A warrior woman who rose to success through struggle : Kavya Ladkat :- संघर्षातून यशस्वी उभारी घेणारी 'रणरागिणी' : काव्या लडकत!
मुलाचे भविष्य घडवत यशस्वी उद्योजिका होण्यापर्यंतचा संघर्षमय प्रवास
संघर्षातून यशस्वी उभारी घेणारी 'रणरागिणी' : काव्या लडकत
एका आजारपणामुळे पतीचे अकाली निधन झाल्यानंतर संसाराचा गाडा एकटीने ओढत, लहान मुलाचे संगोपन व शिक्षण करत यशस्वी ठरलेल्या एका महिलेची ही यशकथा आहे. ही यशकथा केवळ एका महिलेची नसून धैर्य, जिद्द आणि मातृत्वाच्या सामर्थ्याची साक्ष देणारी व अन्य महिलांना प्रेरणा देणारी आहे. अडचणींवर मात करत आणि अडथळ्यांवर स्वार होऊन यशस्वी उद्योजिका होण्यापर्यंतचा प्रवास केलेल्या पुणे येथील यशस्वी उद्योजिका काव्या लडकत यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा लेखाजोखा या लेखात मांडण्यात आला आहे.
डॉ. गजेंद्र बडे
लग्नानंतर पुणे शहरात आलेल्या काव्या लडकत साराचा गाडा सुखाने चालू होता. सर्व काही सुरळीत चाललं होतं. त्यात मुलाचे संगोपन, शिक्षण आणि पतीचा व्यवसाय सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. पण नियतिच्या मनात मात्र वेगळंच चालू होते. यातूनच पतीला एका आजाराने घेरले आणि या आजारातच त्यांचे अकाली निधन झाले. यामुळे कुटुंबाचा मुख्य आधार गेला. घरात अन्य कर्ताधर्ता कोणी नाही. पदरात लहान मुलगा. त्यामुळे मुलाचे संगोपन आणि शिक्षणाची जबाबदारी खांद्यावर येऊन पडली. शिवाय संसार आणि व्यवसायाचा भार पेलण्याची जबाबदारी आली. अशाही परिस्थितीत न डगमगता धैर्य व जिद्दीच्या जोरावर त्यांनी संघर्ष करण्याचा मनोदय केला आणि तशी वाटचालही सुरू केली आणि 'धीर धरावा, वीर व्हावे.' या म्हणीचा प्रत्यय आणून दिला आणि संकटात संयम व धैर्य ठेवले, तर यश निश्चित मिळते, हेच काव्या लडकत यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.
उद्योजिका काव्या लडकत यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक हे आहे. वडील वास्तूविशारद (आर्किटेक्ट) असल्याने ते मुंबईत स्थायिक झाले. त्यामुळे काव्या लडकत यांचा जन्म मुंबईचा. शिक्षण मुंबईतच झाले आणि संपूर्ण बालपणही मुंबईतच गेले. सन १९९५ मध्ये पुणे येथील मनिष लडकत यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला आणि पुर्वाश्रमीच्या काव्या घोलप या काव्या मनिष लडकत झाल्या.
एका मध्यमवर्गीय कुटुंबातील गृहिणी. व्यावसायिक पती. लग्नानंतर चार वर्षांनी म्हणजेच सन १९९९ मध्ये मुलाचा जन्म झाला आणि दोघांच्या संसारात आनंदाचे उधाण आले. त्यानंतर दोघांनी मिळून मुलाचे संगोपन व शिक्षण सुरू केले.सर्व काही सुरळीत सुरू होते. पण मुलाचे शालेय शिक्षण सुरू असतानाच पतीला एका आजाराने गाठले. या आजारातच सन २०१४ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यावेळी मुलगा पार्था हा दहावीच्या वर्गात शिकत होता. या अचानक कोसळलेल्या दुःखाच्या डोंगराखाली काव्या लडकत या अक्षरशः कोलमडून पडल्या. कुटुंबाचा आधार गेला होता, सामाजिक सुरक्षाही नव्हती. मात्र, अशा स्थितीतही त्यांनी पहिल्यांदा स्वतःला सावरत मुलाच्या भविष्याचा विचार केला. कारण संसार आणि स्वतःचा पेट्रोल व डिझेल डिलरचा व्यवसाय स्वतःलाच चालवायचा होता. या व्यवसायाचे काहीही ज्ञान नव्हते. त्यामुळे आधी व्यवसायातील कामाचे स्वरूप समजून घेतले आणि तो व्यवसाय सांभाळण्यास सक्षमपणे सुरूवात केली.
काव्या लडकत यांचे वडीलही त्यांच्या लहानपणीच वारले. आई गृहिणी. एक भाऊ व एक बहिण असे त्यांचे माहेरातील कुटुंब. काव्या लडकत यांनी बारावीनंतर इंटेरियर डिझाईन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. पण हे शिक्षण चालू असतानाच वयाच्या १९ व्या वर्षी लग्न ठरले आणि वयाच्या २० व्या वर्षी लग्न झाले. लग्न झाल्यामुळे हे शिक्षण अर्धवट सोडावे लागले.
दरम्यान, एकीकडे व्यावसाय सांभाळत असतानाच मुलाचे शिक्षण चालू होते. त्यामुळे मुलास शाळेत नेऊन सोडणे, शाळेतून घरी आणणे, कौंटुबिक जबाबदारी पार पाडणे, संसाराचा गाडा हाकणे आणि स्वतःचा व्यवसाय सांभाळणे अशी संपूर्ण जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांना अगदी तारेवरची कसरत करावी लागत असे. मात्र त्यांनी परिस्थितीला दोष न देता स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि घरगुती जबाबदाऱ्या सांभाळत काव्या लडकत यांनी सुरुवातीला विविध प्रकारची छोटी-मोठी कामे करत उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यातून मुलाचे शिक्षण पूर्ण केले. मुलगा पार्था याने मार्केटिंगमध्ये (विपणन) एम. बी. ए. केले असून सध्या तो कॅनडात उच्च पदावर कार्यरत आहे.
दुसरीकडे स्वतःचा पेट्रोल-डिझेलचा व्यावसाय त्यांनी उच्च शिखरावर नेला आहे. पुण्यातील भवानी पेठेतील लडकत ब्रदर्स सर्व्हिस स्टेशन हा पेट्रोल पंप त्या यशस्वीपणे चालवत आहेत. सध्या त्यांच्याकडे ४० कर्मचारी काम करत आहेत. यातून त्या यशस्वी उद्योजिका झाल्या आहेत. त्यांचा हा एक गृहिणी (हाऊसवाईफ) ते यशस्वी उद्योजिकेपर्यंतचा संघर्ष आणि प्रवास थक्क करणारा आणि अन्य एकल महिलांना प्रेरणा देणारा आहे. संघर्षातून उभारी घेत यशाला गवसणी घालणारी ही कथा समाजातील असंख्य एकल मातांसाठी आशेचा किरण ठरू लागली आहे.
गुंडांशीही दोन हात करावे लागले
स्वतःचा डिझेल-पेट्रोलचा व्यावसाय सांभाळण्यास सुरूवात केल्यानंतर सुरुवातीला काही गुंडांशींही दोन हात करावे लागले. कारण काही गुंड फुकट पेट्रोल भरणे, उधार पेट्रोल भरणे, उधारीचे पैसे न देणे, पेट्रोल भरून पळून जाणे, फुकट पेट्रोल देण्यास नकार दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, असे प्रकार करत असत. त्यामुळे काव्या लडकत यांना सुरुवातीला गुंडांशींही दोन हात करावे लागले.
कृतीतून सामाजिक एकतेचा संदेश
दरम्यान, त्या आज त्यांच्या पेट्रोल पंपावर विविध धर्मीय सण व उत्सव साजरे करत असतात. त्या जात-पात किंवा धर्मभेद मानत नाहीत. त्यातूनच त्या सर्वधर्मीय सण व उत्सव साजरे करत असतात. त्यांच्या या कृतीतून त्या सामाजिक एकतेचा संदेश देत असतात.
लडकत पेट्रोल पंप एक परिवार
लडकत पेट्रोल पंपावर कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे वाढदिवस साजरे करणे, त्यांच्या कौटुंबिक अडचणीला धाऊन जाणे, विविध मार्गाने मदत करणे आदींच्या माध्यमातून त्यांनी लडकत एक परिवार ही संकल्पना रूजविली आहे.
'जगा आणि जगू द्या' चा संदेश
नाताळ सणाच्या निमित्ताने पेट्रोल पंपांवरील कर्मचारी व दिव्या लडकत यांनी ख्रिसमसच्या टोप्या परिधान केल्या होत्या. पण या टोप्या परिधान करण्यास मज्जाव करणारा एक प्रसंग दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी घडला. या पार्श्वभूमीवर काव्य लडकत यांनी जात व धर्मभेद मानू नये. सर्वधर्मसमभाव ठेवला पाहिजे, असा सल्ला देत 'जगा आणि जगू द्या'चा संदेश दिला आहे.
