Zp selecton 2026 : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या शनिवारी मतदान!
पुणे झेडपीचा समावेश, सुट्टी जाहीर : मतदानासाठी बारापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा अनिवार्य
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ६ फेब्रुवारी २०२६ :- महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या शनिवारी (दि.७ फेब्रुवारी) मतदान होणार आहे. शनिवारी सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू होणार आहे. हे मतदान सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे. या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मतदाराने बारापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा सादर करणे अनिवार्य आहे.
दरम्यान, यामध्ये पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचाही समावेश असून यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी शुक्रवारी (दि.६ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक विभागाच्या जिल्हा समन्वयक डॉ. चारूशीला देशमुख-मोहिते उपस्थित होत्या. नागरिक व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसहिंतेचे पालन करून शांततेत पूर्ण प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन डूडी यांनी केले आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ गट व पंचायत समितीच्या १४६ गणाकरिता ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात ३ हजार ६०५ मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण २९ लाख ७६ हजार ८०५ मतदार आहेत. या निवडणुकीसाठी एकूण २४ हजार २०५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदानाकरिता सार्वजनिक सुट्टी जाहीर
मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यक्षेत्रात दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सार्वजनिक सुट्टी मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी संबंधित मतदारसंघाच्या बाहेर असतील, त्यांनासुद्धा लागू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या शासकीय,निम्न शासकीय कार्यालय,सार्वजनिक उपक्रम बँका आदींना सुद्धा ही सार्वजनिक सुट्टी लागू असणार आहे.
निवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदा
- पुणे
- कोल्हापूर
- सांगली
- सातारा
- सोलापूर
- रायगड
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
- छत्रपती संभाजीनगर
- परभणी
- धाराशिव
- लातूर
पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय मतदान केंद्रांची संख्या
- बारामती --- २९९
- मावळ --- २४३
- मुळशी --- २२७
- शिरुर --- ३३७
- हवेली --- २६३
- दौंड --- ३१७
- इंदापूर --- ४००
- पुरंदर --- २३५
- भोर --- २३७
- वेल्हे --- १०५
- आंबेगाव --- २३९
- जुन्नर --- ३६६
- खेड --- ३३७
- एकूण --- ३६०५
पुणे जिल्हा परिषद निवडणूक दृष्टीक्षेपात...
- जिल्ह्यातील झेडपी गटांची संख्या --- ७३
- जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या गणांची संख्या --- १४६
- गट व गणांची एकूण संख्या --- २१९
- पुणे जिल्हा परिषदेसाठी एकूण मतदार --- २९ लाख ७६ हजार ८०५
- एकूण मतदारांमध्ये पुरुष मतदार --- १५ लाख ७२ हजार २५१
- एकूण महिला मतदार --- १४ लाख ४९ हजार ५६०
- अन्य मतदार --- ९४
- एकूण मतदान केंद्र --- ३६०५
- निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचारी --- २४ हजार २०५
- आदर्श मतदान केंद्रांची संख्या --- १३ (प्रत्येक तालुक्यात एक)
- महिला मतदान केंद्रांची संख्या --- १३ (प्रत्येक तालुक्यात एक)
- परदानशील मतदान केंद्रांची संख्या --- ०३ हवेली, भोर व इंदापूर तालुक्यात प्रत्येकी १ )
- निवडणुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले बॅलेट युनिट --- १४ हजार ३१८.
- उपलब्ध करून देण्यात आलेले कंट्रोलट युनिट --- ५ हजार ८१३
- जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणातील एकूण उमेदवार --- २९९
- पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीचे एकूण उमेदवार --- ५२८
मतदान करण्यासाठी १२ पैकी एक ओळखीचा पुरावा आवश्यक
या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेले निवडणूक ओळखपत्र आवश्यक आहे. मात्र ज्यांच्याकडे निवडणूक ओळखपत्र त्यांच्यासाठी ओळखीसाठीचे अन्य बारा पुरावे निश्चित करण्यात आले आहेत. यापैकी कोणताही एक पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड
- मनरेगाअंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र
- बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक
- कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
- वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)
- पॅन कार्ड
- राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड
- भारतीय पारपत्र (पासपोर्ट)
- निवृत्तीवेतनाची दस्तावेज
- केंद्र किंवा राज्य सरकार तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र असलेले ओळखपत्र
- आमदार, खासदारांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र
- भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र
