Remove the bogus certificates of Zilla Parishad's disabled teachers : पुणे झेडपीच्या दिव्यांग शिक्षकांची बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे संगणक प्रणालीतून हटवा, अन्यथा घंटानाद आंदोलन
आरोग्य उपसंचालकांकडे मागणी : प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे धर्मेंद्र सातव पाटील यांचा इशारा
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २३ डिसेंबर २०२५ :- पुणे जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या दिव्यांग शिक्षकांपैकी आतापर्यंत ४६ जणांची दिव्यांग प्रमाणपत्रे ही फेरतपासणीत बोगस असल्याची आढळून आलेली आहेत. मात्र ही बोगस प्रमाणपत्रे अद्यापही संगणकीय प्रणालीतून हटविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे ही बोगस प्रमाणपत्रे त्वरीत हटवा, अशी मागणी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे धर्मेंद्र सातव पाटील यांनी आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.ही बोगस प्रमाणपत्रे त्वरीत हटवा,अन्यथा, येत्या २९ डिसेंबरला आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर घंटा नाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
बदल्यांमधून सूट मिळण्यासाठी अनेक शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे सादर केल्याचा आरोप करत, या सर्व प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्याची मागणी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने केली होती. या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा आणि विविध मार्गाने आंदोलन केल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने ही मागणी मंजूर केली होती.
यानुसार ससून व औंध येथील जिल्हा रुग्णालयात ही फेरतपासणी करण्यात आली होती. यात आतापर्यंत ४६ जणांचे दिव्यांगत्व हे ४० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हे सर्व जण अपात्र ठरले आहेत. दिव्यांगत्व बोगस आढळलेल्या सर्व अपात्र दिव्यांग शिक्षकांचे जुने प्रमाणपत्र संगणक प्रणालीवरून काढून टाकणे आवश्यक होते. पण प्रत्यक्षात संगणक प्रणालीत अद्यापही जुनेच प्रमाणपत्र दिसत असल्याचे सातव पाटील यांनी या निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्यावतीने महाराष्ट्रात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून, या प्रमाणपत्राद्वारे दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांच्या सुविधांचा लाभ घेणाऱ्या दोषी व्यक्तींना शोधून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.यानुसार पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये कार्यरत असलेल्या अनेक शिक्षकांकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे खरे दिव्यांग हे आपल्या हक्क व अधिकारापासून वंचित राहत असल्याचा आरोप धर्मेंद्र सातव पाटील यांनी केला आहे.
