महाराष्ट्रातील शेतकरी झाले हायटेक, वर्षभरात घरबसल्या डाऊनलोड केले ४ कोटी ३५ लाख सातबारा उतारे, आठ अ आणि मिळकत पत्रिका 

महसूल खात्याच्या ई-महाभूमी प्रकल्पाची कामगिरी, महसूल विभागात डिजिटल क्रांती : सरकारला  मिळाला ७६ कोटी ८० लाख रुपयांचा महसूल

महाराष्ट्रातील शेतकरी झाले हायटेक, वर्षभरात घरबसल्या डाऊनलोड केले ४ कोटी ३५ लाख सातबारा उतारे, आठ अ आणि मिळकत पत्रिका 
पुणे :- राज्यातील शेतकऱ्यांनी ई-महाभूमी प्रकल्पाच्या माध्यमातून वर्षभरात डाऊनलोड केलेल्या अभिलेख्यांचा आलेख.

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ३१ मार्च २०२५ :-   महाराष्ट्रातील शेतकरी सरत्या आर्थिक वर्षात म्हणजे १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या एका वर्षात शेतीशी संबंधित तब्बल ४ कोटी ३५ लाख अभिलेख (विविध प्रकारच्या नकला) घरबसल्या डाऊनलोड केल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आता पुर्वीसारखे भोळे-भाबडे राहिले नसून ते आता चक्क हायटेक (तंत्रस्नेही) झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

दरम्यान, शेतकरी तंत्रस्नेही झाल्यामुळे राज्याच्या महसूल विभागात डिजिटल क्रांती झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवाय यातून महसूल खात्याला नक्कल शुल्काच्यापोटी तब्बल ७६ कोटी ८० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. ही आकडेवारी राज्यातील ई-महाभूमी प्रकल्पाची आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातूनडिजिटल स्वाक्षरीत सातबारा उतारे, (७/१२ उतारा), खाते उतारे, ( गाव नमुना नंबर ८ अ), फेरफार नोंदीचे उतारे आणि मिळकत पत्रिका या नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या डाउनलोड करून घेता येतात. 

यानुसार शेतकऱ्यांनी सरत्या आर्थिक वर्षात ए ३ कोटी ३ लाख ७७ हजार ८७५ सातबारा उतारे, ९६ लाख ५६ हजार ५२६ खाते उतारे (८ अ), २० लाख ३१ हजार ५२२ फेरफार नोंदीचे उतारे आणि १५ लाख २१ हजार ७९२ मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) शेतकऱ्यांनी डाऊनलोड केले आहेत. या प्रकल्पाच्या उभारणीत उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांचा सिंहाचा वाटा होता. जगताप हेच या प्रकल्पाचे पहिले समन्वयक होते. 

राज्याच्या महसूल विभागातील ई-फेरफार आणि  ई -महाभूमी प्रकल्पाचे यश पाहून, या सेवेतून समाधान होत आहे. कारण ही आकडेवारी पाहता महसूल विभागात झालेली ही डिजिटल क्रांती आहे. 

- रामदास जगताप,  उपजिल्हाधिकारी, पुणे.