पुणे झेडपीचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांची भाजपच्या उत्तर पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून ५८ नवे जिल्हाध्यक्ष जाहीर

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १३ मे २०२५ :- पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांची मंगळवारी (दि.१३मे) भाजपच्या उत्तर पुणे (मावळ) जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी असणार आहे. राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील नवीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
भाजपने पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी पुणे ग्रामीणचे दोन जिल्ह्यांमध्ये (फक्त जिल्हाध्यक्ष नियुक्तीपुरते) विभाजन केले आहे. यानुसार दक्षिण पुणे (बारामती) आणि उत्तर पुणे (मावळ) असे हे भाजपचे जिल्हाध्यक्ष नियुक्तीचे पुणे जिल्ह्यातील दोन जिल्हे आहेत. कंद यांच्या नियुक्तीपुर्वी पुणे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती शरद बुट्टे पाटील हे भाजपचे उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष होते. बुट्टे पाटील यांनी या पदावर दोन वर्षे काम केले. त्यांचा कार्यकाळ संपल्याने बुट्टे पाटील यांच्या जागी प्रदीप कंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेश निवडणूक अधिकारी,आमदार चैनसुख संचेती यांनी मंगळवारी (दि.१३ मे) राज्यातील ५८ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील तीन नियुक्त्यांचा समावेश आहे.कंद यांच्याशिवाय पुणे शहर जिल्हाध्यक्षपदी धीरज घाटे आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनियुक्त उत्तर पुणे (मावळ) जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद हे सन २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर पुणे जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कंद यांची जिल्हा परिषदेच्या सभागृहनेतेपदी नियुक्ती केली होती. परंतु कंद यांनी सभागृहनेतेपद नाकारले होते. त्यामुळे अजित पवार यांनी कंद यांची सन २०१२ मध्येच पुणे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड केली होती. उपाध्यक्षपदी कार्यरत असताना कंद यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यासाठी त्यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम आणि प्रयोगांची यशस्वी अंमलबजावणी केली. यामुळे ग्रामीण भागातील विशेषतः शाळांची गुणवत्ता सुधारली. परिणामी झेडपी शाळांमधील पटसंख्या वाढण्यास मदत झाली.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपताच कंद यांची पुणे दि. २० सप्टेंबर २०१४ रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. पुढे दि. २० मार्च २०१७ पर्यंत कंद या पदावर कार्यरत होते. दरम्यान अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर सुमारे दीड वर्षांनी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश केला. सध्या ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत.
पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे, पिंपरी चिंचवड अध्यक्षपदी शत्रुघ्न काटे
दरम्यान, भाजपने मंगळवारी उत्तर पुणे जिल्हाध्यक्षांबरोबरच पुणे व पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यानुसार पुणे शहर जिल्हाध्यक्षपदी धीरज घाटे आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.