येत्या गुढीपाडव्याला (३० मार्च) करणार १०० कोटी लिटर पाणी बचत, जनसेवा न्यासाचा संकल्प
अमनोरा येस्स फौंडेशन आणि जनसेवा न्यासातर्फे महिलांची दुचाकी रॅली : शहरातील १७ ठिकाणांहून एकाचवेळी सुरू होणाऱ्या रॅलीत तब्बल ५ हजार महिला सहभागी होणार

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २७ मार्च २०२५ :- पुणे शहरातील हडपसर येथील जनसेवा न्यासाने दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यानिमित्त पाणी बचतीचा निश्चय केला आहे. यानुसार यंदाच्या गुढीपाडव्याला (दि. ३० मार्च) १०० कोटी लिटर पाण्याची बचत करण्याचा संकल्प केला आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच येत्या रविवारी हिंदू महिला महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. मराठी नववर्षाच्या स्वागताबरोबरच यंदा अमनोरा येस्स फौंडेशनच्या सहकार्याने हा पाणी बचतीचा संकल्प करण्यात आला आहे. हिंदू महिला महोत्सवानिमित्त महिलांची दुचाकी रॅली काढली जाणार असून रॅलीच्या सांगतास्थळी महिला पाणी बचतीची शपथ घेणार आहेत, अशी माहिती अमनोरा येस्स फौंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, जनसेवा न्यासाचे कार्यकारी विश्वस्त माधव राऊत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सी. ई. ओ.) चेतन कुलकर्णी यांनी गुरुवारी (दि.२७) पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी अमनोरा येस्स फौंडेशनचे विवेक कुलकर्णी उपस्थित होते.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे. समाजहिताच्या दृष्टीने संघाने काही ध्येये आणि उद्दिष्टे निश्चित केली आहेत. याच विचाराने जनसेवा न्यासातर्फे मराठी नववर्षाचे स्वागत करतानाच समाजहिताच्या दृष्टीने पाणी बचतीचा संकल्प केला जाणार आहे. रॅलीच्या माध्यमातून पाणी बचतीसाठी जनजागृती केली जाणार आहे. हडपसर आणि परिसरातील महिलांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. रॅलीत सहभागी महिलांना सन्मानपत्र व पाणी बचतीसंदर्भातील बँड दिला जाणार आहे. पाणी बचतीसंदर्भात जनजागृती करणाऱ्या महिलांना ‘जलज्योती’ असे संबोधण्यात येणार आहे.
दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने जनसेवा न्यासातर्फे महिलांची रॅली काढली जाते. यंदा नववर्षाच्या स्वागत सोहळ्याला वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे. हडपसर परिसरातील माळवाडी, वैदुवाडी, रामटेकडी, ससाणेनगर, गोंधळेनगर, सातववाडी, फुरसुंगी,भेकराईनगर, बी. टी. कवडे रोड, मगरपट्टा, अमनोरा, शेवाळवाडी, मुंढवा,मांजरी, कुमार पिकासो, उंड्री, पिसोळी, व्हिनस वर्ल्ड स्कूल, अमरसृष्टी आणि अमनोरामधील महिलांची अस्पायर टॉवर्स आणि अवंतिकांची मेट्रो टॉवर्स यासह एकूण १७ ठिकाणांहून दि. 30 मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता महिलांच्या दुचाकी रॅलीला सुरुवात होणार आहे. सहभागी होणाऱ्या महिला या नऊवारी साडी परिधान करून मराठमोळा फेटा बांधून रॅलीत सहभागी होणार आहेत. रॅलीत सहभागी होण्यासाठी नावनोंदणीला सुरुवात झाली असून आतापर्यंत ४ हजार २०० महिलांची नोंदणी झाली आहे. दुचाकी रॅलीची सांगता त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता अमनोरा क्रिकेट ग्राउंड, एड्रिनो टॉवर समोर, अमनोरा, हडपसर येथे होणार आहे. ढोल-ताशा पथकाचे वादन झाल्यानंतर महिला पाणी बचतीची शपथ घेणार आहेत.
अमनोरामध्ये पाणी बचतीला महिलांच्या पुढाकारातून सुरुवात झाली आहे. अमनोरात घरकाम करणाऱ्या महिलांना; ज्यांना अवंतिका संबोधले जाते त्यांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्यात आले असून त्याही गेल्या काही वर्षांपासून पाण्याचा काळजीपूर्वक वापर करीत आहेत. या अवंतिकांचाही दुचाकी रॅलीत सहभाग असणार आहे.
प्रयागराज महाकुंभ जलपूजन
जिथे स्त्रीची पूजा होते, तिथेच देवांचा वास असतो, या आपल्या सांस्कृतिक मूल्याचा जागर महिला महोत्सवातून केला जाणार आहे. पाण्याची बचत म्हणजे पर्यावरणाचा पाया. आपल्या आयुष्यातील पाण्याचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व पुराणकाळापासून सांगितले गेले आहे. कुटुंबातील स्त्रीने पाणी बचतीचे महत्त्व जाणून घेतल्यास संपूर्ण कुटुंब त्यास हातभार लाऊ शकते. याच उद्देशाने पाणी बचतीसाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. प्रयागराज येथील जलकलशाचे पूजन करून १०० कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प केला जाणार आहे.