Students from Pune Zilla Parishad schools take a leap towards 'NASA' : पुणे झेडपीच्या शाळांमधील २५ विद्यार्थ्यांनी घेतली 'नासा'कडे 'झेप'!
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा १० दिवसांचा अभ्यासदौरा : विद्यार्थी अमेरिकेकडे रवाना, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकात पुलकुंडवार यांच्याकडून शुभेच्छा
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि.१४ नोव्हेंबर २०२५ : बालदिनाच्या मुहूर्तावर पुणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) शाळांमधील २५ गुणवंत विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि. १४ नोव्हेंबर) 'नासा'कडे झेप घेतली. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांची १० दिवसांच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. यानुसार हे गुणवंत विद्यार्थी शुक्रवारी १० दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी अमेरिकेकडे रवाना झाले. या विद्यार्थ्यांना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
या शुभेच्छा देण्यासाठी विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात एका खास समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू-धोटे यांच्यासह शिक्षक व पालक उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना डॉ. पुलकुंडवार म्हणाले, "या अभ्यास दौऱ्यामुळे अमेरिकेतील नासा येथे भेट देण्याची ही खूप मोठी संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळाली आहे. ही गोष्ट अत्यंत अभिमानाची आहे. अमेरिकेतील शिस्त आणि शिष्टाचाराचे अत्यंत काटेकोरपणे पालन करा, अनोळख्या वस्तूला हात लावू नका, एकमेकांना मदत करा, सर्वांनी एकसंघ रहा, शिक्षकांच्या सूचनांचे पालन करा आणि तब्येतीची काळजी घ्या."
या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेले विद्यार्थी हे नासा, केनेडी स्पेस सेंटर, स्मिथसोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम, नासा अर्थ इन्फॉर्मेशन सेंटर, तसेच सॅन फ्रान्सिस्को येथील प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांना भेट देणार आहेत. हे विद्यार्थी शनिवारी (दि.१५ नोव्हेंबर २०२५) पहाटे मुंबई येथून अमेरिकेकडे रवाना होणार आहेत. या दौऱ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमधील इयत्ता ६ वी, ७ वी मधील ९ मुली व १६ मुलांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांबरोबर 'आयुका'चे शास्त्रज्ञ समीर दुर्डे, शिक्षिका माया लंघे (हवेली), प्रमिला जोरी (आंबेगाव), सुनीता खलाटे (बारामती), तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला साळुंके (दौंड) आदी असणार आहेत.
हा अभ्यास दौरा म्हणजे 'पुणे मॉडेल स्कूल प्रकल्पाती'ल महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक उपक्रम आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी 'आयुका'च्या सहकार्याने करण्यात येत आहे. या उपक्रमाला ग्रामीण विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. यासाठी सुमारे १७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये काटेकोरपणे पूर्ण करण्यात आली.नासाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयुकाने विशेष तयारी वर्गांचे आयोजन केले होते.
यामध्ये वैज्ञानिक विषय, आंतरराष्ट्रीय संशोधन पद्धती आणि अवकाश विज्ञान संकल्पना यांची ओळख करून देण्यात आली. तसेच, 'आयुका'ने शिक्षकांसाठीही प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन त्याद्वारे शिक्षकांना अन्वेषण-आधारित शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वर्गात प्रभावीपणे आणण्याच्या पद्धती शिकविण्यात आल्या आहेत.
