Sant Gadgebaba Gramswachta Abhiyan Award Declared :- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात कोल्हापुरची शेळकेवाडी पुणे विभागात नंबर वन!
आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी ठरली पुणे जिल्ह्यात प्रथम : ग्रामविकास मंत्री जयकुमार यांच्या हस्ते शनिवारी गौरविणार

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २० जून २०२५ :- संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात कोल्हापूर जिल्ह्यातील शेळकेवाडी (ता.करवीर) पुणे विभागात तर, पुणे जिल्ह्यातील गावडेवाडी (ता. आंबेगाव) पुणे जिल्ह्यात नंबर वन ठरली आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे शनिवारी (दि.२१ जून) आयोजित निर्मल वारी शुभारंभाच्या कार्यक्रमात विभाग व जिल्ह्यात उत्कृष्ट ठरलेल्या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
राज्य सरकारने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे सन २०२२-२३ या वर्षाचे पुणे विभागाचे आणि सन २०२३-२४ या वर्षाचे पुणे जिल्ह्याचे पुरस्कार जाहीर केले आहेत. यामुळे विभाग विभाग व जिल्ह्यातील गुणानुक्रमे पहिल्या तीन ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. याशिवाय दोन्ही गटातील प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
विभागस्तरीय पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या ग्रामपंचायती
- प्रथम क्रमांक :- शेवाळेवाडी,ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर.
- द्वितीय क्रमांक :- बोरगाव, ता. कवठे महांकाळ, जिल्हा सांगली.
- तृतीय क्रमांक :- कवठे, ता. खंडाळा, जिल्हा सातारा.
विभागस्तरीय विशेष पुरस्कार
स्व. वसंतराव नाईक पुरस्कार :- दरेवाडी, ता. वाई, जिल्हा सातारा.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार :- सांडगेवाडी, ता. पलूस, जिल्हा सांगली.
- स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार :- गोरेगाव, ता. करमाळा, जिल्हा सोलापूर.
पुणे जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती
- प्रथम क्रमांक :- गावडेवाडी, ता. आंबेगाव.
- द्वितीय क्रमांक :- मांजरी खुर्द, ता. हवेली.
- तृतीय क्रमांक :- सदोबाचीवाडी, ता. बारामती.
विशेष पुरस्कार जाहीर झालेल्या ग्रामपंचायती
- स्व. वसंतराव नाईक पुरस्कार :- चिंचोली, ता. जुन्नर.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार :- टाकवे खुर्द, ता. मावळ.
- स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार :- मांजरवाडी, ता. जुन्नर.
निर्मल वारीचा शनिवारी शुभारंभ
दरम्यान, राज्य सरकारच्या वतीने आषाढी वारीबरोबर काढण्यात येत असलेल्या यंदाच्या निर्मल दिंडीचा शुभारंभ गोरे यांच्या हस्ते शनिवारी केला जाणार आहे. आषाढी वारीत दरवर्षी या ‘निर्मल दिंडी’चे आयोजन करण्यात येत असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गजानन पाटील यांनी सांगितले. या निर्मल वारीत सहभागी होत असलेल्या चित्ररथ, कलापथक, आरोग्य सेवक, आरोग्यदूत, स्वच्छता आणि पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणांना व स्वच्छ सर्वेक्षण 2025 च्या शुभारंभ कार्यक्रमांस गोरे हे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात येणार आहे.