जुन्या नोटा सांभाळता सांभाळता जिल्हा बँकांच्या आले नाकीनऊ, राज्यातील आठ जिल्हा बँकांपुढे जुन्या नोटांचा यक्षप्रश्न!

सरकार आणि बॅंकाच्या वादात नोटा नऊ वर्षांपासून बॅंकामध्येच धूळखात पडून : सर्वोच्च न्यायालयात खटला प्रलंबित

जुन्या नोटा सांभाळता सांभाळता जिल्हा बँकांच्या आले नाकीनऊ, राज्यातील आठ जिल्हा बँकांपुढे जुन्या नोटांचा यक्षप्रश्न!
पुणे:- भारतीय चलनातील जुन्या नोटा

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा

पुणे, दि. ४ एप्रिल २०२५ :-  केंद्र सरकारने सुमारे नऊ वर्षांपूर्वी जुन्या १ हजार व ५०० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी सुरू केली. या निर्णयानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राज्यातील आठ जिल्हा बँकांच्या सुमारे १२८ कोटी रुपये किंमतच्या जुन्या नोटा जमा करून घेण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने नकार दिला आणि तेव्हापासून या जुन्या नोटा अद्यापही या बॅंकामध्येच धूळखात पडून आहेत. या जुन्या नोटा सांभाळता सांभाळता जिल्हा बँकांच्या नाकीनऊ आले आहेत. शिवाय त्यांच्या देखभालीसाठी खर्च करावा लागत आहे. पण या नोटांचे करायचे काय, हा यक्षप्रश्न या बॅंकापुढे निर्माण झाला आहे. 

दरम्यान, या बॅंकानी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात पुणे जिल्हा बँकेच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम हे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत. या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने अद्याप अंतिम निर्णय घेतला नसला तरी, न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत या जुन्या नोटा बॅ़केच्या लेखापरीक्षण अहवालात दाखविण्यास परवानगी दिली आहे. सरकार आणि बॅंकाच्या वादात या नोटा अद्यापही तशाच 'जैसे थे' स्थितीत धूळखात पडल्या आहेत. 

केंद्र सरकारने १६ नोव्हेंबर २०१६ रोजी १ हजार व ५०० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत. या निर्णयानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १७ नोव्हेंबर २०१६ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हा बॅंकेत जमा झालेल्या जुन्या नोटा परत जमा करून घेण्यास नकार दर्शविला. त्यामुळे या जुन्या नोटा सरकारजमा होऊ शकल्या नाहीत. दरम्यान, तेव्हापासून आजतागायत या नोटा तशाच पडून असून, त्या चोरीला जाऊ नयेत, त्यांना वाळवी लागू नये, त्या अन्य कारणांनी खराब होऊ नयेत, यासाठीची काळजी घ्यावी लागत आहे. 

या आठ बॅंकामध्ये पुण्यासह कोल्हापूर, सांगली, (तत्कालीन नगर), नाशिक, नागपूर, अमरावती आणि वर्धा यांचा समावेश आहे. 

पुणे जिल्हा बँकेचे २२ कोटी २५ लाख रुपये 

भारतीय रिझर्व्ह बँकेने जुन्या नोटा परत जमा करून न घेतलेल्या सुमारे १२८ कोटींमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २२ कोटी २५ लाख रुपयांच्या जुन्या नोटांचा समावेश असल्याचे शुक्रवारी (दि. ४ एप्रिल) पुणे जिल्हा बँकेतून सांगण्यात आले.