Zilla Parishad election Voter list : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीच्या प्रारुप मतदार याद्या येत्या बुधवारी प्रसिद्ध होणार!
गट आणि गणनिहाय मतदार याद्या असणार : येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना देता येणार
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ५ ऑक्टोबर २०२५ :- महाराष्ट्रातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या प्रारुप मतदार याद्या तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रारुप मतदार याद्या येत्या बुधवारी (दि.८ ऑक्टोबर) प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या मतदारयाद्या गट आणि गणनिहाय असणार आहेत. या मतदारयाद्यांच्या प्रसिद्धीपासून पुढे येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत या मतदार याद्यांमधील त्रुटींवर आक्षेप घेता येणार आहे. मात्र संबंधितांना यासाठी लेखी हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. १ जुलै २०२५ अखेरपर्यंतची मतदारयादी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार गट आणि गणनिहाय प्रारुप मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. येत्या बुधवारी प्रारुप मतदार याद्यांवरील हरकती आणि सुचनांचे निराकरण केल्यानंतर येत्या दि. २७ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील २६ जिल्हा परिषदा आणि २८६ पंचायत समित्यांच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल अनुक्रमे दि. २० मार्च आणि दि. १३ मार्च २०२२ रोजीच संपलेला आहे. तेव्हापासून आजतागायत या सर्व पंचायतराज संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे. दरम्यान, त्यानंतर पुन्हा आणखी सहा जिल्हा परिषदा आणि ५० पंचायत समित्यांचा कार्यकाल संपुष्टात आलेला आहे. त्यामुळे सुमारे पावणे चार वर्षांच्या खंडानंतर या निवडणुका होणार आहेत.
