NCp Group leader selection : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड!

राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा : शनिवारी सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार 

NCp Group leader selection : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड!
मुंबई:- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त विधिमंडळ गटनेत्या सुनेत्रा पवार.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ३१ जानेवारी २०२६ :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड शनिवारी (दि.३१ जानेवारी) एकमताने निवड करण्यात आली. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे हे पद रिक्त झाले होते. या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व अधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे आले आहेत. या निवडीनंतर सुनेत्रा पवार राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, आज (शनिवारी) सायंकाळी पाच वाजता त्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. 

माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे बुधवारी (दि. २८ जानेवारी) रोजी विमान अपघातात निधन झाले आहे‌. अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेतेपद, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री ही पदे रिक्त झाली आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची शनिवारी दुपारी दोन वाजता मुंबईतील विधान भवनात  बैठक झाली‌.

या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते  दिलीप वळसे पाटील यांनी गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्याबाबतचा ठराव मांडला. या ठरावाला पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते हसन  मुश्रीफ, कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री धनंजय मुंडे, अजित पवार यांचे पुत्र जय पवार आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, आमदार उपस्थित होते.