Minister of State for Urban Development Madhuri Misal review meeting : सासवड,जेजुरी, फुरसुंगी-उरुळी देवाची या नगर पालिकांच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावा!
नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांची संबंधित अधिकाऱ्यांना सूचना : प्रलंबित विकासकामांबाबत आढावा बैठक
ग्रामराज्य वृत्तसेवा
सासवड, दि. १३ ऑक्टोबर २०२५ :- पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील सासवड, जेजुरी आणि नवनिर्मित फुरसुंगी-उरुळी देवाची या नगरपालिकांमधील प्रलंबित विकासकामे त्वरीत मार्गी लावावीत, अशी सूचना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या नगर पालिकांच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित कामांचा एका बैठकीत आढावा घेतला. या आढावा बैठकीत बोलताना त्यांनी ही सूचना केली. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप आणि भाजप नेते बाबा जाधवराव आदी उपस्थित होते.
या बैठकीत या नगरपालिकांच्या हद्दीतील रस्ते,पाणीप्रश्न, घनकचरा व्यवस्थापन आणि कर्मचारी कमतरता यांसारख्या महत्त्वाच्या आणि मूलभूत सुविधांबाबत चर्चा झाली.यावेळी माजी आमदार संजय जगताप यांनी सासवड व जेजुरीची भुयारी गटार योजना, पाणी पुरवठा योजना, १५ वा वित्त आयोगाचा निधी, बांधकामांचे निकष कमी करणे, जेजुरीची हद्दवाढ, कर आकारणी, नागरिकांच्या समस्या आणि निधीची कमतरता याकडे राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे लक्ष वेधले. यावेळी जेजुरी नगर पालिकेत चाळीसगाव येथून आलेल्या 'क' आणि 'ड' वर्ग कर्मचाऱ्यांचे जवळच्या नगरपालिकेत स्थलांतर करण्याबाबत चर्चा होऊन स्थानिक कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याच्या मागणीवरही चर्चा झाली.
दरम्यान, या बैठकीत फुरसुंगी नगरपालिकेतील कर्मचारी कमतरतेचा प्रश्न तातडीने सोडवा, १५ वा वित्त आयोग तसेच स्वच्छ भारत योजनेबरोबरच पीएमआरडीए व पुणे महापालिकेने निधी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. हे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन माधुरी मिसाळ आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या बैठकीत दिले.
या आढावा बैठकीला सासवडचे माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, जेजुरीच्या माजी नगराध्यक्षा विणा सोनवणे,अजिंक्य देशमुख, माजी उपनगराध्यक्ष यशवंत जगताप, सुहास लांडगे, मनोहर जगताप, संदीप जगताप,विजय वढणे, भाजपचे सचिन पेशवे, मयूर जगताप, साकेत जगताप, आनंद जगताप, डाॅ. सुमित काकडे, भारत चौखंडे, हेमंत सोनवणे, विश्वजीत आनंदे,हिरामण हिवरकर, संतोष गिरमे, तुषार जगताप आदींसह नगर पालिकांचे माजी नगरसेवक आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
