Anti-drugs workshop : महाराष्ट्रात अमली पदार्थ विरोधी लढा सर्वसमावेशक व्हावा!

अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलिस महानिरीक्षक शारदा राऊत यांचे मत : अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यशाळा संपन्न

Anti-drugs workshop : महाराष्ट्रात अमली पदार्थ विरोधी लढा सर्वसमावेशक व्हावा!

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १२ फेब्रुवारी २०२६ :- अमली पदार्थांचा राक्षस आता अगदी आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचला आहे. हा राक्षस म्हणजे दिसत नसलेला शत्रू आहे. त्यामुळे तो जास्त घातक आणि गंभीर आहे. पूर्वी तरुण पिढीला लक्ष्य करणारा हा राक्षस आता शालेय पिढीला लक्ष करत आहे.  त्यामुळे या विरोधात लढण्यासाठी पोलीस,  प्रशासन, प्रसारमाध्यमे, स्वयंसेवी आणि शैक्षणिक संस्था,पालक, शिक्षक,समुपदेशक,मित्रपरिवार या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असून या लढ्याला आता व्यापक स्वरूप येण्यासाठी तो सर्वसमावेशक होणे आवश्यक असल्याचे मत अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलिस महानिरीक्षक शारदा राऊत यांनी येथे बोलताना व्यक्त केले.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, पुणे येथील भोई प्रतिष्ठान,  महाराष्ट्र पोलिस अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स  आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने ' से नो टू ड्रग्स' अँड 'से येस टू लाइफ'  या अमली पदार्थ विरोधी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन शारदा राऊत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र पोलिस अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलिस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद भोई, जाधवर  इन्स्टिट्यूटचे  प्रा. डॉ. सुधाकर जाधवर, अॅड. शार्दुल जाधवर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत  कृष्णन श्रीनिवासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, अॅड.प्रताप परदेशी, जेष्ठ समुपदेशक डॉ. प्रिया निघोजकर आदी उपस्थित होते. 

राऊत पुढे म्हणाल्या, "या प्रश्नावर लढण्यासाठी सर्वांचा हातभार आवश्यक आहे. या दृष्टीने ही कार्यशाळा पथदर्शी प्रकल्प ठरेल." यावेळी राऊत यांनी उपस्थित सर्वांना अमली पदार्थ विरोधी शपथ दिली. अशा प्रकारच्या उपक्रमांच्या पाठीशी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी नेहमीच उभी राहील. या सर्वांचे प्रशिक्षण घेण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू, असे अभिराम घड्याळ पाटील यांनी यावेळी सांगितले.

या प्रश्नांची दाहकता ही अजूनही समाजाला तेवढी जाणवत नाही, ही दुर्दैवी गोष्ट असून, त्यासाठी प्रतिबंध व जनजागरण अशा दोन्ही आघाड्यांवर काम करण्याची गरज असल्याने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.  या प्रश्नाची गंभीरता विद्यार्थ्यांना समजली जावी, यासाठी या विषयाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात होण्याची गरज असून महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करण्याची गरज असल्याचे भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद भोई यांनी यावेळी सांगितले.

या कार्यशाळेमध्ये राज्यभरातील विविध सामाजिक संस्था, पालक, शिक्षक, समुपदेशक, शिक्षण संस्था आदींनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी अमली पदार्थ व शैक्षणिक संस्था, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत कृष्णन श्रीनिवासन यांनी कॉर्पोरेट जगातील अमली पदार्थाचा शिरकाव, ॲड. प्रताप परदेशी यांनी अमलीपदार्थ विरोधी कायदा, समुपदेशक डॉ. प्रिया निघोजकर यांनी अमली पदार्थ विरोधात शिक्षक पालक आणि समुपदेशकांची भूमिका, महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थविरोधी टास्क मोहिमेचे पोलिस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील यांनी अमली पदार्थ विरोधी कायद्यात पोलिसांची भूमिका या विषयावर भूमिका विशद केली. यावेळी अमली पदार्थ विरोधी जनजागरणाची चित्रफीत व प्रझेंटेशन विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये दाखविण्यात येईल,असे आश्वासन डॉ.पराग काळकर यांनी दिले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यालयीन अधीक्षक राहुल टोकेकर यांनी आभार मानले. 

कार्यशाळेतील मंथनाचा सरकारला अहवाल पाठविणार 

दरम्यान, या कार्यशाळांमध्ये विविध तज्ज्ञांन आणि सहभागींनी व्यक्त केलेल्या मुद्द्यांच्या आधारे अमली पदार्थांविरोधात काम करण्यासाठी आवश्यक  अभ्यास अहवाल तयार करण्यात येणार आहे. हा अहवाल राज्य सरकार आणि  गृह मंत्रालयाला सादर करण्यात येणार आहे.