Journalist Late Vitthalrao Joglekar Research Essay Competition Prize Distribution :- सत्यशोधन आणि संशोधन हे पत्रकारितेचे मूलतत्व
संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संजय तांबट : पत्रकार कै. विठ्ठलराव जोगळेकर शोधनिबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ८ सप्टेंबर :- सत्यशोधन आणि संशोधन हेच पत्रकारितेचे मूलतत्त्व आहे. पत्रकार हे प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन अनेक घटनांचे वार्तांकन करत असतात.त्यामुळे पत्रकारांनी बातमीच्या पलीकडे अनेक अनुभव पाहिलेले अनुभवलेले असतात. ते सर्व अनुभव पुस्तक रूपाने लिहिले गेले तर पुढील पिढीसाठी मोलाचा ठेवा ठरेल. अनुभवाचा हा ठेवा जपण्यासाठी पत्रकारांनी दैनंदिन कामकाज करत असताना वाचन आणि लेखनासाठी देखील वेळ द्यायला हवा असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख डॉ.संजय तांबट यांनी सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केले.
पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार कै. विठ्ठल जोगळेकर शोधनिबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोमवारी करण्यात आले. या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, कार्यवाह डॉ. गजेंद्र बडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पत्रकारिता करत असताना लेखनाला सर्वाधिक महत्त्व आहे. त्यासाठीचे व्यासपीठ म्हणून पत्रकार कै.विठ्ठल जोगळेकर शोधनिबंध स्पर्धा घेतली जाते. प्रतिष्ठानच्या वतीने पारितोषिकाची रक्कमदेखील आता वाढविण्यात आली असून ती पुर्वीच्या तुलनेत दुप्पट करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला पाहिजे, अशी अपेक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे यांनी यावेळी व्यक्त केली.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात सन २०२१-२२ आणि सन २०२२-२३ या दोन वर्षांच्या पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. यामध्ये सन २०२१-२२ या वर्षातील पुरस्काराचे मानकरी स्वाती खेर (टाईम्स ऑफ इंडिया),स्वप्नील बापट (आज का आनंद), डॉ. सुजीत तांबडे (लोकसत्ता ),सुकृत मोकाशी (बेळगाव तरुण भारत) व सन २०२२-२३ या वर्षातील पुरस्काराचे मानकरी स्वप्नील बापट (आज का आनंद) आणि पुष्कर कुलकर्णी (लोकमत) यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह डॉ. गजेंद्र बडे यांनी केले. पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे विश्वस्त राजेंद्र पाटील यांनी आभार मानले.
