Krushimitra Gajendra Bade Ph.D. Declared : कृषिमित्र गजेंद्र बडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट (Ph.D.) पदवी जाहीर!

'मराठीतील कृषिविषयक नियतकालिकांचा अभ्यास' या विषयावरील गजेंद्र बडे यांचे ठरले महाराष्ट्रातील पहिले संशोधन

Krushimitra Gajendra Bade Ph.D. Declared  : कृषिमित्र गजेंद्र बडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट (Ph.D.) पदवी  जाहीर!
पुणे :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी जाहीर केल्यानंतर गजेंद्र बडे यांचा सपत्नीक सत्कार करताना मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे, बहिस्थ परीक्षक प्रा. डॉ. महादेव देशमुख, मार्गदर्शक आणि विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे , दि. २७ मे २०२५ :-  कृषिमित्र गजेंद्र प्रभाकर बडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवी जाहीर केली आहे. श्री.बडे यांनी 'मराठीतील कृषिविषयक नियतकालिकांचा अभ्यास' या विषयावर संशोधन करुन पुणे विद्यापीठाला शोध प्रबंध सादर केला होता. विद्यापीठाने हा शोध प्रबंध स्विकारला आहे. 'मराठीतील कृषिविषयक नियतकालिकांचा अभ्यास' या विषयावर महाराष्ट्रात याआधी एकही संशोधन झालेले नाही. या विषयावरील बडे यांचे हे राज्यातील एकमेव संशोधन ठरले आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील अहमदनगर महाविद्यालय, अहिल्यानगर येथील मराठी संशोधन केंद्रात हे संशोधन करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे कला व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गजेंद्र बडे यांनी हे संशोधन पूर्ण केले.दरम्यान, पी एच. डी. ही विद्यापीठाची सर्वोच्च पदवी जाहीर झाल्याबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस आणि अहमदनगर महाविद्यालयातील मराठी संशोधन केंद्राचे विभागप्रमुख डॉ. सुधाकर शेलार यांनी गजेंद्र बडे यांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, गजेंद्र बडे हे मागील २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. श्री.गजेंद्र बडे यांनी आतापर्यंत विदर्भातील दैनिक देशोन्नतीचे मंत्रालय विशेष प्रतिनिधी, दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीत बातमीदार, उपसंपादक आणि सकाळमध्ये बातमीदार व प्रिन्सिपल करस्पॉंडंट या पदांवर काम केलेले आहे. आतापर्यंत बडे यांची विविध चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यापैकी एका पुस्तकाला राज्य सरकारचा उत्कृष्ट वाड्मय तर, एका पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय पत्रकारितेत मानाचा समजल्या जाणाऱ्या पत्रकार वरुणराज भिडे आश्वासक पत्रकारिता पुरस्कारासह केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांचे मिळून १३ पुरस्कार बडे यांना मिळालेले आहेत.

याआधी गजेंद्र बडे यांना कृषी क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी कृषिमित्र या पदवीने गौरविलेले आहे. याशिवाय बडे हे देशातील पहिल्या पत्रकार मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.