Zilla Parishad election 2025 : .... आता आमचं ठरलं, ना निष्ठा, ना पक्ष, जिल्हा परिषद निवडणूक हेच 'लक्ष्य'!

महाराष्ट्रातील सर्वपक्षीय गाव पुढाऱ्यांचा निर्धार : उमेदवारीसाठी प्रसंगी बंडखोरी व पक्षांतराचे संकेत 

Zilla Parishad election 2025 : .... आता आमचं ठरलं, ना निष्ठा, ना पक्ष, जिल्हा परिषद निवडणूक हेच 'लक्ष्य'!
पुणे:- जिल्हा परिषद निवडणूक २०२५.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २४ ऑक्टोबर २०२५ :-  जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक आधीच चार वर्षांंनी उशिरा होत आहे. यंदा होणाऱ्या या निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मिळाली नाही तर, पुन्हा पाच वर्षे थांबावे लागणार आहे. शिवाय पाच वर्षांनंतर गट किंवा गण अन्य प्रवर्गासाठी राखीव झाल्यास करायचे काय?. त्यामुळं आमचं आता ठरलंय. उमेदवारीसाठी ना पक्षाची निष्ठा, ना पक्ष, तर, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणूक हेच आता 'लक्ष्य' असेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत यंदाची ही निवडणूक लढवायचीचं, असा निर्धार महाराष्ट्रातील सर्वपक्षीय गाव पुढाऱ्यांनी 'ग्रामराज्य' न्यूज पोर्टलशी संवाद साधताना बोलून दाखवला आहे.

यासाठी प्रसंगी बंडखोरी किंवा पक्षांतर करण्याची तयारीही अनेक इच्छुकांनी केली आहे. यामुळे राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या येत्या निवडणुकीत उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात पक्षांतर करण्याचे संकेत मिळाले आहेत. परिणामी पुर्वी केवळ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपुरतेच मर्यादित असलेले पक्षांतराचे लोण आता गावपातळीवरही पोहोचणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांचे मोठे-मोठे नेतेच जर उमेदवारी मिळविण्यासाठी व विविध पदांसाठी पक्षनिष्ठा खुंटीला बांधून ठेऊन मोठ्या प्रमाणात पक्षांतर करत आहेत. हे नेते तरी पदासाठी पक्षांतर करताना कोठे पक्षनिष्ठा ठेवतात. मग अशा या पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना आमचे पक्षांतर रोखण्याचा नैतिक अधिकार कुठे उरला आहे, असा सवाल करत, नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आम्ही तरी पक्षनिष्ठा का ठेवायची, असा प्रतिप्रश्नही या गावपुढाऱ्यांनी नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर केला आहे. यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात पक्षांतर आणि बंडखोरी होण्याचे प्रमाण वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

आतापर्यंत केवळ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपुरतेच पक्षांतराचे लोण होते. त्यात आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचीही भर पडणार आहे. आम्हाला पक्ष-बिक्ष काही देणेघेणे नाही. जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुकीची उमेदवारी मिळविणे हेच आमचे लक्ष्य आहे. पक्षाची उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करणे किंवा पक्षांतर करणे हाही पर्याय खुला ठेवला आहे. कारण आम्ही तरी आणखी किती दिवस फक्त सतरांज्याच उचलत बसायच्या, हा आम्हाला पडलेला प्रश्न असल्याचेही या गाव पुढाऱ्यांनी यावेळी सांगितले. 

महाराष्ट्रातील ३४ पैकी ३२ जिल्हा परिषदा आणि ३५१ पैकी ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुमारे चार वर्षांचा खंड पडला आहे. त्यामुळे या सर्व पंचायतराज संस्थांवर गेल्या चार वर्षांपासून प्रशासकराज सुरू आहे. प्रदीर्घ खंडानतर यंदा या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यानुसार आतापर्यंत जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

या निवडणुकीसाठीच्या प्राथमिक मतदार याद्याही प्रकाशित करण्यात आल्या आहेत.येत्या सोमवारी (दि.२७ ऑक्टोबर ) अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे येत्या डिसेंबरमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीसाठी तीव्र इच्छूक असलेल्या गाव पुढाऱ्यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत.