Zilla Parishad election 2026 : राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या!
येत्या ७ फेब्रुवारीला मतदान, मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी : गुरुवारी रात्री १० वाजता प्रचार समाप्त
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ५ फेब्रुवारी २०२६ :- महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या प्रचाराच्या तोफा गुरुवारी (दि.५ फेब्रुवारी) रात्री १० वाजता थंडावल्या. या निवडणुकीसाठी येत्या शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी) मतदान घेण्यात येणार आहे. जाहीर प्रचाराच्या समाप्तीनंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी म्हणजे दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुद्रित माध्यमांतदेखील जाहिराती प्रसिद्ध करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
यामध्ये पुणे जिल्हा परिषदेसह पुण्यातील १३ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकींचाही समावेश आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षांना येत्या शनिवारी म्हणजेच मतदानाच्या दिवशी निवडणूक प्रचाराच्या जाहिराती प्रसिद्ध करता येणार नसल्याचे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम २८ ब (१) मध्ये या संस्थांच्या निवडणूक प्रचाराबाबतची स्पष्ट तरतूद आहे. या तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही मतदार विभागामध्ये, मतदानास सुरुवात होण्याच्या दिनांकापूर्वी चोवीस तासांमध्ये किंवा त्या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ज्या दिनांकास मतदान घेण्यात येईल,त्या दिनांकास सार्वजनिक सभा घेण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रामाणन आदेश, २०२५’ प्रसिद्ध केला आहे. या आदेशाच्या भाग आठमधील परिच्छेद १६ (घ) अन्वये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचार समाप्तीनंतर आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा समाज माध्यमांमध्ये कुठल्याच प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध करता येणार येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या अध्यादेशातील परिच्छेद १६ (ग) अन्वये दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता संपला आहे. त्यानंतर उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना प्रचारसभा, प्रचारफेऱ्या, ध्वनिक्षेपक इत्यादींसह अन्य प्रकारे जाहीर प्रचार करता येणार नसल्याचे डुड्डी यांनी स्पष्ट केले आहे.
