Zilla Parishad election in Maharashtra : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक नेमा!
राज्य निवडणूक आयोगाचा विभागीय आयुक्तांना आदेश : जिल्हा परिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १४ नोव्हेंबर २०२५ :- महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्हानिहाय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना दिला आहे. यानुसार प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येकी दोन आणि दुर्गम भागातील जिल्ह्यात प्रत्येकी तीन निवडणूक निरीक्षक नियुक्त केले जाणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या हालचालींना मोठा वेग आला आहे. यामुळे येत्या १५ नोव्हेंबरनंतर कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वृत्ताला राज्य निवडणूक आयोगातील विश्वसनीय सूत्रांकडूनही शुक्रवारी (दि.१४ नोव्हेंबर) दुजोरा देण्यात आला आहे.
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीच्या मतदान केंद्रांच्या याद्या आणि जिल्हा परिषद गटनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यास दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आल्यानंतर लागलीच निवडणूक आयोगाने हा आदेश दिला आहे. शिवाय या निवडणुकीच्या अंतिम मतदार याद्या या दि. ३ नोव्हेंबरपासून सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी गटनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याच्या तारखेपर्यंत म्हणजेच येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत प्रतिक्षा करणे आवश्यक नसल्याचेही यावेळी या सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सध्या सुरू असलेल्या नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीसुद्धा आत्ताच निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाबरोबर निवडणूक निरीक्षक नियुक्तीसाठीच्या आवश्यक मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सुचनांच्या आधारे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक नियुक्त करणे बंधनकारक आहे.
महाराष्ट्रातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १५ ते २० डिसेंबर या कालावधीत मतदान होण्याची शक्यता आहे. कारण जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल अनुक्रमे दि.२० मार्च आणि दि. १३ मार्च २०२२ रोजीच संपुष्टात आलेला आहे. तेव्हापासून आजतागायत या सर्व पंचायतराज संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे.
