Zilla Parishad elections 2026 : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद,पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्या, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय!
आता ५ नव्हे ७ फेब्रुवारीला मतदान तर, ९ फेब्रुवारीला मतमोजणी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे मुदतवाढ
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २९ जानेवारी २०२६ :- महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या चालू निवडणुका दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यानुसार आता या निवडणुकीसाठी येत्या ७ फेब्रुवारीला मतदान घेतले जाणार असून येत्या ९ फेब्रुवारीला मतमोजणी केली जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे.
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार या निवडणुकीसाठी येत्या ५ फेब्रुवारीला मतदान होणार होते. शिवाय येत्या ७ फेब्रुवारीला मतमोजणी केली जाणार होती. दरम्यान, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. यामुळे राज्य सरकारने दि. २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यात शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आधीच या निवडणुका वेळेत घेण्यासाठी उमेदवारांना प्रचारासाठी कमी वेळ देण्यात आला होता. त्यातच शासकीय दुखवट्यामध्ये तीन दिवस प्रचार करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय उमेदवारांना प्रचारासाठी वेळ मिळत नसल्याचे निदर्शनास आल्याने दोन दिवसांची ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान, या मुदतवाढीबाबतची अधिसूचना येत्या ३१ जानेवारीला आपापल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रसिद्ध करणार आहेत. याबाबतचा आदेश या बारा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे. शिवाय जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीबाबतचा सुधारित निवडणूक कार्यक्रमही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे. यामध्ये पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या निवडणुकांचाही समावेश आहे.
पुणे जिल्हा परिषदेला आणि पुणे जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांना तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर अनुक्रमे जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती मिळणार आहेत. जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांचा कार्यकाळ दि. १३ मार्च २०२२ तर, जिल्हा परिषदेचा कार्यकाळ दि. २० मार्च २०२२ रोजी संपुष्टात आलेला आहे.
निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या जिल्हा परिषदा
- पुणे
- कोल्हापूर
- सांगली
- सातारा
- सोलापूर
- रायगड
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
- छत्रपती संभाजीनगर
- परभणी
- धाराशिव
- लातूर.
