बापरे, 'भाजप' ला तब्बल २ हजार २४३ कोटींची देणगी, राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांपैकी ८८ टक्के रक्कम एकट्या भाजपच्या वाट्याला!

एवढ्या देणग्या असतील तर, मग पैशावरच्या निवडणुका या एकतर्फीच होणार : आम आदमी पार्टीचा आरोप

बापरे, 'भाजप' ला तब्बल २ हजार २४३ कोटींची देणगी, राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांपैकी ८८ टक्के रक्कम एकट्या भाजपच्या वाट्याला!
पुणे:- राजकीय पक्षांना देणग्यांबाबतचा लोगो

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १० एप्रिल २०२५ :-  देशातील विविध राजकीय पक्षांना सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात मिळालेल्या देणग्यांमध्ये सर्वाधिक तब्बल २ हजार २४३ कोटी रुपयांच्या रकमेची देणगी भारतीय जनता पक्षाला (भाजप) मिळाली आहे. 

निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आणि मुख्यत्वे वीस हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या देणग्यांबाबत उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे 'एडीआर' या संस्थेने राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांबाबतचा एक अहवाल तयार केला आहे. या संस्थेने त्यांचा हा अहवाल सादर केला आहे. या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. यानुसार सन २०२३- २४ या वर्षात भाजपला २ हजार २४३ कोटी रुपये, काँग्रेसला २८१ कोटी रुपये तर, आम आदमी पार्टीला (आप) ११ कोटी रुपयांच्या रक्कमेच्या  देणग्या मिळाल्याचे उघडकीस आले आहे.भाजपला याआधीच्या वर्षात ७१९ कोटी रूपयांच्या रक्कमेच्या देणग्या मिळाल्या होत्या. यावरून भाजपच्या देणग्यांच्या रक्कमेत एक वर्षात सुमारे तिप्पटीहून अधिक वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या अहवालानुसार देशातील ८ हजार ३५८ देणगीदारांकडून ही  रक्कम मिळाली आहे. आम आदमी पार्टीला ११ कोटी रक्कम ही १ हजार ६७१ देणगीदारांकडून मिळाली आहे. याचाच अर्थ भाजपला सरासरी प्रत्येकी एका देणगीदाराकडून २६ लाख रुपये  तर,आम आदमी पार्टीला ६५ हजार रुपये  मिळाले आहेत. शिवाय भाजपला देणगी देणारे हे अदानी, अंबानी या भांडवलदार व व्यावसायिक वर्गातील ८९ टक्के लोक आहेत हे उघड असून आम आदमी पार्टीला देणगी देणारा हा मुख्यत्वे वैयक्तिक देणगीदार आहे हे लक्षात येते. त्यामुळेच भाजपची धोरणे अदानी सारख्यांच्या सोयीची का असतात, हेही उघड होते, असा आरोप आपचे मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

भाजपला देणगी देणाऱ्यांमध्ये इलेक्टोरल ट्रस्टसोबत एसीएमई सोलर एनर्जी (पवनचक्की), रुंगटा सन्स (खाण उद्योग), भारत बायोटेक (वॅक्सिन), आयटीसी इन्फोटेक आदी प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे. साधारणपणे या कंपन्यांनी प्रत्येकी किमान ५० कमाल ८० कोटी रुपयांची रक्कम ही देणगी म्हणून दिलेली आहे. त्यांचा संबंध हा त्यांना मिळालेल्या कंत्राटांशी कसा आहे, हे पहावे लागेल. एकूण देणग्यांच्या रक्कमेपैकी ८८ टक्के देणगी रक्कम एकट्या भाजपकडे असेल आणि तीही प्रामुख्याने मोठ्या भांडवलदारांकडून मिळाली असेल तर, या निवडणुका न्यायपूर्ण व रास्त कशा होणार, असा प्रश्न आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी उपस्थित केला आहे.