Cow-Tourism Centre :-  देशी गाईंचा प्रचार व प्रसारासाठी पुणे येथील देशी गाय संशोधन केंद्रात लवकरच गो-पर्यटन केंद्र सुरू होणार! 

कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडून देशी गाय संशोधन केंद्राला भेट: विद्यार्थी व शास्त्रज्ञांशी साधला संवाद 

Cow-Tourism Centre :-  देशी गाईंचा प्रचार व प्रसारासाठी पुणे येथील देशी गाय संशोधन केंद्रात लवकरच गो-पर्यटन केंद्र सुरू होणार! 
पुणे:- पुणे येथील कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन केंद्राची पाहणी करताना कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे व अन्य.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २ सप्टेंबर २०२५ :- पुणे  येथील कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने देशी गाईंचा प्रसार आणि प्रसारासाठी  गो-पर्यटन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या पर्यटन केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मंगळवारी या केंद्राला भेट दिली आणि तेथील कामांच्या प्रगतीची पाहणी करतआढावा घेतला. यावेळी भरणे यांनी या केंद्रातील शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांशी संवादही साधला. 

या भेटीदरम्यान भरणे यांनी  केंद्रातील गाईंच्या विविध प्रकारच्या देशी जातींबाबत माहिती घेतली. या संशोधन प्रकल्पातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या देशी गायी, नवीन पर्यावरण पूरक गोठे, गोबर गॅस प्रकल्प, गो-परीक्रमा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने राबविण्यात येणाऱ्या संशोधन व प्रशिक्षण उपक्रमांचेही भरणे यांनी यावेळी कौतुक केले. 

या प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये अद्ययावत गायींचे गोठे, सायलो बंकर, बायोगॅस युनिट,कंपोस्टिंग आणि स्टोरेज युनिट्स, प्रयोगशाळा, शेतकरी वसतीगृह, प्रशिक्षण हॉल, प्रशासकीय इमारत, सेल्स काउंटर आणि देशी गाईंच्या प्रचार प्रसारासाठी गो-पर्यटन केंद्र आदी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. 

यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, कोल्हापूर येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालयातील सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेश कांबळे, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. समीर ढगे, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कंखरे आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विविध शास्त्रज्ञ या वेळी उपस्थित होते.देशी गाय संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी कृषिमंत्री भरणे यांना या प्रकल्पाची माहिती दिली‌.