my young india workshop : महाविद्यालयीन युवकांच्या सर्वांगिण विकासात केंद्र सरकारच्या योजनांचे मोठे योगदान
पुणे जिल्हा जिल्हा समन्वयक आशिष शेटे : 'मेरा युवा भारत' उपक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या योजनांवर कार्यशाळेचे आयोजन
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २९ ऑगस्ट २०२५ :- केंद्र व राज्य सरकारमार्फत महाविद्यालयीन युवकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. या योजनांमुळे युवक-युवतींचा सामाजिक व आर्थिक विकासासाठी मोठी मदत होते. युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांचे मोठे योगदान असल्याचे मत केंद्रीय खेल आणि क्रीडा विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या नेहरू युवा केंद्राचे पुणे जिल्हा समन्वयक आशिष शेटे यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मेरा युवा भारत (माय भारत) पुणे आणि डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट व संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारच्या विविध योजनांवर आधारित पुणे येथे राष्ट्रीय एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी डेक्कन कॉलेजचे कुलगुरू प्रा. प्रसाद जोशी, कुलसचिव डॉ. अनिता सोनवणे, पत्रकार डॉ. गजेंद्र बडे, डेक्कन कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा. डॉ . निलेश जाधव, नेहरू युवा केंद्राचे कार्यालय सहायक स्वप्नील शिंदे आदी उपस्थित होते.
श्री. शेटे पुढे म्हणाले, "या कार्यशाळेचे उद्दिष्ट तरुणांना त्यांच्या विकासासाठी असलेल्या योजनांची जाणीव करून देणे, इतक्यापुरते मर्यादित नसून, केंद्र सरकारच्या विविध योजनांचा पूर्ण फायदा घेता यावा, यासाठी युवकांना प्रेरित आणि मार्गदर्शन करणे हे आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट तरुणांमध्ये प्रमुख सरकारी उपक्रमांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि उपलब्ध संधींचा पुरेपूर वापर करण्यासाठी त्यांना सक्षम करणे हे आहे."
या कार्यशाळेत पत्रकार डॉ . गजेंद्र बडे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.बडे यांनी युवकांना शिक्षण, ग्रामीण, महिला, कौशल्य विकास, उद्योजकता, क्रीडा व युवकांच्या कल्याणासाठी पर्यायाने युवकांच्या सक्षमीकरणाशी संबंधित केंद्र सरकारच्या योजनांविषयीची माहिती दिली.
डेक्कन कॉलेजचे कुलगुरू प्रा. प्रसाद जोशी यांनी यावेळी बोलताना म्हणाले, डेक्कन कॉलेजच्या सहकार्याने आयोजित या कार्यशाळेत शैक्षणिक मूल्य वाढले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना सरकारी उपक्रमांना वास्तविक जगातील गोष्टी आणि संशोधन संधींशी जोडता येणे सोपे होईल."
या विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा. डॉ . निलेश जाधव यांनी डेक्कन कॉलेज आणि मेरा युवा भारत यांच्या संयुक्त उपक्रमाबद्दलची माहिती दिली. युनेस्को वर्ल्ड हेरिटेजद्वारा आताच जाहीर करण्यात आलेल्या हेरिटेज लिस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या समावेश झाला आहे.यामध्ये डेक्कन कॉलेजचे मोठे योगदान असल्याचे प्रा. जाधव यांनी यावेळी सांगितले.
नेहरू युवा केंद्राचे कार्यालयीन सहाय्यक स्वप्निल शिंदे यांनी माय भारत पोर्टलविषयी सविस्तर माहिती दिली आणि रजिस्ट्रेशन ड्राईव्ह घेऊन विद्यार्थ्यांना माय भारत पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचा समारोप प्रश्नोत्तरांच्या सत्राने झाला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी सरकारी योजनांवर आधारित प्रश्न उपस्थित केले आणि विशिष्ट योजनांमध्ये नोंदणी कशी करावी किंवा त्यांचा लाभ कसा घ्यावा, याबाबत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
या कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्राचे लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक सिद्धार्थ चव्हाण, डेक्कन कॉलेजमधील शिक्षक, विद्यार्थी आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले युवा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरकारी योजना या विद्यार्थ्यांच्या जीवनावर आणि समुदायांवर कसा सकारात्मक परिणाम करू शकतात, हे सहभागी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी परस्परसंवादी सत्रे, केस स्टडी आणि वास्तविक जीवनातील यशोगाथा सामायिक करण्यात आल्या.
