Zill Parishad election 2026 : पुणे जिल्हा परिषदेसाठी पहिल्याच दिवशी तब्बल १३०५ उमेदवारी अर्जांची विक्री!
महाराष्ट्रात महापालिकानंतर आता जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांचा रणसंग्राम सुरू : खेड तालुक्यातून दोन उमेदवारी अर्ज दाखल
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १७ जानेवारी २०२६ :- महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या निकालाच्या दिवशीच म्हणजे दि. १६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला आहे. या कार्यक्रमामुळे राज्यात आता येत्या ७ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू राहणार आहे.
या निवडणुकीची अधिसूचना जाहीर होताच, शुक्रवारपासूनच (दि.१६ जानेवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. यानुसार पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांसाठी इच्छुक असलेल्यांनी तब्बल १३०५ उमेदवारी अर्ज प्राप्त करून घेतले आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच शुक्रवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. हे दोन्ही उमेदवारी अर्ज खेड (राजगुरुनगर) तालुक्यातील आहेत. यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठीच्या प्रत्येकी एका उमेदवारी अर्जाचा समावेश आहे.
राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील पुणे जिल्हा परिषदेसह १२ जिल्हा परिषदा आणि जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांसह १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम दि. १३ जानेवारी रोजीच जाहीर केला आहे. यानुसार दि. १६ जानेवारी रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करुन, त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. या घोषणेनुसार शुक्रवारी ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी येत्या दि. ५ फेब्रुवारीला मतदान तर, मतमोजणी दि. ७ फेब्रुवारीला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांचा कार्यकाळ दि. १३ मार्च २०२२ तर, पुणे जिल्हा परिषदेचा कार्यकाळ दि. २० मार्च २०२२ रोजी संपुष्टात आलेला आहे. तेव्हापासून आजतागायत या सर्व संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे.
इंदापूर तालुक्यात पहिल्याच दिवशी तब्बल २८८ उमेदवारी अर्जांची विक्री
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक २८८ जणांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज प्राप्त करून घेतले आहेत. इंदापूर तालुक्याच्या पाठोपाठ दौंड तालुक्यातील तब्बल १९८ जणांनी उमेदवारी अर्ज प्राप्त करून घेतले आहेत. सर्वात कमी म्हणजेच केवळ ३४ उमेदवारी अर्ज हे वेल्हे (राजगड) तालुक्यातील इच्छुकांनी प्राप्त करून घेतले आहेत.
पुणे झेडपीसाठी तालुकानिहाय उमेदवारी अर्जांची विक्री
- पुरंदर --- ८७
- भोर --- ५७
- मावळ --- ७५
- दौंड --- १९८
- इंदापूर --- २८८
- खेड --- ९१
- वेल्हे --- ३४
- आंबेगाव --- ६०
- हवेली --- १००
- बारामती --- ७८
- शिरूर --- ४७
- जुन्नर --- ८६
- मुळशी --- ५७
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम
- निवडणूक अधिसूचना प्रसिद्धी --- दि. १६ जानेवारी २०२६.
- उमेदवारी अर्ज दाखल करणे --- दि.१६ ते २१ जानेवारी २०२६.
- उमेदवारी अर्जांची छाननी ---- दि. २२ जानेवारी २०२६.
- उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत --- दि.२७ जानेवारी २०२६. (दुपारी ३ वाजेपर्यंत).
- उमेदवारांची अंतिम यादी व निवडणूक चिन्ह वाटप --- दि. २७ जानेवारी २०२६. (दुपारी साडेतीन वाजल्यानंतर).
- मतदान --- दि. ५ फेब्रुवारी २०२६ ( सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत).
- मतमोजणी व निकाल --- दि. ७ फेब्रुवारी २०२६.
निवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदा
- पुणे
- कोल्हापूर
- सांगली
- सातारा
- सोलापूर
- रायगड
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
- छत्रपती संभाजीनगर
- परभणी
- धाराशिव
- लातूर.
