Pune Zilla Parishad election 2026 : झेडपी निवडणुकीत दुबार मतदान करणाऱ्यांवर फौजदारी खटला भरणार, मतमोजणीनंतर दुबार मतदारांची पडताळणी करणार! 

पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांची माहिती : मतदान अधिकारी व मतदानयंत्रे शुक्रवारी सायंकाळी मतदान केंद्रांकडे रवाना

Pune Zilla Parishad election 2026 : झेडपी निवडणुकीत दुबार मतदान करणाऱ्यांवर फौजदारी खटला भरणार, मतमोजणीनंतर दुबार मतदारांची पडताळणी करणार! 
पुणे:- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा

पुणे, दि. ६ फेब्रुवारी २०२६ :- पुणे जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायती आणि पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत मतदान केलेल्या सुमारे ६७ हजार मतदारांची नावे पुणे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीच्या मतदार याद्यांमध्ये आहेत. याबाबतच्या सर्व मतदारांच्या याद्या जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत मतदान केलेल्या मतदारांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान करु नये, असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीनंतर दुबार मतदान केलेल्या मतदारांची पडताळणी केली जाणार आहे. या पडताळणीत दुबार मतदान केल्याचे आढळून आल्यास, संबंधित मतदारांवर फौजदारी खटला भरण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी शुक्रवारी (दि‌.६ फेब्रुवारी) सांगितले.

दरम्यान, पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान अधिकारी व कर्मचारी आणि मतदान यंत्रे ही मतदान केंद्रावर मुक्कामी पाठविण्यात आले आहेत. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लोकशाहीचा पवित्र उत्सव साजरा करताना मतदान अधिकाऱ्यांनी आपापली कर्तव्ये जबाबदारीने बजाविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. पात्र मतदारांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उर्त्स्फूतपणे मतदान करावे, नागरिक व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसहिंतेचे पालन करून शांततेत पूर्ण प्रक्रिया पार पाडावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी डूडी यांनी केले आहे. 

जिल्हाधिकारी म्हणाले, "पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ गट व जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या १४६ गणाकरिता येत्या शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२६) रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० असून मतदानापुर्वी मॉक पोल घेतला जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात एकूण संभाव्य दुबार मते ६७ हजार १२ इतकी आहेत. मतदार यादीत या मतदारांच्या नावापुढे दोन स्टार दाखविण्यात आलेले आहेत. मतदार यादीतील नावापुढे दुबार मतदारांची नोंद आढळून आलेल्या सर्व मतदारांकडून याआधी झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत किंवा महापालिका निवडणुकीत मतदान केले नसल्याची हमी देणारे हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे."