मराठवाड्याची माहेरवाशीण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान!

धाराशिव जिल्ह्यात नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे माहेर : पवार यांच्यामुळे मराठवाड्यातील व्यक्तीला तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपद

मराठवाड्याची माहेरवाशीण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान!
पुणे:- नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ३१ जानेवारी २०२६ :-  महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे माहेर मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील तेर हे गाव आहे. पुर्वाश्रमीच्या सुनेत्रा बाजीराव पाटील असलेल्या लग्नानंतर सुनेत्रा अजित पवार झाल्या‌. सुनेत्रा पवार यांच्या या नियुक्तीमुळे मराठवाड्यातील व्यक्तीला तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपद मिळाले आहे. 

याआधी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील दोन नेत्यांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची संधी मिळालेली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार सुंदरराव सोळंके आणि बीड व लातूर या दोन जिल्ह्यात असलेल्या तत्कालीन रेणापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीनाथ मुंडे या दोन दिग्गज नेत्यांनी उपमुख्यमंत्री पदावर काम केलेले आहे. 

नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे बालपण, शालेय व माध्यमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण हे धाराशिव जिल्ह्यात झालेले आहे. धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे त्यांचा जन्म झालेला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिनी आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना माहेरातूनच मोठा राजकीय वारसा मिळालेला आहे.  

मराठवाड्यातून पुढे आलेल्या सुनेत्रा पवार या कर्तृत्ववान महिला नेत्या आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वरिष्ठ पातळीवर मोठ्या हालचाली होऊन  सत्ता-संतुलन, सामाजिक समीकरणे आणि महिला नेतृत्वाला बळ देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला गेला आहे.

दुष्काळ, स्थलांतर, शिक्षणाचा अभाव आणि विकासाची दीर्घ प्रतीक्षा अशा असंख्य आव्हानांनी ग्रासलेल्या मराठवाड्याची ही माहेरवाशीण राजकारणात संघर्षातून उभी राहिली आहे. महिला बचत गट आणि संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून सुरू केलेला सुनेत्रा पवार यांच्या या प्रवासाने उपमुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेतली आहे. संघटन कौशल्य, प्रशासकीय अभ्यास आणि जनतेशी थेट संवाद याच्या बळावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

विशेषतः महिला, युवक आणि ग्रामीण घटकांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे त्यांना या पदावर संधी मिळाली आहे. त्यामुळे त्या आता अजित पवार यांच्या उत्तराधिकारी म्हणून काम करणार आहेत. 

महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत फेररचना, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका आणि महायुतीतील राजकीय पक्षांचा समतोल राखण्यासाठी सुनेत्रा पवार यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातच महिला नेतृत्वाला सर्वोच्च कार्यकारी पदावर संधी देण्याचा राजकीय संदेश देण्यासाठी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ही सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

या नियुक्तीमुळे मराठवाड्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील विविध सामाजिक संघटना, महिला बचतगट, युवक संघटना आणि स्थानिक नेत्यांकडून सुनेत्रा पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे‌‌. यामधून मराठवाड्याची 'लेक' सत्तेच्या केंद्रस्थानी ही भावना ठळकपणे व्यक्त होत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, हा निर्णय केवळ सत्तेचा नव्हे, तर सामाजिक संदेश देणारा ठरेल.शिवाय  महाराष्ट्राच्या राजकारणात हा क्षण ऐतिहासिक ठरला आहे.

मराठवाड्यातील तीनही उपमुख्यमंत्र्यांच्या नावावर प्रत्येकी एका विक्रमाची नोंद 

मराठवाड्यातून उपमुख्यमंत्रीपदी झालेल्या तीनही नेत्यांच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे. तो म्हणजे महाराष्ट्राचे दुसरे आणि मुळचे बीडचे असलेले उपमुख्यमंत्री दिवंगत सुंदरराव सोळंके हे समाजवादी काँग्रेस पक्षाचे पहिले आणि शेवटचे एकमेव उपमुख्यमंत्री ठरले आहेत. त्यामुळे सोळंके यांच्या नावावर समाजवादी काँग्रेसचे एकमेव उपमुख्यमंत्री हा विक्रम  नोंदला गेला आहे. दुसरे उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे हे भारतीय जनता पक्षाचे राज्यातील पहिले उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे मुंडे यांच्या नावावर भाजपच्या पहिल्या उपमुख्यमंत्रीपदाचा विक्रम नोंदला गेला आहे. आता या पदावर विराजमान झालेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावावर राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाचा विक्रम नोंदवला गेला आहे.