले आहे. यामुळे जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेच्या पाठोपाठ आता स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी महापालिकांचा अपवाद वगळता नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेलाही वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रवर्गनिहाय जाहीर करण्यात आलेल्या नगराध्यक्षांच्या राखीव जागांपैकी निम्म्या जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यानुसार अनुसुचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी १७, अनुसुचित जमातीतील महिलांसाठी ६, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी ३४ आणि सर्वसाधारण गटातील महिलांसाठी (खुला गट) ६८ जागा आरक्षित झाल्या आहेत.
दरम्यान, राज्यातील नगर पंचायतीच्या नगराध्यक्षांच्या एकूण १४७ जागांपैकी अनुसुचित जातीसाठी १८, अनुसुचित जमातीसाठी १३, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ४० आणि सर्वसाधारण गटासाठी ७६ नगराध्यक्षपदे आरक्षित झाली आहेत. प्रवर्गनिहाय आरक्षित झालेल्या जागांपैकी निम्म्या जागा त्या त्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.यानुसार अनुसुचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी ९, अनुसुचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी ७, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी २० आणि सर्वसाधारण गटातील महिलांसाठी (खूला गट) ३८ जागा राखीव झाल्या आहेत.
सोमवारी काढण्यात आलेल्या नगराध्यक्षांच्या आरक्षण सोडतीत पुणे जिल्ह्यातील १४ नगरपालिका व ४ नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदांच्या आरक्षण सोडतीचा समावेश आहे. या सोडतीत पुणे जिल्ह्यातील १४ पैकी विविध प्रवर्गातील महिलांसाठी मिळून चार आणि एकूण ४ नगर पंचायतींपैकी तीन नगराध्यक्षपदे ही महिलांसाठी राखीव झाली आहेत.
पुणे जिल्ह्यातील नगरपालिकांचे प्रवर्गनिहाय आरक्षण
- फुरसुंगी-ऊरळी देवाची --- अनुसुचित जाती (एस.सी.)
- लोणावळा --- अनुसुचित जाती (एस.सी.)
- शिरूर --- ओबीसी (महिला)
- जुन्नर --- ओबीसी (महिला)
- दौंड --- ओबीसी (महिला)
- चाकण --- सर्वसाधारण (महिला)
सर्वसाधारण गटासाठीच्या (खुला गट ) नगरपालिका
- राजगुरुनगर
- जेजुरी
- आळंदी
- बारामती
- तळेगाव दाभाडे
- सासवड
- भोर
- इंदापूर
पुणे जिल्ह्यातील नगर पंचायतीच्या नगराध्यक्षांचे आरक्षण
- माळेगांव बुद्रुक --- अनुसुचित जाती (एस.सी.)
- मंचर --- ओबीसी (महिला)
- देहू --- सर्वसाधारण महिला (खुला गट)
- वडगांव मावळ --- सर्वसाधारण महिला
