Pune Zilla Parishad's Coffee with Commissioner and 'CEO' programme :- गावांच्या समृद्धीसाठी लोकसहभाग, श्रमदान अन् कामातील सातत्य या त्रिसुत्रीचा अवलंब करा!
आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार : झेडपीच्या 'कॉफी विथ विभागीय आयुक्त आणि झेडपी सिईओ' समारंभात सरपंचांना मार्गदर्शन
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ५ डिसेंबर २०२५ :- अहिल्यानगर (पुर्वाश्रमीचे अहमदनगर) जिल्ह्यातील हिवरे बाजार गावांचा विकास होण्यासाठी विविध सरकारी स्पर्धा उपयुक्त ठरल्या. यामध्ये प्रामुख्याने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, यशवंत पंचायतराज अभियान आणि तंटामुक्ती गाव अभियान आदी योजनांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये मिळालेले यश, या यशातून गावाच्या पाठीवर कौतुकाची थाप पडण्याबरोबरच आपापल्या गावांच्या विकासासाठी बक्षिसरुपी मोठी रक्कमही मिळाली. यासाठी आम्ही लोकसहभाग, श्रमदान आणि कामातील सातत्य राखले. आपल्यालाही हिवरे बाजारसारखे आपापले गाव समृद्ध करायचे असेल तर, त्यासाठी आधी लोकसहभाग व श्रमदान वाढवा आणि सरकारी अनुदानावर अपेक्षा न ठेवता कामात सातत्य ठेवा, असा सल्ला राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी पुणे जिल्ह्यातील सरपंचांना आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिला.
पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्ह्यातील निवडक सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांसाठी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि मुख्य जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या समवेत चहा-पान या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या नाविन्यपूर्ण उपक्रमाला 'कॉफी विथ विभागीय आयुक्त आणि झेडपी सिईओ' (Coffee with Commissioner & Z.P. CEO) असे नाव देण्यात आले होते. हा स्नेहसंमेलनात्मक व प्रेरणादायी स्वरुपाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील विविध अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचे सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित सरपंचांना मार्गदर्शन करताना पोपटराव पवार बोलत होते.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, यशवंतराव चव्हाण प्रशासन व विकास अकादमीचे (यशदा) उपमहासंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी आदी उपस्थित होते.
पोपटराव पवार पुढे म्हणाले, "हिवरे बाजार गावाने गेल्या ३५ वर्षांपासून कामात सातत्य राखले आहे. लोकसहभाग आणि श्रमदानामुळे सरकारी निधीवर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही. शिवाय तुम्ही तुमच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात असे काम करा की, तुम्ही सरपंच पदावर असाल, नसाल तरी, पुढचे २५ वर्षे लोकांनी तुमचे नाव घेतले पाहिजे. यासाठी आपापल्या गावांच्या समृद्धीसाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये समन्वय साधून कामे करा. ही कामे पुढील पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरतील."
'यशदा'चे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी उपस्थित सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानातील त्यांची भूमिका, या अभियान कालावधीतील त्यांची पुढील दिशा काय असावी, याबाबत मार्गदर्शन केले. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या अभियानाचे उद्दिष्ट,प्रभावी अंमलबजावणी आणि गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ग्रामपंचायतींच्या कार्याची प्रशंसा करून पुढील कामकाजासाठी सरपंचांना शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागामुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा प्रभाव अधिक सक्षमपणे दिसून येत असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील येणेरे, ठीकेकरवाडी, काळवाडी (सर्व ता. जुन्नर), लाखेवाडी (ता. इंदापूर), गुरूळी (ता. पुरंदर ) शिर्सूफळ (ता. बारामती), गलांडवाडी (ता. दौंड) या गावचे सरपंच व ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. यावेळी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आपापल्या गावात राबविण्यात येत असलेल्या नावीन्यपूर्ण व आदर्श उपक्रमांची माहिती दिली. शिवाय अभियान काळातील कामकाज, साध्य केलेली उद्दिष्टे, अडचणी व अनुभव कथन केले.उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी यांनी आभार मानले.
... आता पुढचे २५ वर्ष निसर्गाला परत द्यायचेच - पोपटराव पवार
गेल्या ७५ वर्षांपासून आपण निसर्गाकडून खुप काही घेतले आहे. परंतू, आता आपणही निसर्गाकडून घेतलेले त्याला परत करण्याची वेळ आलेली आहे. हवामान बदलामुळे मानवी अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे पुढची २५ वर्ष आता आपल्याला पर्यावरण संरक्षण करावे लागणार आहे आणि त्यासाठी निसर्गाकडून घेतलेल्याची परतफेड करायची आहे. अन्यथा भविष्यात मानवी अस्तित्वच धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही, असा धोक्याचा इशाराही आदर्श गाव प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी यावेळी बोलताना दिला.
