Ajit Pawar Funeral : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप!

बारामतीत शासकीय इतमामात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार : अजित पवार यांना अखेरचा निरोप देताना महाराष्ट्र हळहळला 

Ajit Pawar Funeral : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप!
बारामती:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देताना उपस्थित जनसमुदाय. दुसऱ्या छायाचित्रात अजित पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे/बारामती, दि. २९ जानेवारी २०२६ :- अमर रहे, अमर रहे, अजितदादा अमर रहे, एकच वादा अजितदादा अशा घोषणा देत लाखोंच्या जनसमुदायाने शोकाकुल वातावरणात  उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साश्रुनयनांनी गुरुवारी (दि.२९ जानेवारी) अखेरचा निरोप दिला. बारामती (जिल्हा पुणे) येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात गुरुवारी सकाळी अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांना अखेरचा निरोप देताना महाराष्ट्र हळहळला. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कारासाठी उपस्थित जनसमुदायातील हजारो कार्यकर्ते व बारामती येथील नागरिकांनी दादा परत या…, म्हणत आक्रोश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि. २८ जानेवारी) सकाळी पावणे नऊ वाजता विमान अपघातात निधन झाले. विशेष म्हणजे दिवंगत अजित पवार यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात बारामतीतून झाली आणि शेवटचा श्वासही त्यांनी बारामतीत घेतला.

भारताचे गृहमंत्री अमित शाह,केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर,केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रताप जाधव, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ,आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री नारा लोकेश, खासदार निरज चंद्रशेखर, मंत्री गणेश नाईक,बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रेय भरणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, मंगलप्रसाद लोढा, संजय राठोड, आदिती तटकरे, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, प्रा. डॉ.अशोक उईके, नरहरी झिरवाळ, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, माजी मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, आकाश फुंडकर, राज्याचे मुख्य सचिव राजेश आगरवाल आदींसह अनेक मंत्री, विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, खासदार, आमदार आणि पवार कुटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित होते. 

दरम्यान, पत्नी खासदार सुनेत्रा पवार, पार्थ व जय पवार ही दोन्ही मुले आणि पवार कुटुंबीयांनी अजित पवार यांचे अखेरचे दर्शन घेतले.पत्नी सुनेत्रा पवार यांनी ३७ वर्षे अजित पवार यांच्याबरोबर सहजीवनाचा प्रवास केला. तो गुरुवारी संपला.अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रासह बारामती निःशब्द झाली होती.

बुधवारी सकाळी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यात अजित पवार यांचे निधन झाल्याचे  समजताच पाणावलेले डोळे आणि सुन्न झालेले चेहरे अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी व्याकूळ झाले होते. बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक वैद्यकीय महाविद्यालयातील प्रत्येक क्षण अंतःकरण हेलावून टाकणारा होता.आपल्या लाडक्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी कसलीही तमा न बाळगता बारामतीकडे धाव घेतली. कोणी दुचाकीवर, कोणी चारचाकीत तर, अनेक जणांनी पायीच हे रुग्णालय गाठले होते. राज्याच्या विविध भागांतून हजारो नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने बारामतीत दाखल झाले होते.  परिसरात कोठेही गोंगाट नव्हता. परंतू, या शांततेत दडलेला शोक अधिकच बोचरा वाटत होता.

बारामतीतील पवार कुटुंबाने आपल्या कर्तृत्वाने देशाच्या व राज्याच्या राजकारणात मोठी ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांच्याकडे सन १९८८ मध्ये बारामतीची सूत्रे सोपविली होती. तेव्हापासून आजतागायत अजित पवार यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. अजित पवार यांना बारामतीकरांनी एक वेळा खासदारकी आणि सात वेळा आमदारकी बहाल करीत भरभरून प्रेम केले.अजित पवार यांनीसुद्धा बारामतीकरांच्या प्रेमाची जाणीव ठेवत बारामती शहर व तालुक्याचा कायापालट केला. अजित पवार हे सकाळी सहा वाजल्यापासून बारामतीकरांसाठी काम करत असत. बारामती शहर देशातील क्रमांक एकचे शहर बनविण्याचे अजित पवार यांचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न अधुरेच राहिले आहे.