Deputy chief Minister appointment : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांची नियुक्ती!
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिली पद व गोपनीयतेची शपथ : सुनेत्रा पवार यांनी पटकावला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदाचा बहुमान
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
मुंबई/ पुणे, दि. ३१ जानेवारी २०२६ :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा अजित पवार यांनी शनिवारी (दि.३१ जानेवारी) राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली.महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्या राज्याच्या सतराव्या उपमुख्यमंत्री असून महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदाचा बहुमान त्यांनी पटकावला आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे हे पद रिक्त झाले होते. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार उपस्थित होते. या शपथविधी समारंभाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अमर रहे, अमर रहे, अजितदादा अमर रहे, अशा घोषणा दिल्या.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांची शनिवारी (दि.३१जानेवारी) दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली होती. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिकारही सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आहेत.
कोण आहेत सुनेत्रा पवार
नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या एक गतिशील आणि दूरदृष्टीच्या नेत्या आहेत. ज्या शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण सक्षमीकरणासाठी या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे. याआधीच्या म्हणजेच सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेच्या सदस्यपदी निवड झाली होती.त्या भारतातील सर्वसमावेशक आणि शाश्वत प्रगतीला चालना देणाऱ्या अनेक उपक्रमांमागील एक प्रेरक शक्ती म्हणून उदयास आलेल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी सन २०१० मध्ये 'एनव्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया' (EFOI) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. सध्या या संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत. ही संस्था पर्यावरणीय जागरूकता वाढवण्यासाठी आणि पर्यावरण-जागरूक समुदाय निर्माण करण्यासाठी काम करत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतात 'इको-व्हिलेज मॉडेल' या संकल्पनेचा पाया घातला. ग्रामीण विकासामध्ये पर्यावरणीय पद्धतींचे एकत्रीकरण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमाने ग्रामीण भागाचे स्वरूप बदलण्यात आणि आत्मनिर्भर, पर्यावरणदृष्ट्या जबाबदार गावांना प्रोत्साहन देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
एक उत्कट पर्यावरणवादी म्हणून पवार यांनी जैवविविधता संवर्धन, धोक्यात असलेल्या प्रजातींचे संरक्षण, जलसंपदा व्यवस्थापन आणि दुष्काळ निवारणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या व्यापक तळागाळातील मोहिमांचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या प्रभावी कार्याची दखल घेऊन, त्यांना प्रतिष्ठित “ग्रीन वॉरियर पुरस्काराने” सन्मानित करण्यात आलेले आहे. याशिवाय पवार शिक्षण क्षेत्रातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सध्या त्या बारामती येथील 'विद्या प्रतिष्ठान'च्या विश्वस्त आहेत. त्यांचा जागतिक स्तरावरील सहभागही तितकाच उल्लेखनीय आहे. सन २०११ पासून त्या 'वर्ल्ड एंटरप्रेन्योरशिप फोरम (फ्रान्स)' च्या थिंक टँक सदस्य आहेत आणि शाश्वतता व सामाजिक नवोपक्रमावरील आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत.
महाराष्ट्राचे आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री व त्यांचा कार्यकाळ
१) नाशिकराव तिरपुडे (अर्स कॉंग्रेस ) --- दि. ५ मार्च १९७८ ते दि. १८ जुलै १९७८.
२) सुंदरराव सोळंके (सोशॅलिस्ट कॉंग्रेस) --- दि. १८ जुलै १९७८ ते दि. १७ फेब्रुवारी १९८०.
३) रामराव आदिक (कॉंग्रेस) --- दि.२ फेब्रुवारी १९८३ ते दि. ५ मार्च १९८५.
४) गोपीनाथ मुंडे (भाजप) --- दि. १४ मार्च १९९५ ते दि. १८ ऑक्टोबर १९९९.
५) छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) --- दि. २७ ऑक्टोबर १९९९ ते दि.२३ डिसेंबर २००३.
६) विजयसिंह मोहिते-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) --- दि.२५
डिसेंबर २००३ ते दि. १ नोव्हेंबर २००४.
७) आर. आर. पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) --- दि. १ नोव्हेंबर २००४ ते दि. ४ डिसेंबर २००८.
८) छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) --- दि. ८ डिसेंबर २००८ ते दि. ६ नोव्हेंबर २००९.
९) छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) --- दि. ६ नोव्हेंबर २००९ ते दि. ११ नोव्हेंबर २०१०.
१०) अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) --- दि. ११ नोव्हेंबर २०१० ते दि. २५ सप्टेंबर २०१२.
११) अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) --- दि. ७ डिसेंबर २०१२ ते दि. २६ सप्टेंबर २०१४.
१२) अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) --- दि. २३ नोव्हेंबर
२०१९ ते दि. २६ नोव्हेंबर २०१९.
१३) अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) --- दि. ३० डिसेंबर २०१९ ते दि.२९ जून २०२२.
१४) देवेन्द्र फडणवीस (भाजप) --- दि. ३० जून २०२२ ते दि. ५ डिसेंबर २०२४.
१५) १) एकनाथ शिंदे (शिवसेना) --- दि. ५ डिसेंबर २०२४ पासून.
२) अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) --- दि. ५ डिसेंबर २०२४ ते दि. २८ जानेवारी २०२६.
१६) सुनेत्रा अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) --- दि. ३१ जानेवारी २०२६ पासून.
महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री हे संविधानिक पद नव्हे
महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री हे संविधानिक पद नसून ते केवळ राजकीय सोयीसाठी निर्माण केलेले पद आहे. त्यामुळे आतापर्यंत या पदावर एकापेक्षा जास्त वेळा विविध नेत्यांनी काम केलेले आहे. स्व. अजित पवार हे महाराष्ट्राचे सर्वात दीर्घकाळ या पदावर काम केलेले नेते आहेत. पवार यांनी विविध मुख्यमंत्र्यांच्या समवेत दीर्घकाळापर्यंत उपमुख्यमंत्री पदावर काम केले आहे.
