Pune Zilla Parishad Reservation : आमदार रोहित पवार, झेडपीचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्यासह पाटील, जगदाळे यांचे झेडपी गट 'अनुसूचित जाती'साठी राखीव! 

माजी अध्यक्ष देवराम लांडे यांना पुन्हा संधी : कीर्ती कांचन, रुपा जगदाळे, आमले, बंडगर, घनवट, कदम या सदस्यांचे गट 'एस. सी'. 'एस. टी.'साठी आरक्षित 

Pune Zilla Parishad Reservation : आमदार रोहित पवार, झेडपीचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्यासह पाटील, जगदाळे यांचे झेडपी गट 'अनुसूचित जाती'साठी राखीव! 
पुणे:- पुणे जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहातील सदस्य अनुक्रमे आमदार रोहित पवार, माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, देवराम लांडे आणि ज्येष्ठ सदस्य विरधवल जगदाळे.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा

पुणे, दि. १२ ऑक्टोबर २०२५ :- पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ गटांपैकी अनुसुचित जाती प्रवर्गासाठी (एस.सी.) ०७ आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी (एस.टी.) ०५ असे एकूण १२ गट आरक्षित झाले आहेत.अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या जिल्हा परिषद गटांमध्ये मावळत्या सभागृहातील झेडपी सदस्य अनुक्रमे आमदार रोहित पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती वैशाली पाटील आणि ज्येष्ठ सदस्य विरधवल जगदाळे यांच्या झेडपी गटांचा समावेश आहे. 

दरम्यान, अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती या दोन्ही प्रवर्गांसाठी मिळून मावळत्या सभागृहातील १२ सदस्यांचे जिल्हा परिषद गट हे राखीव झाले आहेत. यापैकी माजी अध्यक्ष देवराम लांडे यांचा मतदारसंघ राखीव झाला असला तरी नव्याने निर्माण झालेला आणि याच गटात लांडे यांच्या केवाडी गावाचा समावेश असलेला बारव-तांबे हा गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे लांडे यांना पुन्हा निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे. 

पुणे जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहातील सदस्य अनुक्रमे सागर भोसले (लासुर्णे-सणसर), वैशाली पाटील (वालचंदनगर -बोरी), हनुमंत बंडगर (भिगवण-शेटफळगडे) तिघेही इंदापूर, आमदार रोहित पवार (गुणवडी-शिर्सूफळ), विश्वास देवकाते (नीरावागज -डोर्लेवाडी) दोघेही ता. बारामती, विरधवल जगदाळे (गोपाळवाडी- कांगावा), ता. दौंड व किर्ती कांचन (उरळीकांचन - सोरतापवाडी) ता. हवेली आदी सदस्यांचे झेडपी गट हे अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. यापैकी सागर भोसले यांचे निधन झाले असून आमदार रोहित पवार हे विधानसभेवर निवडून गेले आहेत. 

याशिवाय मावळत्या सभागृहातील देवराम लांडे (बारव-तांबे,ता. जुन्नर ), रुपा जगदाळे (शिनोली-बोरगाव, ता. आंबेगाव), तनुजा घनवट (वाडा-वाशेरे, ता. खेड), अंकुश आमले (डिंगोरे-उदापूर, ता. जुन्नर) आणि शोभा कदम (टाकले बुद्रुक -नाणे) या सदस्यांचे गट अनुसूचित जमातीसाठी (एस.टी.) राखीव झाले आहेत. यापैकी देवराम लांडे हे अनुसुचित जमाती प्रवर्गातील असल्याने त्यांना पुन्हा निवडणूक लढविण्याची पुन्हा संधी निर्माण झाली आहे. 

पंचायत समित्यांचे अनुसूचित जातीसाठी १५ व अनुसूचित जमातीसाठी ८ गण राखीव 

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या एकूण गणांच्या संख्येत ४ ने घट झाली आहे. त्यामुळे ही संख्या आता १४६ झाली आहे. यापैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १५ आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ८ असे एकूण २३ गण हे राखीव झाले आहेत.

अनुसूचित जातीसाठी राखीव गण

- नारायणगांव, ता. जुन्नर. 

- वडगाव रासाई, ता. शिरूर. 

- नाणेकरवाडी, ता. खेड.

- खडकाळे, ता. मावळ .

- हिंजवडी, ता. मुळशी. 

- उरुळीकांचन, ता. हवेली. 

- कदमवाकवस्ती, ता. हवेली. 

- गोपाळवाडी, ता. दौंड. 

- खडकी, ता. दौंड. 

- निरा शिवतक्रार, ता. पुरंदर. 

- गुणवडी, ता. बारामती. 

- निरावागज, ता. बारामती. 

- वालचंदनगर, ता. इंदापूर. 

- लासुर्णे, ता. इंदापूर. 

- सणसर, ता. इंदापूर. 

अनुसूचित जमातीसाठी राखीव गण 

- तांबे, ता. जुन्नर. 

- बारव, ता. जुन्नर. 

- उदापूर, ता. जुन्नर. 

- शिनोली, ता. आंबेगाव.

- बोरघर, ता. आंबेगाव.

- वाडा, ता. खेड. 

- वाशेरे, ता.खेड.

- नाणे, ता. मावळ‌.