Pune Zilla Parishad result : पुणे जिल्हा परिषदेत सलग पाचव्यांदा 'राष्ट्रवादी'च्याच घड्याळाचाच 'गजर'!
झेडपीच्या ७३ पैकी तब्बल ५२ जागांवर विजय : भाजपचे पुणे झेडपीवरील सत्तेचे स्वप्न भंगले
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ९ फेब्रुवारी २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेवर सलग पाचव्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचाच गजर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या यंदाच्या (सन २०२६) सार्वत्रिक निवडणुकीत ७३ जागांपैकी तब्बल ५२ जागांवर विजय मिळवत पुणे जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मोठ्या विजयाने पुणे जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापित करण्याचे भाजपचे स्वप्न हवेतच विरले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर यंदा पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसला एवढा मोठा विजय मिळाला आहे.दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूती यासाठी कामी आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जाऊ लागली आहे. दरम्यान, या निवडणुकीत भाजपला केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले आहे. याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला केवळ सहा तर, शिवसेनेला (शिंदे गट) केवळ पाच जागांवर विजय मिळविण्यात यश आले आहे. नुकत्याच झालेल्या पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत मोठ्या विजयाने यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या भाजपला पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र मोठा फटका बसला आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, मावळ आणि वेल्हे या चार तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा या राष्ट्रवादी काँग्रेसने पटकावल्या आहेत. विशेष म्हणजे सन १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना हीच पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या सरकारी बंगल्यात झालेली आहे. स्थापनेपासून आजतागायत पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली सत्ता कायम राखली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या दोन वर्षे आधी म्हणजेच सन १९९७ मध्ये जिल्हा परिषदेची पंचवार्षिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता स्थापन केली होती.
परंतू, सन १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पुर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे असलेल्या अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सन २००२ च्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मित्र पक्षांच्या मदतीने पुणे जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर झालेल्या सन २००७, २०१२, २०१७ आणि आता २०२६ या सर्व निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता स्थापन करण्यात यश मिळविले आहे.
सन २०१७ च्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ७५ पैकी ४४ सदस्य निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत त्यात आणखी आठ जागांची भर पडली असून, यंदा ही संख्या ५२ वर गेली आहे. या ५२ पैकी ५१ जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर, एक जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची निवडून आली आहे. सन २०१७ च्या निवडणुकीत तत्कालीन एकसंध शिवसेनेला १४ जागांवर विजय मिळाला होता. त्यानंतर शिवसेनेत फूट पडली आणि एकसंध शिवसेनेच्या दोन स्वतंत्र शिवसेना अस्तित्वात आलेल्या आहेत.
या दोन्ही शिवसेनेने मिळून यंदा ११ जागांवर विजय मिळवला आहे. याचाच अर्थ गेल्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेच्या तीन जागा कमी झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेसला प्रत्येकी सात जागांवर विजय मिळाला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या जागांमध्ये केवळ तीनने वाढ झाली आहे. कॉंग्रेसने मात्र मागील निवडणुकीत विजयी मिळवलेल्या सर्वच्या सर्व जागा गमावल्या आहेत.
पुणे झेडपीतून कॉंग्रेस 'हद्दपार'!
दरम्यान, पुणे हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला जिल्हा होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून सन १९९९ पर्यंत म्हणजेच सलग ३८ वर्षे पुणे जिल्हा परिषदेवर कॉंग्रेसचे एकहाती वर्चस्व होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसला एकही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. यामुळे यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस पुणे जिल्हा परिषदेतून 'हद्दपार' झाली आहे.
अनेक दिग्गज पराभूत
दरम्यान, यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभूत झालेल्या उमेदवारांमध्ये जिल्ह्यातील एका विद्यमान आमदारांचे एक जवळचे नातेवाईक, एका माजी मंत्र्याचे एक जवळचे नातेवाईक, दोन माजी आमदारांचे जवळचे नातेवाईक, जिल्हा परिषदेचे दोन माजी उपाध्यक्ष व १३ माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सहा माजी सदस्यांच्या जवळच्या नातेवाईकांचा समावेश आहे.
झेडपीचे १० माजी सदस्य पुन्हा विजयी
पुणे जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून विविध कार्यकाळात काम केलेले २३ माजी सदस्य पुन्हा एकदा यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यापैकी दहा जण पुन्हा एकदा निवडून आले आहेत.
दोन बहिणी झेडपी सदस्य
यंदाच्या निवडणुकीत दोन सख्ख्या बहिणी दोन वेगवेगळ्या तालुक्यातून पुणे जिल्हा परिषदेवर निवडून आल्या आहेत. या दोन्ही बहिणी पुणे शहरातील आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कन्या आहेत. या दोघी पैकी एक पुरंदर तालुक्यातून तर, दुसरी बहिण शिरूर तालुक्यातून पुणे जिल्हा परिषदेवर निवडून आली आहे.
माजी मंत्री व माजी आमदारांचे ८ नातेवाईक विजयी
पुणे जिल्हा परिषदेच्या यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी मंत्र्याच्या एका नातेवाईकाचा पराभव झाला असला तरी, दोन माजी मंत्र्याचा प्रत्येकी एक आणि सहा माजी आमदारांचा प्रत्येकी एक नातेवाईक असे एकूण ८ जण जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत.
प्रमुख विजयी उमेदवार
- राजेंद्र गावडे (शिरूर)
- स्वरूपा थोपटे (भोर)
- सुनिता बुट्टे पाटील (खेड)
- विक्रम खुटवड (भोर)
- रुपाली कोंडे (हवेली)
- विष्णू हिंगे (आंबेगाव)
- तुषार रमेश थोरात (दौंड)
- यशराज जगदाळे (इंदापूर)
- मोनाली लांडे (जुन्नर)
- सुवर्णा दरेकर (आंबेगाव)
प्रमुख पराभूत उमेदवार
- आशा बुचके (जुन्नर)
- रणजित शिवतारे (भोर)
- अरुण गिरे (आंबेगाव)
- स्नेहल शेळके (जुन्नर)
- जयश्री खंडागळे (जुन्नर)
- अनिता आढारी (आंबेगाव)
- तुलसी भोर (आंबेगाव)
- रेखा बांदल (शिरूर)
- मालती पाचर्णे (शिरुर)
- आशा वायकर (मावळ)
- दत्तात्रेय गुंड (मावळ)
- पुजा पारगे (हवेली)
- गौरव कोलते (पुरंदर)
- दत्तात्रेय झुरंगे (पुरंदर)
- हेमंतकुमार माहूरकर (पुरंदर)
- अनंता दारवटकर (वेल्हे)
- अमोल पांगारे (भोर)
- चंद्रकांत बाठे (भोर)
- विठ्ठल आवाळे (भोर)
- सारिका दिवेकर (दौंड)
- मानसी ताकवणे (दौंड)
- अप्पासाहेब पवार (दौंड)
- अभिषेक थोरात (दौंड)
झेडपीवर निवडून आलेले माजी सदस्य
- विरधवल जगदाळे (दौंड)
- विवेक वळसे पाटील (आंबेगाव)
- गुलाब पारखे (जुन्नर)
- स्वाती पाचूंदकर (शिरूर)
- सुजाता पवार (शिरूर)
- शांताराम इंगवले (मुळशी)
- अमोल नलावडे (वेल्हे)
- अंकिता पाटील (इंदापूर)
- श्रीमंत ढोले (इंदापूर)
- तनुजा घनवट (खेड)
